wondervoices

सीमोल्लंघन

पाच हजार वर्षाची संस्कृती असणाऱ्या भारत वर्षाला स्त्री कर्तुत्वाची एक जाज्वल्य परंपरा लाभली आहे . किंबहुना खरोखरच स्त्री-पुरुष सोबत चालत भविष्य घडवीत असण्याची ही प्रक्रिया होती.  म्हणूनच स्त्रीच्या हातूनही असे कर्तृत्व घडत होते .जे तिला पूजनीयत्व प्रदान करत होते .

बाह्य कर्तृत्व हा अंतर्गत ज्ञानाचा परिपाक असतो .जे भारताच्या पौराणिक काळापासून  गार्गी , मैत्रेयी  च्या रूपाने उजळून निघाला. तो आजतागायत वेगवेगळ्या स्त्री कर्तुत्वाच्या रूपाने आपण बघतो आहोतच.

स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीवाद या दोन्ही संकल्पना आपल्यासाठी अलीकडच्या काळातील नाहीत. आधीच्या शतकातील संत परंपरेतील स्त्रियांचे साहित्य आणि स्त्री विचाराचा गाभा आपल्यासमोर प्रकट करतात .त्याहीपूर्वी संत मीराबाई जगण्याची उत्कटता प्रकट करून गेल्यात. राबियापासून ते आधुनिक काळातील ज्ञात जिजाऊ ,येसूबाई ,ताराराणी ,झाशीची राणी यांच्यापासून तर सावित्रीबाई फुले ,आनंदीबाई जोशी यांच्याही पासून तर आज पर्यंतच्या कल्पना चावला पर्यंत अगदी……. आणि अशा अनेक अनामवीरा आहेत की ज्यांच्या खांद्यावर मानव परंपरा आणि इतिहास बनत आहे आणि यापुढेही बनत राहणार.

पण खरं पाहू जाता आज एकविसाव्यां शतकाची पंचवीस वर्षे उलटून गेली असताना, त्या जाज्वल्य परंपरेचे आम्ही पाईक आहोत. हे आपण म्हणू शकतो का?

आजच्या भारतात समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क ,अन्याय अत्याचारा विरुद्ध लढण्याचा हक्क, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा हक्क, घरगुती हिंसाचारा विरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता देणारा कायदा, हुंडाबळी, बाल भ्रूण हत्या ,बालविवाह विरोधी कायद्या या सर्व कायद्यांची लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहेत.

आजही भारतातील 70% स्त्रिया घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत . सन 2020 मध्ये 31000  बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 90% गुन्हे तर जवळच्या, ओळखीच्या, परिचयातील लोकांच्या नावावरच आहेत.

लेखिका अमृता प्रितम म्हणतात “स्त्री ही तिंबलेल्या कणिके सारखी असते घरी ठेवली तर उंदिर खातात आणि बाहेर ठेवली तर कावळे चोची मारतात .”

यापैकी कुठलीही आकडेवारी मनघडण नाही .इंटरनेटवर सर्व उपलब्ध आहे. सरकारी आकडेवारी सांगते की सन 2000 ते 2019 या वर्षात किमान नऊ दशलक्ष स्त्रीभ्रूण हत्या करण्यात आल्या. भारतीय लोकसंख्येत 48% वाटा असणाऱ्या स्त्रिया ह्या  आजही ,आजच्या आधुनिक शतकात दुय्यम स्थानी आहेत .देशाच्या समाजाच्या आणि परिवाराच्या सुद्धा.

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं. ते भारतीय नागरिकांना रोज मारून टाकत नव्हते. तर ते भारतीयांना समानतेने वागवत नव्हते. अन्याय ,अत्याचार, शोषण करत होते. मानव म्हणून किमान जगण्याचा हक्कही देत नव्हते. मग एवढ्या महत्त् प्रयासाने  स्वातंत्र्य मिळवले. आणि आज स्वतंत्रता मिळून 70 ते 75 वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरी आम्ही आमच्या स्त्रियांना तीच वागणूक देत असू ,जी आम्हाला इंग्रजांनी दिली तर मग स्वतंत्रता मिळवून तरी आम्ही काय मिळवलं .?

एकूणच असं झालंय की

Hey women we can’t live with you

And we can’t live without you.

अशा वैचारिक जडणघडणीतून प्रवास सुरू आहे. संपूर्ण भारतीय मानसिकतेत एक वैचारिक जर्जरता आली  आहे.  कारण मानवी जीवनात त्याच्या विचाराचे  प्रतिबिंब  उमटते असते. ते प्रतिबिंब आजच्या या घडीला जिथे तिथे दिसत आहे .

तरीही आम्ही मात्र त्यातले नाही . आम्ही विचारांनी आधुनिक आहोत .स्त्री पुरुष समानतेचे खंदे पुरस्कर्ते आहोत हे पटवून देता देता शब्दबंबाळ झालो आहोत. पण म्हणतात ना “कोंबड झाकल्याने उजाडायचं थांबत नाही.”

म्हणूनच या वळणावर थोडं थांबून चिंतन करण्याची गरज आहे .ज्या विचारांनी मी जगतोय त्याचा अर्क कुठून उतरलाय. आज त्याचा उहापोह करणे गरजेचे आहे. कारण विचारच माणसाचं जगणं आहे. माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता ही माणसाच्या विचारांवर अवलंबून असते. हे वैचारिक ऑडिट केल्याशिवाय, त्याचे उत्तर दायित्व स्वीकारल्याशिवाय , जे घडतंय त्याची पूर्ण जबाबदारी घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नाही.

इथे तीन संकल्पनांचा आपण मागोवा घेऊ ज्यातून आजची समाज रचना घडली आहे.

एक आहे पितृसत्ताक पद्धती शब्दकोशानुसार याचा अर्थ असा की ,अशी समाज रचना ज्यामध्ये स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व असते अर्थात पुरुष प्रधान व्यवस्था.

दुसरी संकल्पना आहे .मातृसत्ताक पद्धती याचा अर्थ अशी समाज रचना ज्यामध्ये पुरुषांवर स्त्रियांचे वर्चस्व किंवा नियंत्रण असते अर्थात स्त्रीप्रधान व्यवस्था.

या दोन्ही संकल्पना एकमेकांच्या विरोधी संकल्पना आहेत. ज्यांच्या विचारधारा एकमेकांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतात. एवढेच नाही तर त्याचे शोषण करतात .

तिसरी संकल्पना म्हणजे स्त्रीवाद. (Feminism) स्त्रीवाद या संकल्पनेचा अर्थ असा की ज्यामध्ये स्त्री-पुरुष यांच्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता असावी अर्थात महिलांना ते सर्व अधिकार आणि संधी मिळाव्यात ज्या  सर्व पुरुषांना मिळतात.

पितृसत्ताक आणि मातृसत्ताक सामाजिक जीवन पद्धतीच्या विचारधारेने स्त्रिया आणि पुरुष यांच्या जीवनाचा किती नाश झालाय हे समजून समजून उगम पावलेली हा स्त्रीवाद.( feminism)

कोणत्याही अर्थात पितृसत्ताक किंवा मातृ सत्ताक  संकल्पनेच्या विचारधारेतून निघालेल्या समस्या या वैश्विक आहेत .भारतही ह्या विश्वाचाच एक भाग आहे. त्यामुळे आमचा धर्म ,आमची परंपरा ,आमची संस्कृती वेगळी याचा जास्त खोलवर विचार करण्यापेक्षा त्याचे प्रतिफल “मेरे साडी से उसकी साडी सफेद कैसी?”एवढेच आहे. असे माझ्या अल्पमतीला वाटते. (त्यातून दुसरी शक्यता अशीही आहे की ,कुठल्याही गोष्टीला धर्माचे नामाभिदान दिले की मग आपण काहीही करायला मोकळे होतो.)

संस्कृती ही धर्म , रूढी ,प्रथा,  परंपरा,  यांनी बनलेली असते. संस्कृती मृत नसते. ती प्रवाही असते आणि काळ- वेळा सोबत अनुकूल बदल करत जाणारी असते.

Culture is not dead thing it changes with time.

आणखी महत्त्वाचे म्हणजे

culture cannot make human beings human being makes the culture.

आपल्या समाजात स्त्रियांच्या सपोर्टिव्ह रोल विषयीची जास्त चर्चा असते. तिचे मूल्यमापन नेहमीच तिच्या भूमिकेच्या संदर्भात केले जाते. मग ती भूमिका आईची ,बहिणीची ,बायकोची ,मुलीची किंवा कोणाचीही असो. स्त्रीच्या वैयक्तिक क्षमता तिचे वैयक्तिक कर्तुत्व यावर कुठेच भाष्य नसते. आणि यावर तुला तुझे असे मूल्यमापन झाले तर चालते का? याची तिला कोणी विचारणाही  करीत नाही. एखाद्या वेळेला तिने नाही म्हटले त्यापेक्षा तिला सरळ देव्हाऱ्यातच नेऊन ठेवायचे. तसे संस्कृतीच्या नावाखाली केलेलेच आहे.कदाचित पहिल्या प्रथम संस्कृतीचे स्वरूप तसे असेलही . परंतु आता एकूण तिला मानव म्हणून जगणेच नाकरायचे.

दर्जा पारलौकिक काम लौकिक आणि वागणूक मात्र पशुपेक्षा ही खालची.

कोणत्या विचारधारेचा परिपाक आहे हा? हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जाते.

निसर्गाने स्त्री-पुरुषांमध्ये भेद निर्माण केले. ते त्याचे उत्पादन चक्र पूर्ण करण्यासाठी .ते हे दाखविण्यासाठी नाही की, कोण हुशार आणि कोण मूर्ख? कोण कार्यक्षम कोण अकार्यक्षम? कोणाची निर्णय क्षमता चांगली कोणाची वाईट ?कोण घर चालवेल आणि कोण विमान?

निसर्गाने भेद निर्माण केला हे खर आहे. पण आपण त्याला भेदभावात रूपांतरित केलं. कोणती विचारधारा आहे ही? …..

“स्त्रीचा परिवार ज्यात आनंदी तोच तिचा आनंद.” “परिवाराचे जे सुख तेच तिचं सुख,” ” आई झाल्याशिवाय स्त्रीचा जन्मच परिपूर्ण होऊ शकत नाही, ” ” तिला घराबाहेर निघून करिअर बनविण्याची गरज आहे? ” “कामापुरता शिकलं बस झालं. ” “पतीचे चरण हाच तिचा स्वर्ग, ” “मुलगी शिकेल तर हातातून निघून जाईल. ” मुलीला घरगुती सुशील कन्या असायला पाहिजे. वरील सर्व वाक्य स्त्री विषयी समाजाने आधीच ठरवून ठेवलेले आहेत. तेच तिचे मार्गक्रमण आहे. कोणती विचारधारा आहे ही?……

एक आदर्श सून कशी असली पाहिजे? हे आमच्या मालिका ठरवायला लागल्याआहेत. त्याचा परिणाम असा झाला की, खूप सार्‍या मुली या आदर्श प्रतिमेसाठी स्वतःला योग्य बनवायला लागल्या. हे त्या यासाठीही करतात की, त्यांना घर -परिवार ,समाजाकडून स्वीकार हवा असतो. त्या स्वतःला जशा आहेत तशा  स्वीकारतात की नाही हा भाग वेगळाच. कोणती विचारधारा आहे ही?……

अशा विचारधारेने फक्त स्त्रियांचीच गळचेपी झालेली आहे, असे अजिबात नाही. या विचारधारेत, या विचारसरणीत  पुरुषही तेवढाच भरडला गेला आहे.

काय मुलीसारखा रडतो ? काय मुलीसारखा वागतो ?काय मुलीसारखा घाबरतो?

लहान मुलगी घरात असेल तर ,तिचे खेळ सगळे काळजीवाहू , साथसोबत करणारी ,सोशिक आणि घरात जर मुलगा लहान असेल तर सगळे खेळ आक्रमक आणि स्पर्धात्मक. अर्थात ही त्या मुला मुलींची निवड नसतेच  ती बनवल्या जाते . कोणती विचारधारा आहे ही?……

मुलीने मुलासारखे कपडे घातले तर चालतात. पण मुलाने मुलीचे कपडे घातले तर चालत नाही. हे सर्व म्हणत असता वागत असताना घरातील ती छोटी मुलगी बघत असते. आपल्यासारखं करणं वागणं काहीही चांगलं नाही. हे  जेव्हा ती ऐकते तेव्हा ती स्वतःचा धिक्कार करणार नाही तर काय? मग कुठे आदर्श सून बनून समाज आणि परिवाराला स्वतःचा स्वीकार करायला लावेंल जेव्हा की तिने तिला स्वीकारलं नाही. कोणती विचारधारा आहे ही ?…..

मुलांना सगळीकडे स्वातंत्र्य. मुलींना सगळीकडे नीती नियम. तो सहज गल्लीत लघुशंका करू शकतो. पण ती स्कर्ट घालून सहज गल्लीत फिरू शकत नाही. अशावेळी सहज या सर्व बाबींना विरोध करणारी मुलगी तयार होते आणि मुला समान होण्यासाठी विचित्र प्रयत्न करू लागते.  त्यातून तिची स्वातंत्र्य आणि स्वैराचाराची सीमारेषा पुसट होते आणि पुन्हा तिच्यावर नियंत्रण राखण्याची गरज अधोरेखित केल्या जाते. कोणती विचारधारा आहे ही ?….

स्त्रीची अब्रू हे तर सर्वांकडे उपलब्ध असलेल धारदार शस्त्र. एकदा त्याची कास धरली की तिला सर्व बाजूंनी निरुत्तर  केलं की कामच झालं. कोणी ठरवले स्त्रीची अब्रू कुठे आहे? कोणती विचारधारा आहे ही ?……

तिच्याशी न केलेल्या संवादातूनही तिचा दर्जा अधोरेखित केला जातो. मालक,पती ,परमेश्वर, शोहर ,स्वामी , हजबंड (husband meaning the person who tammed women, or who domesticated women.) अशी नामाभिदान दिली जातात . कोणतीही स्त्री जीवन व्यतीत करते या सर्व अधिपत्यांच्याखाली. कोणती विचारधारा आहे ही?…….

लग्न समारंभात एक तरी असा विधी असतोच जो स्त्रीला तिचा दर्जा दाखवून देतो. की आम्ही तुला काय समजतो? भलेही तू स्वतःला काहीही समज. उदाहरणार्थ कन्यादान विधी. ती काय वस्तू आहे ?दान करायला. कोणती विचारधारा आहे ही?……

वडिलोपार्जित संपत्तीत समान वाट्याची भागीदार असलेली. तिच्या लग्नप्रसंगी तिला फक्त पाच टक्के हिस्सा देऊन मोकळे होतात सर्वजण. माहेर आणि सासरचे दोन्ही म्हणतात ते पैसे तिचेच आहेत. स्त्रीधन नाव आहे त्याला .पण खर्च करण्याची जेव्हा वेळ येते. तेव्हा तो तिचा अधिकार राहत नाही. कोणती विचारधारा आहे ही?. …..

माहेरच्यांसाठी कायम “तिला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे.” आणि “सासरच्यांसाठी कायम ती दुसऱ्या घरून आली आहे.” तिलाही शेवटपर्यंत स्पष्टच होत नाही की ती नेमकी कुठली.

जगण्याची मूळच नेस्तनाबूत करायची कोणती विचारसरणी आहे ही?……

हिंसा हा पुरुषी स्वभावच असतो तसा. असे सांगितले जाते. The State UK Boys Report नुसार पुरुष मोठा होताना हिंसक बनत जातो. ही सामान्य आणि अटळ गोष्ट समजल्या जाते. अर्थात पुरुषाची हिंसा नॉर्मल आहे.

असे असेल तर मग ऑफिसमध्ये स्त्री ऑफिसर असेल तर तिथे हिंसा करत नाही ?ऑफिसमधल्या स्त्री सहकारी वर  हल्ले करत नाही. घरातील आई ,काकू, मावशी ,आत्या वर अन्याय करत नाही. त्याचा स्वभावच जर हिंसक असेल तर सगळीकडे त्याचे पडसाद उमटायला पाहिजे.

पण त्याचे पडसाद तिथेच उमटतात जिथून तो सहज निसटू शकतो. कोणती विचारसरणी आहे ही?…

अशा प्रकारच्या विचारधारा ,अशा प्रकारची विचारसरणी फक्त स्त्रियांचेच नुकसान करतात असे अजिबात नाही. तर पुरुषांचेही तितकेच नुकसान झालेले आहे.

समजा एक  बेरोजगार असे चित्र तुमच्या डोळ्यापुढे आणा असे म्हटले तर कुणाचं चित्र आलं ? एका बेरोजगार युवकाचं . म्हणजे ही विचारसरणी आमच्या किती नसानसात भिनलेली आहे. एरवी असं वाटत नाही परंतु या उदाहरणाने मात्र सर्वांना स्पष्ट झालेआहे.

या विचारसरणीने कमाई करण्याची संपूर्ण जबाबदारी कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी पुरुषांवर सोपवलेली आहे. जर घरातील स्त्री पुरुष दोघेही कमावते असतील तर पुरुषांची कमाई बायको पेक्षा जास्तच असली पाहिजे ही जबाबदारी सोपवते.

या जगात कोणाकडूनही हरला तरी चालेल परंतु मुलीकडून हरायला नको. याचंच पर्यावरण पुढे ऍसिड अटॅक ,घरगुती हिंसाचार यामध्ये होते.

एखाद्या मुलीसारखा काय रडतो? किती भित्रट आहेस ?किती घाबरतो? त्याच्या भावभावना व्यक्त करायला समाजात जागाच नाही .करूच देत नाहीत. म्हणून दिवसेंदिवस जगताना पुरुष एकाकी होत जात आहे. त्यातून नैराश्य येते. आजही महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अडीच पट जास्त आहे.

कारण त्याला व्हेंटिलेशनसाठी जागाच नाही. कोणती विचारसरणी आहे ही?…….

समाजाच्या दोन्ही चाकांची नासधूस जर या विचारधारेने होत असेल, तर मग काय मिळवले आपण.

म्हणून या समाजात स्त्री असो अथवा पुरुष दोघांकडेही  बघतांना त्यांना कोणत्याही भूमिकेच्या संदर्भात न बघता वैयक्तिकरित्या त्यांच्या क्षमतांना आधार मानून बघितलं जाणं आवश्यक आहे. तरच या समाजात प्रत्येकासोबत न्याय होऊ शकेल.

स्त्रीवाद हा समान संधी समान विकास आणि समानतेची गोष्ट करतो.

Feminism not only talks about women’s right it talks about human rights.

याकरिता स्त्रियांच्या आधी पुरुषांना मानसिकरित्या स्वतंत्र करून कुटुंबाशी जोडलं पाहिजे. स्त्रीवाद हा मानवाच्या हक्काचे व्यासपीठ आहे.

वर जे काही आपण विचारसरणी आणि त्यातून झालेल्या सामाजिक घडामोडी बघितल्यात त्या सर्व पितृसत्ताक विचारधारेच्या आहेत. पितृसत्ताक विचारधारेचे  गुलाम फक्त पुरुषच नसतात तर स्त्रिया सुद्धा असतात.

स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये यासाठी जगप्रसिद्ध लेखिका मेरी ऑगस्ट अवॉर्ड यांनी आंदोलन उभी केली होती. जेव्हा समान नागरी कायद्यासाठी अमेरिकेमध्ये घटना दुरुस्ती करण्यात येत होती तेव्हा Phyllis Schlafly  यांनी आंदोलन उभं केलं होतं त्या प्रसिद्ध वकील होत्या.

आता यावर उपाय काय?

स्त्रीवाद आम्हाला नव्याने स्त्रीवाद किंवा feminism अंगी करण्याची गरजच नाही. कारण तो आमच्या संस्कृतीतच आहे. अधर्माचे निर्दालन करणाऱ्या देवींच्या रूपाने, जे मीराबाई ने केले , जे त्या त्या काळातील प्रत्येक क्रांतिकारी महिलेने केले, जे जिजाऊंनी केले, जे झाशीच्या राणीने केले ,जे सावित्रीबाई फुलेंनी केले अगदी आजपर्यंतच्या कल्पना चावलाने केले. तेच आम्हालाही करायचे आहे.

ते कसे?

प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन प्रकारची उर्मी असते. त्याला आपण आग किंवा ओढ असेही म्हणू शकतो. एक आत आणि एक बाहेर. बाहेरची आग कर्तुत्वात दिसते आतली आग व्यक्तीच्या कॅरेक्टर मध्ये दिसते.

The fire within, fire of vision ,passion, consciousness ,determination ,will power and capacity to work.

व्यक्तीच्या अंगी असलेल्या दूरदृष्टी, समजेचा पैस ,हिम्मत , व्यक्तीचाआत्मसन्मान आणि आत्मविश्वास कुठून येतो याचा माझा मीच शोध घेण्याची ताकद. हे शोधत असताना लोक काय म्हणतील  ? हे विसरण्याची हिंमत.

प्रत्येकाची अशी जगण्याची ओढच आम्हाला तिमिरातून  तेजाकडे नेईल .जी आपल्या प्रत्येकाच्या आत मध्ये प्रेमाची ज्योत पेटवेल.   कारण प्रेमाची ज्योतच मन मोकळे करते. हृदयाशी हृदय जोडते. सुरुवात माझ्या जवळच्यांपासून. हीच माझ्यातली ओढ मला सतत कामात ठेवते.

हेच तुमच्या आमच्या सर्वांच्या जगण्याचं इंजिन आहे आणि इंधनही.

हीच ओढअसमानतेकडून समानतेकडे नेते, अन्यायाकडून न्यायाकडे नेते याच ओढीने स्वप्न तयार होतात आणि प्रवासही घटित होतो.

जो असा जगतो त्याला कुठलाही त्याग करावा लागत नाही.

सर्वात कठीण आहे ते स्वप्नांचं मरण . स्वप्नांच मरण म्हणजे ओढ मरण .आतल्या आगीचं विझण. ते आता कोणत्याही विचारधारेने आता घडू नये.

The second sex जर तो आताही secondary राहिला किंवा ठेवलात तर सर्वच अशक्य आहे.

यह रास्ता बहुत कठीण है

इस रस्ते मे कोई किसी के साथ नही है

कोई सहारा देने वाला हाथ नही है

इस रस्ते पर धूप है ,कोई छाव नही है

जहा तस्सली भीख मे दे दे ,ऐसा कोई गाव नही है

ये ऊन  लोगो का रास्ता है ,जो खुद अपने तक जाते है

अपने आपको जो पाते है

तुम इस रस्ते पर ही चलना

मुझे पता है यह रास्ता  आसान नही है

पर मुझे यह गम भी है

तुमको अब तक क्यू अपनी पहचान नही है|

 

म्हणून स्त्रियांनी कोणाचीही वाट न पाहता हे केलंच पाहिजे.

||श्री माऊली चरणी अर्पण||

अश्विनी गावंडे

9 Responses

  1. स्त्री चां सन्मान होणे हा तिचा हक्क आहे.आणि तिचा सन्मान झालाच पाहिजे.कारण माणसापेक्षा जीवनात संसारात तिचा सिंहाचा वाटा आहे. जिच्या मुळे शिवाजी महाराजा सारखे शूर राजे घडले.आज हिंदुत्व टिकून आहे अशा स्त्रीला त्रिवार मनाचा मुजरा.

  2. अगदी मनातले विचार मांडलेस अश्विनी👍🎊

  3. अप्रतिम! खूपच सुंदर, चिंतनशील विचार!

  4. नवे वैचारिक क्षितिज. छान मांडणी. लेख खूपआवडला.

  5. अतिशय सत्यतापूर्ण, तेवढेच मार्मिक विचार . आज प्रत्येकाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे . अतिशय प्रेरणादायी विचार मांडला मॅम .

  6. आपण सर्व महानुभावांचे खूप खूप धन्यवाद आपण लेख वाचण्यासाठी वेळ काढला सोबतच प्रतिसाद नोंदवला त्याबद्दल खूप धन्यवाद

  7. जागतिक स्त्री दिनाच्या निमित्ताने स्त्रीचे अस्तित्व ,महत्त्व या निसर्गातील तिचे स्थान समाजाची मानसिकता. आताची स्त्रीची असुरक्षितता ,आवश्यक असलेला स्त्रियांविषयीचा समाजातील दृष्टिकोन, अतिशय अभ्यासपूर्ण आणि मार्मिक लेखन. अर्थपूर्ण लेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *