wondervoices

काया पालट

पौराणिक कथांमध्ये सूर आणि असूर हे दोन शब्द वारंवार येत राहतात .सूर आणि असूर हे शरीर गत नसून वृत्तीगत शब्द आहेत.ज्याला निर्मात्याची अनादी ,अनंत सत्ता मान्य नाही. त्याला असुर असे संबोधत आणि ज्याला मान्य आहे. तो सूर असे संबोधले जात असे.

होलिका दहनाची पुराणांमध्ये एक कथा आहे. जी बहुतांश लोकांना माहीत आहे. असुर श्रेणीतील हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होऊन गेला. जो आपल्या तपसाधने चे फळ म्हणून श्री ब्रह्मदेवांकडून अमर होण्याचे वरदान मागू लागला. जेव्हा ही अमरता ब्रह्मदेवांनी नाकारली. त्यावेळी तो त्यांच्याकडून असा वर प्राप्त करण्यात यशस्वी झाला .की ,माझा मृत्यू अशा समयी व्हावा जेव्हा ना दिवस असेल, ना रात्र. न माझा मृत्यू पृथ्वीवर होईल ना आकाशात. ना घरात न दारात. न मला राक्षस मारू शकतील न मनुष्य. ना कुठलाही जीवजंतू. ना देवी ना देवता. एकूण आता त्याला असे भासत होते की, माझ्यावर कधी मरण्याची वेळ येणारच नाही. त्यानंतर प्रत्यक्ष निर्मात्याकडून प्राप्त करून घेतलेल्या शक्तींचा गैरवापर हिरण्यकश्यप करू लागला. संपूर्ण राज्याला विष्णू नाम घेण्यास आणि विष्णूची पूजा करण्यास मनाई करण्यात आली व केवळ त्याची स्वतःची म्हणजेच राजाची पूजा करावी असे आदेशित केले.

मात्र अशा राजाच्या पोटी कट्टर विष्णू भक्त पुत्र जन्माला यावा केवढा हा नियतीचा विरोधाभास. राजाने पूर्ण राज्याला देवी देवतांची पूजा करण्यापासून रोखणारा, स्वतःच्या मुलाला विष्णूची पूजा आणि विष्णूची भक्ती करण्यापासून रोखू शकला नाही.

प्रल्हाद नावाचा त्याचा मुलगा अतिशय श्रद्धावान होता.
हिरण्यकशपाचे असे म्हणणे होते की तु ज्या विष्णूचा धावा करतो . तो तुला वाचवायला कसा येतो? हेच मी बघतो म्हणून प्रल्हादाला मारण्याचे वेगवेगळे प्रयत्न हिरण्यकश्यप करायला लागला.
आपला मुलगा आपल्या राज्यात आपण बनवलेल्या कायद्यांचे पालन करी त नाही .त्यामुळे असा मुलगाच मला नको. म्हणून त्या मुलाच्या वध करण्याचे वेगवेगळे प्रयत्न त्यांनी केले सगळ्यात शेवटी त्याला स्वतःच्या बहिणीची आणि तिच्याकडे असलेल्या शालीची आठवण झाली . होलीके कडे अशी शाल होती .जी पांघरली असता, अग्नी पांघरणाऱ्या व्यक्तीला जाळू शकत नाही. म्हणून हिरण्यकश्यपाने प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी होलीके ला दिली.

तीने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसावं त्यामध्ये प्रल्हाद मरून जाईल आणि होलिका तशीच बाहेर येईल. अशा अंदाजाने संपूर्ण रूपरेषा आखण्यात आली. मात्र झाले नेमके उलटेच होलीके च्या अंगावरची शाल हवेने भक्त प्रल्हादाच्या अंगावर आली आणि होलिका चे मात्र दहन झाले.

नंतर हिरण्य कश्यप राजाचा वध आणि ठिकाण याविषयी ची कथा सर्वश्रुत आहेच.

फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा होळी हा सण. यावेळी ब्रह्मांडामध्ये सर्व ग्रह नक्षत्रांची रचना एका वेगळ्या पद्धतीने स्थिती झालेली असते. ज्या स्थितीमुळे परिवर्तनात्मक ऊर्जा.(Trasformatory Energy) निर्माण होते . आपल्या सर्वांना माहीत असल्याप्रमाणे भौगोलिक स्थितीचा उपयोग मनुष्य उत्थानासाठी कसा करावा ? यासंबंधी भारतीय संस्कृतीमध्ये बराच अभ्यास झालेला आहे .सूर्य हा आत्म्याचे प्रतीक मानल्या जात असून चंद्र मनाचे प्रतीक मानल्या जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीच्या उत्तर फाल्गुनी नक्षत्रात तर सूर्य त्याच्याबरोबर समोर 180 अंशामध्ये मीन राशीच्या उत्तर भद्रावती नक्षत्रात असतो. चंद्र सूर्याच्या अशा स्थितीमुळे रूपांतरण ऊर्जेचे (transformation) क्षेत्र संपूर्ण आसमंतात निर्माण झालेले असते.

या दिवशीचा उपयोग आपल्या सर्वांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या आपल्या स्वतःच्या सवयी, आपल्या स्वतःच्या मान्यता ,आपले सर्वांचे कम्फर्ट झोन आणि आपल्या जगण्याच्या पद्धती हे सर्व आपल्यासाठी उत्थान करणाऱ्या न ठरता, आपल्या विरुद्ध काम करणाऱ्या ठरत असतील तर (distructive behavior) अशा गोष्टींपासून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे होळी. (Holi)

वर नमूद केलेली होली का दहनाची कथा ही प्रतिकात्मक आहे. आपण कितीही साधक असलो निर्मात्याचे सेवक, पूजक असलो असे जगाला दिसत असले तरीही, आपण काय आहोत हे आपल्याला माहित असतेच.तरी जर का आपल्यामधील अहंकार (स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे किंवा दाखवण्याची वृत्ती)गेलेला नसेल तर आपलीसाधना सत्यासमोर नम्र न होता ,समर्पित न होता ,मिळालेल्या फळाचा उपयोग स्वार्थ साधण्यासाठीच करू शकतो हे हिरण्यकश्यपाच्या वागणुकीने सिद्ध होते.

आज आपण प्रत्येक जण आपल्या जीवनात संघर्ष करून पुढे येतो. ते कशासाठी हिरण्यकश्यपा सारखी सत्ता चालवण्यासाठी की अमरत्व मिळवण्यासाठी याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे होळी.

साधना रूपाने मिळालेले वरदान जर चुकीच्या हाती पडले तर त्यातून काय निष्पन्न होऊ शकते. ते सर्वनाशापर्यंत कसे जाऊ शकते. हे होलीकेच्या कथेतून समजून घेण्याचा दिवस म्हणजे होळी.

होळी आणि रंगोत्सव म्हणजे संबंध चांगले करण्याचा सण. एका अर्थाने सत्य काय ? त्याच्याशी माझ नातं काय ?जसा प्रल्हादाने निर्णय घेतला. की हिरण्यकश्यप हे जरी माझे वडील असले ,तरीही परम सत्य हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. परम सत्य म्हणजे निर्मात्या प्रती असलेली माझी निष्ठा माझी भक्ती.

आपण आज आपली स्वतःची लिटमस टेस्ट करू शकतो माझी भक्ती कोणत्या स्वरूपाची आहे? जेव्हा की अर्धा सोशल मीडिया किंवा सामाजिक कार्यक्रम भक्तीमय झालेले आहेत.माझं या निसर्गाशी/ निर्मात्याशी नातं काय? मला काय महत्त्वाचे आहे? असे निर्णय घेण्याचा दिवस म्हणजे होळी.

तिसरी लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे होलिका कडे असलेली शाल. जी हवेने प्रल्हादाकडे उडून येते आणि तो वाचतो. यातून प्रतीत होणारा अर्थ एकच. कितीही वाईट प्रवृत्ती ने चांगल्याला प्रवृत्तीला मारण्याचा प्रयत्न केला तरीही चांगल्या गोष्टींचा प्रभाव वाईट प्रवृत्तीवर पडल्यानंतर वाईट ,वाईट राहत नाही. इथे वाईट हा असत्य या अर्थाने घेतलेला आहे. शाल उडून प्रल्हादावर येऊन पडली याचा अर्थ शाल उडून आणणारा वायू हा विचार वायू आहे. जो चांगल्याने प्रभावित होऊन त्यातली खल प्रवृत्ती निघून गेली. आणि होलिकेने प्रल्हादाला वाचवले.

आजचे जे युग आहे. याच्यामध्ये चतुर पणाला फार महत्त्व आलेले आहे .परंतु या होलिकेच्या कथेतून असेही सिद्ध होते की चतुरता (चलाखी)ही नित्य सत्य गोष्ट नाही. त्यामुळे ती नष्ट होणारच आहे. जे सत्य आहे .जे मूळ आहे. तेच शाश्वत आहे. आणि ते म्हणजे निष्पापता, निरागसता. तेच टिकेल कारण तेच सत्य आहे.

सर्वात महत्त्वाची आणि शिकण्यायोग्य गोष्ट हीच आहे की ज्याच्यापासून सर्व काही मिळालेले आहे .त्यानेच शक्ती संपन्न केलेले आहे. त्याचीच ऊर्जा त्याच्याच विरुद्ध वापरणे ह्यापेक्षा खल प्रवृत्ती ती काय?

अशा सवयी प्रत्येकातच आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यात बदल करण्याची इच्छा आहे का? हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. फक्त एकच करावे लागेल. माझ्यात काय वाईट आहे ? याचा जास्तीत जास्त शोध घेण्यापेक्षा.

माझ्या आयुष्यात सार्थकता कशाने येईल ?त्याकडे लक्ष केंद्रित करणे हा असून ,त्यामुळे माझ्यामध्ये असलेली निरर्थकता आपोआप गळून पडेल. ही ज्ञानसाधना आत्मसात करावी लागेल.

अशा गोष्टी आत्मसात करण्याची आणि ब्रह्मांडात अशा परिस्थिती उपलब्ध असण्याच्या विपुल संधी मानवाकडे उपलब्ध आहेत फक्त त्यांनी त्याकडे ज्ञानदृष्टीने बघणे गरजेचे आहे.

होळी आणि रंगपंचमी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा माझ्यातील असत्व निघून जात. माझ्यावर साचलेली मलीनता निघून जाते .तेव्हा माझ्याकडे उरते काय? तर माझ्याकडे उरतात जगण्याचे मूलभूत सिद्धांत अर्थात पवित्रता, प्रेम ,आनंद आणि ज्ञान.

होळीच्या अग्नीमध्ये अनावश्यक गोष्टी जेव्हा जळून जातात तेव्हा या मूलभूत सिद्धांतांचा रंगोत्सव सुरू होतो समानतेच्या पातळीवर.

दुसरी आख्यायिका या होळीशी निगडित आहे ती म्हणजे सर्वांची प्रिय कृष्णाची रासलीला. असे म्हणतात की रासलीलेमध्ये सर्व गोपी ह्या प्रकृती होऊन जातात आणि कृष्ण एकटाच पुरुष म्हणून तिथे राहतो. सर्व गोपींच्या प्रेमरूपी समर्पणातून त्या आत्मज्ञानाच्या स्थितीला प्राप्त होतात. आणि परमात्म्याशी एकाकार होतात.जेव्हा भगवान शंकरांना हे कळते तेव्हा तेही रासलीला पाहण्याचा मोह टाळू शकत नाही त. परंतु रासलीले मध्ये सहभागी व्हायचे असेल तर भगवान शंकरांना गोपीचे रूप घेणे आवश्यक असते.

याचाच प्रतिकात्मक अर्थ असा गोपींचे कृष्णाच्या प्रती पूर्ण समर्पण असतं भक्ती रूपाने म्हणा की प्रेम रूपाने. आणि तोच आत्मज्ञानाचा मार्ग आहे.

याचाच मानवी जीवनातील अर्थ असा की केवळ ज्ञानाने आत्मज्ञान होऊ शकत नाही .तर केवळ समर्पणानेच आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आणि समर्पणासाठी स्त्री हृदय असण्याची गरज असते. बिना समर्पण जेव्हा भगवान शंकरही आत्मज्ञानास पात्र ठरले नाहीत तेव्हा तुमची आमची काय कथा?

मामा कंसाचा वध करण्यासाठी भगवान कृष्ण गोकुळातून वृंदावनास येण्यास निघतात. तेव्हा राधा भगवान कृष्णांना म्हणते. कान्हा माझ्याशी विवाह केला असता तर मीही तुझ्यासोबत येऊ शकले असते. पाठमोरे कृष्ण जेव्हा राधेकडे वळून पाहतात. तेव्हा राधेला राधाच दिसते.

कारण ज्ञानच प्रेम आहे आणि प्रेमच ज्ञान आहे.
हेच मानवी आयुष्याचं अंतिम सत्य आहे.

!!श्री माऊली चरणी अर्पण!!

अश्विनी गावंडे

30 Responses

  1. अविनाश यशवंतराव मोहिते. सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक says:

    किती छान विश्लेषण केले ताई… होळी आणि रंगपंचमी नेमकी काय? अगदी शास्त्र कसं छान समजावून सांगितले… सध्या मौजमजा ऐवढाच अर्थ काढला जात आहे… असू द्या तो आपला विषय नाही… But you explained it in a proper way….

  2. खूप सुंदर अश्विनीताई!!
    पौराणिक आणि आधुनिक काळाची सांगड छान पद्धतीने घातली आहेस आणि त्याचे शास्त्रीय विवेचन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केले.
    “आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन म्हणजे होळी”
    आजचा लेख मला खूप आवडला.

  3. Khup ch sundar atishya sundar Varnan kele aahe shale chya group vr takle mulana upukt mahiti aahe
    Best 👌 👍

  4. खूप सुंदर लेख आहे अश्विनी मॅडम, खूप छान लिहिता तुम्ही .होळीचे महत्त्व नव्याने पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने समजलं……..

  5. पूर्वजांचे परंपरेने सण साजरे करण्यामागील शास्त्रीय ज्ञान व निसर्गाचा संबंध आज पुन्हा एकदा या लेखाव्दारे सिद्ध होत आहे.

  6. खूप छान . होळी चे महत्व खूप छान पद्धतीने मांडले

  7. ताई तुमच्या प्रत्येक लेखाप्रमाणेच हा लेख सुद्धा खुपच तात्विक , सखोल,आणि विचारप्रवृत्त करणारा आहे. अप्रतिम लेख 👌🏻👍🏻🙏🏻

  8. खुपच सुंदर, होळी आणि रंगपंचमी एका नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत फारच अप्रतिम लिहिले आहेस. अहंमपणाचा त्यागानंतर उरणारा निखळ आनंद म्हणजे सप्तरंगांची उधळण.खरचं आपल्या पुराणातील प्रत्येक गोष्टीत किती मर्म दडलं आहे जे त्रिकालाबाधित सत्य आहे.आजचा लेख मला खुपच आवडला.

  9. लेख ला साजेस त्याच नाव व चित्र खुप काही सांगुन जाते

  10. समर्पणातून आत्मज्ञानाची प्राप्ती होते खूपच सुंदर आणि प्रगल्भ विचार आहेत आणि हेच त्रिकालाबाधित सत्य आहे खूपच छान लेखन, धन्यवाद Mam 🙏🙏💐💐🌹🌹

  11. कार्य करता करता दोषारोप होणार नाही याची काळजी घेत प्रेमभाव जोपासत जीवन सफलता कशी प्राप्त होईल याची दिशा देण्याचे काम या लेखाने केले अश्विनीताई खरचं अगदी👌

  12. हा लेख फक्त होली दहनाचे व धुळवड चे महत्व मांडणारा आहे असे नाही तर त्यानिमीत्याने केलेले हे लेखन अध्यात्म्याचे सुंदर व सतत वाचत रहावे असे वाटणारे निरुपण आहे … सुंदर

  13. अश्विनीताई तुमच्या ज्ञानाला सलाम 👏👏👏आत्मज्ञान आणि समर्पण खूप छान विश्लेषण केलं,…… “ज्ञान हेच प्रेम आहे आणि प्रेम हेच ज्ञान आहे ” जगण्याच अंतिम सत्य सांगितलं किती सहजतेने…. 👏

    1. Excellent essay !! Great knowledge about Indian culture and festivals. It really requires deep understanding of science and facts behind religious beliefs.

  14. किती छान लिहिता ! समृद्ध लेखन!ज्ञान आणि प्रेम, राधाकृष्ण, शिवाचे उदाहरण अप्रतिम!एक वेगळीच अनुभूती.खऱ्या अर्थाने कायापालटासाठी आत्मचिंतन!

  15. अतिशय उत्तम , अभ्यासपूर्ण लेख.लेखाचे शीर्षकही अत्यंत चपखल आणि मार्मिक.स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करायला विचारप्रवृत्त करणारा लेख.राधाकृष्णाच्या एकरूपतेचे लेखातील उदाहरण तर अप्रतिमच! तुझ्या लिखाणाची ताकद ही आहे की, क्षणभर राधाकृष्ण डोळ्यासमोर दिसल्याचा भास झाला . अशीच लिहीती राहण्यासाठी श्री योगेश्वराची आणि ज्ञानियांच्या राजाची तुझ्यावर कृपादृष्टी राहू दे.

  16. आपण सर्व विभूतींनी माझा लेख वाचला वेळात वेळ काढून प्रतिसाद दिलात ज्यामुळे माझ्यातील उत्साह वृद्धिंगत झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद. आणखी अशाच प्रकारे आपल्याला आनंद देण्याचा माझा प्रयत्न ईश्वराच्या कृपेने मी सतत सुरू ठेवेल.

  17. आपल्याला आलेल्या अनुभुतीचे हे लेखन . माझ्या साठी जीवन जगतांना हे लेखन प्रेरणा येत राहील . केवळ वाचून चालणार नाही तर यातील माहीत जीवनात उतरवावी लागेल .

  18. आदरणीय अश्विनी ताई,
    सप्रेम जय हरि!!!
    कायापालट वाचता वाचता हृदयपरिवर्तन कधी होऊन जातं हे समजतच नाही.पुराणातील दाखले दृष्टांत रुपाने देवून आपले मनोगत वाचक चाहत्यांचे मन केंद्रीत करणे आणि त्यांच्या मनाचा अचूक ठाव घेणे हे सादरीकरणाचं
    कौशल्य तुझ्या रक्तातच आहे.विज्ञानाची कास वरून विज्ञानाच्या युगात लोकांना आपल्या प्रत्येक सणांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचं पवित्र कार्य तुझ्या कडून वेळोवेळी होत आहे.असेच प्रत्येक सणांचं मौल्यवान सादरीकरण लिखित स्वरूपात करून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेलच यात शंका नाही.ज्ञानदेवतेचा वरदहस्त तुझ्या मस्तकावर सतत राहो हिच आमची मनोमन इच्छा.
    शुभं भवतु!!!
    तुझा स्नेहांकित,
    बळी काका, खालापूर रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *