wondervoices

सह्यांद्रीचा छावा

कृष्ण की पुकार है
ये भागवत का सार है
की युद्ध ही तो वीर का प्रमाण है
कौरवो की भीड हो या
पांडवो का नीड हो
जो लढ सका वही तो महान है
फक्त लढणं लढणं आणि लढणं हेच ज्याचं जीवन कार्य तो महान. संपूर्ण इतिहासातील राजघराण्यातील एक दुर्मिळ मिलाफ असलेले व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी महाराज म्हणजेच सह्याद्रीचा छावा. शस्त्र आणि शास्त्रावर समतोल पकड. बौद्धिक आणि शारीरिक समतोल. चित्त वृत्तीची एकाग्रता आणि लौकिक पारलौकिकाची समज. ही शंभू राजांची वैशिष्ट्ये.
वयाच्या तेराव्या वर्षी जगातील 16 भाषांमध्ये पारंगत. आजच्या साडेतीनशे वर्षांपूर्वी अस्खलित इंग्रजी बोलता येणारा राजपुत्र. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिखा सारखे ग्रंथ. तर याच वयात सातसतक नावाचा अध्यात्मावर चर्चा करणाऱ्या ग्रंथाचे लेखक. सोबतच तलवारबाजी , घोडेस्वारी आणि इतर युद्ध कौशल्यामध्ये सुद्धा पारंगत.
मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याला दोन छत्रपती दिले. एक स्वराज्य निर्माता शिवाजी महाराज व एक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज.
स्वराज्य हे प्रत्यक्षात अवतरलेलं राज्य असल्या सोबत च तो एक विचार होता. त्याला संभाजी महाराज शिव विचार म्हणत. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे मूल असण्यापेक्षा त्यांचे भक्त होते. शिवाजी महाराजांवर संभाजी ची असीम श्रद्धा होती आणि त्यातूनच समर्पणाची क्रिया होत गेली.
तसा संभाजी महाराजांचा वयाच्या साडेआठव्या वर्षी महाराज जयसिंग यांच्याशी झालेल्या तहाच्या रूपाने राजकारण प्रवेश झाला. वयाच्या नवव्या वर्षी ते आलमगीर औरंगजेबाच्या दरबारात होते. आपल्या पित्याने आखलेल्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाचे ते प्रमुख कार्यवाहक होते. तत्पूर्वी औरंगजेबाच्या दरबारात रोजची हजेरी लावणे व्हायचे.
तेव्हा औरंगजेब एकदा त्यांना म्हणाला आम्ही दिलेला हत्ती इतक्या दूर तुमच्या दख्खनमध्ये कसे न्याल? निर्भय संभाजीं उत्तर देताना म्हणाले ,हत्ती तर जनावर आहे. त्याच्यावर बसून किंवा हाकलून नेता येईल. परंतु स्वराज्याचे तुम्ही काबीज केलेले किल्ले तुम्ही तुमच्या राज्यात कसे आणणार?
राजकारणाच्या मार्गाने वयाच्या नवव्या वर्षी संभाजींच्या पाठीला बांधले गेलेले शरीर रुपी मरण. वयाच्या 32 व्या वर्षी इंद्रायणी तीरावर कोणीही त्यांच्या कर्तुत्वाला हात लावू शकणार नाही असा पराक्रम करून विसावले.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वराज्याचा घास घ्यायला निघाला . त्याच्या आणि इतरांच्या मताप्रमाणे यात कठीण असे काहीही नव्हते. आशियातील सर्वात श्रीमंत राज्याचा राजा. 14,500 ही तर केवळ सरदारांची संख्या. प्रत्येक सरदाराकडे पन्नास हजाराची फौज. त्याकाळी आलमगिराचा वार्षिक महसूल 23 हजार कोटी होता. वय वर्ष 65.
तेव्हा संभाजी महाराजांकडे सर्व जमवून 50 हजाराची फौज. वार्षिक महसूल कसाबसा एक कोटी. वय वर्ष 23.
तरीही यत्किंचितही घाबरला नाही हा छावा. झुंजत राहिला .लढत राहिला. रडणे त्याला माहीत नव्हते. कारण त्याच्याकडे शिवाजी महाराजांसारखा अखंड प्रेरणास्त्रोत होता. ज्याला परिस्थिती रूप शत्रूला निकराने तोंड देण्याची सवय होती.
शिवाजी महाराज निवर्तल्यानंतर संभाजी महाराज हंबीरराव मोहिते यांना म्हणतात”मामा जरा राज्याची घडी बसवायची आहे. एखादं ठाण शोधून काढा.”हंबीर मामांनी बुऱ्हानपूर शोधलं सतत तीन दिवस मराठ्यांनी हे ठाण लुटलं. औरंगजेबाची दक्षिणेतील राजधानी. औरंगजेबाच काळीज पान. कारण औरंगजेबाच्या दोन प्रिय बहिणींचा जन्म याच गावाचा. त्याच्या मातेचा मृत्यू ही बुरानपुराचाच. आणि औरंगजेबाच एकमेव प्रेम प्रकरणही इथलच.
औरंगजेबाने स्वराज्यात प्रवेश केल्यानंतर मात्र 24 तासा पैकी वीस तास लढाई करून ,प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खाऊन. संभाजी महाराजांनी अखिल स्वराज्यात वणवा पेटवला. मोगल सैनिकांना दे माय धरणी ठाय करून सोडले.
अतिशय बुद्धी कौशल्य असणाऱ्या संभाजीराजांनी एक वेगळी युक्ती शोधली औरंगजेब स्वराज्यात आणि संभाजी महाराज औरंगजेबाच्या साम्राज्यात .कर्नाटक, म्हैसूरच्या चिकदेवरायाने महाराजांना दीड कोटीची खंडणी दिली. तंजावरला व्यंकोजी सोबत आले, पुढे तामिळनाडूमध्ये मद्रास कावेरीचा पाषाणकोट किल्ला, आंध्र प्रदेश मधील 80 राजे संभाजी राजांना शरण आले. बंगाल , बिहार इत्यादी राज्य काबीज करत. म्हणजेच आजच्या भारतीय नकाशा नुसार महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा ,मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान ,आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा नऊ राज्यांवर अधिपत्य प्रस्थापित केले. उत्तरेचा भाग राहिला तिकडे आपलेच राजपूत होते.
महाराजा जयसिंग यांचे पुत्र रामसिंह यांना संभाजी महाराज पत्र लिहिताना म्हणतात”आम्ही दक्षिण काबीज केली. उत्तरेत आपण आहात .मोघलांना वाटते हिंदू तत्वशून्य झालेत आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही. पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी आमचं सर्वस्व ,देश, दुर्ग सारे पणाला लावायला तयार आहोत. या वक्ती आपण सहकार्याचा हात दिला तर औरंगजेबाला कारागृहात डाबंण शक्य होईल.”
काय महत्वाकांक्षा आहे? आणि तीही केव्हा तर प्रत्यक्ष औरंगजेब छाताडावर बसलेला असताना. उण्या पुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात या सह्याद्रीच्या छाव्याने एकूण 240 लढाया लढल्या पैकी एकाही लढाईत पराभूत झाला नाही. ज्याची नोंद आजही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे.
परंतु राजपुतांच्या तलवारी काही म्यानाबाहेर आल्या नाहीत. जर ह्या तलवारी जेरबंद नसत्या तर आजचा इतिहास काही वेगळाच असता.
तरीही संभाजी महाराज लढत राहिले. कारण एकच वारसा. 750 वर्षाची गुलामगिरीचा अंधकार मनामनातून पुसून काढून एक नवीन फुल्लिंग चेतवणारा वारसा मासाहेब जिजाऊ , शिवाजी महाराज यांचा.
एकूण मानवी उत्क्रांतीच ती. गुलामगिरीचे मानवातील गुणसूत्र बदलणारी. म्हणूनच आजही महाराष्ट्रात मातीसाठी शहीद होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
संभाजीने फक्त स्वराज्याचे रक्षणच केले नाही. तर ते वृद्धिंगतही केले. आधी पेक्षा क्षेत्रफळामध्ये पाच हजार किलोमीटर ची भर टाकली. खजिना पाचपटीने वाढवला. दरम्यान एकही गड किल्ला जाऊ न देता काही गड किल्ल्यांचे निर्माण केले. संभाजी महाराजांनी मोघल वाकवले, इंग्रज नाचवले, पोर्तुगीज झुकवले आणि सिद्धी बुडवले.
हा छत्रपती नमला नाही, झुकला नाही, फक्त असीम जिद्दीने पुढे जात राहिला. अशा अफाट शौर्य, धैर्य, पराक्रमी ,तत्त्ववेत्ता ,नीतिमत्ता असलेला युवराज जर पुढे छत्रपती झाला. तर आपली काहीच किंमत राहणार नाही. असे मंत्रीगणांना वाटले आणि मग सुरू झाली ती फंद फितुरी. चारित्र्य नासविण्याचे प्रकार.
काही इतिहासकारांनी आणि चित्रपट कर्त्यांनी जनमानसात पोहोचवले संभाजीचे “रगेल आणि रंगेल”व्यक्तिमत्व . त्यासाठी निर्माण केली लागणारी विविध स्त्रीपात्र. मोहित्यांची मंजुळा ,थोराताची कमळा ,दुर्गा सारखी. संभाजी महाराजांनी त्रास दिल्यानंतर थोरात यांच्या कमळाने आत्महत्या केली. त्या समाधीवर 1698 हे साल लिहिलेले आहे .जेव्हा की संभाजी महाराजांचा मृत्यू 1689 मध्ये झालेला होता. किती कुटील आणि घाणेरडे प्रकार.
संभाजी महाराजांनी दिल्लीवर भगवा फडकवण्याची आणखी एक महत्वाकांक्षी योजना बनवली होती. त्यामध्ये औरंगजेबाला फितूर झालेला त्याचा शहजादा अकबर होता. महाराजांनी अकबराला राजापूरच्या बंदरातून बोटीत बसवले तिथून अकबर इराणच्या शहाची मदत घेऊन औरंगजेबाच्या विरुद्ध 70 हजाराची फौज घेऊन येणार. ही बातमी कळताच औरंगजेब गोवळकोंडातून माघार घेऊन सरळ दिल्ली साठी रवाना होणार. पहिला उद्देश म्हणजे महाराष्ट्रावरून औरंगजेबाचे लक्ष उडणार आणि दिल्लीला वापस जाताना संताजी घोरपडे काही निवडक फौजेसह उत्तरेतच थांबवून ठेवले होते. ते औरंगजेबाची वाट अडवणार. त्यांना संभाजी महाराज नव्या दमाच्या फौजे सह साथ देणार. परंतु अकबराचे जहाज भरकटले आणि इराणला पोहोचण्याऐवजी मस्कतला पोहोचले. तब्बल सहा महिने शहजादा अकबर मस्कत मध्ये अडकला. अर्थात अकबर इराणला पोहोचण्याआधीच इकडे पण फितुरीने संभाजी महाराजांना अकबराने कैद केले होते.
कारण कणभर स्वराज्याला आणि त्याच्या राजाला आपण उघड्यावर पराभूत करू शकणार नाही .हे औरंगजेबाला कळून चुकले होते.
पुढे 40 दिवस औरंगजेबाने शंभूराजांचा अनन्वित छळ केला. विदूषकाचे कपडे घालणं ,दाढी मिशा कापणे, काटेरी साखर दंड, डोळे सळईंनी भाजणे ,जीभ कापणे, शरीराची त्वचा सोलवटणे, त्यावर मिठाचे पाणी फेकणे, जिवंतपणे मरण यातना सोसायला लावणे. यातून औरंगजेबाची बरबर्ता ,राक्षस मानव, पशु मानव असल्याचे पुरावे औरंगजेबाने सर्व जगाला दाखवले.

संभाजी महाराजांनी हे सर्व सहन केले कारण ते काळाच्या खूप पुढे निघून गेले होते.शरीर बंधनाच्या पुढे. माझ्या शरीराला कोणीही बंधन घालू शकतो .परंतु परिस्थिती ठरवणार नाही ,की माझी मनस्थिती मी काय ठेवावी? शरीराच्या सीमेतून या शंभू ने स्वतःला मोकळे केले होते. कारण रामकृष्णांच्या कथेतून जिजाऊंनी सांगितलेली शिकवण की तू अक्षय,असीम बल शक्ती संपन्न आहेस. ही त्यांनी धारण केली होती.
हा शंभू तर शिवभक्त होता तो त्याच्या असीम भक्तीने शिवाशी कधीच एकरूप झाला होता. आणि विचारत होता आपल्या देवरूपी पित्याला “यालाच समर्पण म्हणतात ना?”
औरंगजेब रुपी काळाने केलेली क्रूरता आणि मृत्यू च्या नागव्या नाचाला .तेवढ्याच परिपक्वतेने निर्भयपणे सामोऱ्या जाणाऱ्या शिवबाच्या या संभाने कालातीत समर्पण केले. त्यातून हजारो नी स्फुल्लिंग घेतले ज्यांनी पूर्ण काळाचे दफन केले.
देखणे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाही शुभ्र पाऱ्या सारखे
देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा.

llश्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे

7 Responses

  1. खूप अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेख

  2. अभ्यास असेल तरच लिखाणाला दर्जा प्राप्त होतो.तुझ्या लेखातून खूप छान माहिती,ज्ञान मिळते.प्रत्येक च लेख दर्जेदार असतो.वाचून समाधान मिळते.पुढील लेखना करिता शुभेच्छा! 👍👏🥰

  3. अतिशय सुंदर लेख आहे अश्विनी you are great 👍 👌 खूप छान वाचन आहे तुझे म्हणून लेखन पण छान आहे लोक रिल पाहतात पण छान लेख वाचत नाही पण तू आमच्या साठी लिहीत जा 🥰

  4. खूप छान, प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण लेख.तुझी लिखाणाची शैली इतकी ओघवती आहे की वाचताना काळाची काही पाने डोळ्यासमोरून सरकन सरकून गेल्याचा आभास झाला.अशाच उत्तमोत्तम लेखांच्या आणि तुझ्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत……..

  5. खूप सुंदर गुंफण शब्दांची,
    छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र शब्दांत बांधणे अवघड,
    नुसते वाचले तरी रक्त सळसळते.
    लिखाणाची ओघवती भाषा,
    थोडक्यात संपूर्ण आढावा घेतलेला आहे.
    खूप आवडले.

  6. खूप खूप अभिनंदन 👏👏
    खूपच छान आहे.
    आणखी मी काय बोलू,तूझ्या पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा …..

  7. अभ्यासयुक्त लेख.. प्रत्येकाने वाचाव असा लेख आहे.

Leave a Reply to Megha Dhongle Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *