wondervoices

सारथी
काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा

कृष्ण आपल्या प्रत्येकाच्या खूप जवळचा आध्यात्मिक आणि पौराणिक व्यक्ती. म्हणूनच तर आज 5000 वर्षाचा कालावधी लोटून गेला. तरी आमच्या प्रत्येकाच्या घरी येणार बाळ, बाळकृष्णच असतो कारण त्या नावातच जादू आहे .संपूर्ण विश्व सामावून घेण्यापासून तर स्वतःला स्वतःपर्यंत पोहोचवण्याची.

श्रीकृष्ण फक्त एक व्यक्तिविशेष नसून श्रीकृष्ण हे विश्व आहे. श्रीकृष्ण गुणविशेषही आहे आणि गुणातीतही. श्रीकृष्णाचे हे गुणविशेष चौफेर विश्वामध्ये विखुरलेले आहेत .ते सर्व एकत्र आले तर श्रीकृष्ण हे व्यक्तिविशेष तयार होते.

कृष्ण हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. कृष अधिक अन. कृष म्हणजे सत्ता किंवा अस्तित्व. तर अन म्हणजे आनंद स्वरूप. म्हणजेच कृष्ण म्हणजे आनंद स्वरूप अस्तित्व. तसेच आनंद स्वरूप अस्तित्वाचा निर्माणकर्ता म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरातील आनंद स्वरूप अस्तित्वाचे नाव बालकृष्ण.

आनंद स्वरूप जो सर्वकाळ ,सर्वत्र स्थित असून नित्य नूतन आनंद देणारा. म्हणून तर प्रत्येकाचं अस्तित्व तोच आणि प्रत्येक अस्तित्व त्याचच .प्रत्येकाचे चैतन्य तोच आणि प्रत्येक चैतन्य त्याचंच.

वृंदावनात प्रत्येक गोपीके ला श्री कृष्णा सोबत रासलीला खेळायची होती. सुरुवातीला श्रीकृष्ण रासलीलेत आहेत. असं प्रत्येकीला दिसतं होतं. नंतर मात्र त्या स्थानावरून श्रीकृष्ण एकदम दिसेनासे होतात. सर्व गोपिका गोंधळून जातात . प्रत्येक गोपिका त्यांचा शोध घेते .शोध घेऊन ते कुठेच दिसत नाही म्हणून थकून डोळे लागतात तर काय? तर पुन्हा कृष्णाचं प्राकट्य होतं. अंतर्मनाचं आनंद रूपाचं प्राकट्य प्रत्येक गोपीकेला दिसतं. तेव्हा हा कृष्ण सखा प्रत्येक गोपीके सोबत रास करत असतो. म्हणजे तो आनंद स्वरूप प्रत्येकीला तिच्या आनंद रूपापर्यंत पोहोचविणारा.

श्रीकृष्ण या व्यक्तिविशेषाने त्यांच्या लिलांनी मला ,तुम्हाला, आपल्याला विविध गुणांनी युक्त होत. आनंद रूपापर्यंत जाण्याचे अनेकांगी समजेचे मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामुळे प्रत्येक मानवी जीवन नित्य उत्सव होऊ शकते.

भारतीय परंपरेमध्ये काही लोक श्रावण महिन्याचा प्रारंभ पौर्णिमेपासून मानतात .तर काही लोक अमावस्येपासून. अमावस्येपासूनच्या परंपरेला पकडल तर श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी या ब्रह्मांडात “गोपाल तापिणी उपनिषदानुसार”अशी ऊर्जा विद्यमान असते. जी प्रत्येकाच्या सद्गुणांचा विकास घडवते आणि दुर्गुणांचा नाश करते. ब्रम्हांडात अस्तित्वात असणारी ही ऊर्जा तटस्थ आहे. ती प्रत्येक जण उत्थान किंवा पतन या दोन्ही मार्गांनी उपयोगात आणू शकतो. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे. ज्यायोगे प्रत्येकात आनंददायी भावनांचा निर्माण होऊ शकतं. अशी भौगोलिक ऊर्जा प्रत्येक वर्षाच्या श्रावणात प्रत्येक श्रावण कृष्ण अष्टमीला ब्रम्हांडात उपलब्ध असते.
आपण जर या संरचनात्मक सकारात्मक ऊर्जेचा आपल्या जीवनात उपयोग करू शकलो तर आपले उत्थान निश्चित आहे .म्हणजेच नवीन जन्म होऊ शकतो म्हणूनच जन्माष्टमी.जन्म अधिक अष्टमी.
आपल्या प्रत्येक अवतारांचे प्राकट्य दिन बघितले तर श्रीरामनवमी ,हनुमान जयंती ,शिवरात्री इत्यादी असे नामकरण केलेले आढळते .परंतु भगवान कृष्णांचे प्राकट्य झाले, त्या दिवसालाच फक्त जन्माष्टमी का म्हणतात? तिथे श्रीकृष्णाचे नाव का नाही? कारण यातून श्रीकृष्ण अवताराचेच प्राकट्य दर्शवणे अभिप्रेत नसून, प्रत्येकाला आपले प्राकट्य इथे का झाले? प्रत्येकाने इथे का जन्म घेतलाय? हे समजून घेण्याचे या ऊर्जेच्या माध्यमातून स्वतःला बोध होऊन .कायापालट (transformation)करून घेण्याची संधी प्राप्त करून देणे. हीच प्रत्येकाला नवीन जन्म देणारी जन्माष्टमी.

भगवान कृष्णाचं नामकरण प्रखर ज्योतिषी विद्वान गर्गाचार्य यांनी केलं .श्रीकृष्ण जन्म वेळी ग्रह नक्षत्रांची स्थिती कशी होती ?त्यावरून हे नामकरण केलं गेलं. खगोलीय घटनांच्या आधारावरून कुठल्या प्रकारच्या व्यक्तित्वाचा निर्माणाच्या शक्यता अशा ग्रहनक्षत्रांच्या स्थितीत असू शकतात या आधारावर हे नामकरण झालेले आहे. अशी खगोलीय ऊर्जा प्रत्येक जन्माष्टमी म्हणजेच श्रावण कृष्ण अष्टमीला उपलब्ध असते.

ज्योतिष्य विज्ञान समजून घ्यायचं झालं तर सूर्य स्वगृही असतो. आणि चंद्र रोहिणी नक्षत्रात उच्चीचा असतो. आणि जर काळवेळाला व्यक्ती मानले. म्हणजे वेळ काळपुरुष मानला. तर, या कालपुरुषाचा आत्मा म्हणजे सूर्य .आणि चंद्र म्हणजे काल पुरुषाचे मन. अशा एकमेव द्वितीय संयोगाचा उपयोग आपल्याला करता आला, तर आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळू शकतो. आणि नको आहे ते मिटवू शकतो .त्याची उपासना करण्यासाठीच मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मावेळी पूर्वी मंदिर उघडल्या जात असत . जेव्हा सर्व तारे नक्षत्र आणि ग्रह शांत म्हणजेच मनुष्याचे विचार जिथे शांत होतात. तेव्हा ध्यानधारणा करून या ऊर्जेचा उपयोग केल्या जात असे. कोलाहल मिटला तरच शांती प्रकटते आणि शांती प्रकटली तर स्व स्वरूप कळते .जे काळाच्या ओघात व समजेच्या अभावी धूसर होत चाललंय. असं “जातक पारिजात “या ग्रंथात स्पष्ट केले आहे.

म्हणूनच गोकुळाष्टमीच्या काळात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. म्हणजे दहीहंडी हे जर अंतिम ध्येय मांडलं तर त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वजण एका दिशेने प्रेरित झाले नाहीत तर अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. अर्थात मानव लक्ष म्हणजेच प्रेम पूर्णता अंतिम लक्ष आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित केलं नाही. तर मानव प्रेम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून हा दहीहंडीचा प्रतीकात्मक उत्सव.

यातून नेतृत्व आणि व्यवस्थापन याचं प्राकट्य होतं. परंतु आता आपलं ध्येय दहीहंडीचा मटका आहे की मानव लक्ष?

जे आपले लक्ष असेल तेच आपल्याला ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करत असतं. आणि अंतिम लक्ष स्पष्ट असणाऱ्या. नेतृत्वाची मुळे सशक्त असतात. परिस्थिती कशीही असली तरी तो प्रवाहपतीत होत नाही. तर प्रवाहाला पाहिजे तसा वळवण्याची ताकद ठेवतो. हाच सारथी हाच श्रीकृष्ण.

हे आज 5000 वर्षानंतर आणि आधुनिक 21 व्या शतकात सुद्धा सामाजिक आणि वैयक्तिक यशस्वीतेसाठी अंतिम सत्य आहे.

श्रीकृष्ण या व्यक्तिविशेषाने अगणित गोष्टी मानव उत्थानाच्या दृष्टीने करून ठेवलेल्या आहेत.

महाभारतामध्ये युद्ध होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून हस्तीनापुरला येतात. तिथे राजपुत्र दुशासनाचा महाल अतिशय सुंदर असतो म्हणून त्याची सजावट करून भगवान श्रीकृष्णाला थांबण्यासाठी द्यावा असा राजा धृतराष्ट्राचा आदेश असतो. त्यानंतर सर्वजण भगवान श्रीकृष्णांचा स्वागत करण्यासाठी हस्तीनापुरच्या  वेशीवर येतात. आणि सर्वजण त्यांना आत मधील महालात राहण्याचा आग्रह करतात. आणि सांगतात की तुम्ही शांतिदूत म्हणून नाही आलात त्या आधी तुम्ही आमचे नातेवाईक सुद्धा आहात. मग तर तुम्हाला महालात राहायला यायलाच पाहिजे.

त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही .तोपर्यंत मी आपल्या आतिथ्याचा स्वीकार करू शकत नाही.”भुकेचा प्रश्न असेल आणि जर व्यक्ती भुकेविना मरतच असेल, अशा परिस्थितीत त्याने कुठेही अन्नग्रहण केले तरी ते वाईट मानल्या जाणार नाही. परंतु अशी परिस्थिती नसताना जिथे प्रेम नाही. सन्मान नाही. तिथे व्यक्तीने कधीही खाऊ नये. तेथील अतिथ्यही स्वीकारू नये”जे आजच्या आधुनिक काळातही सुसंगत आहे.

एकदा भगवान श्रीकृष्ण खूप आजारी पडतात. वैद्यांकडून तपासणी केली जाते. त्यावर उपाय म्हणून वैद्य सांगतात”की भगवान श्रीकृष्णांसाठी एकच औषध आहे “जो त्यांच्यावर निरतिशय प्रेम करत असेल. त्याच्या पायाची धूळ श्रीकृष्णाच्या कपाळी लावली तरच त्यांना आराम मिळू शकेल. भगवान श्रीकृष्णाच्या आठ पत्नीकडे ही मागणी जाते. त्यावर प्रत्येक जण म्हणतो की भगवान श्रीकृष्ण माझे पती आहेत .मी त्यांनाच परमेश्वर मानते. मग माझ्या पायाची धूळ मी त्यांच्या कपाळाला कशी लावू शकते? असे करण्याने तर मी नरकात जाईल.

वैद्य हताश होतात. आणि मग त्यांना वृंदावनाची आठवण होते. आणि ते गोपिकांकडे जातात संपूर्ण परिस्थिती सांगतात. गोकुळातील प्रत्येक गोपिका आपल्या चरणाची धूळ देण्यास तयार होते. यावर वैद्य त्यांना म्हणतात का ग तुम्ही तर भगवान कृष्णांच्या भक्त ना सगळ्या. मग भगवान कृष्णांना तुमच्या चरणांची धूळ माथ्यावर लावायला देणार तर नरकात जाल ना तुम्ही.

यावर गोपिका म्हणतात भगवान श्रीकृष्ण आमचं दैवत आहे आणि त्यांच्यासाठी आम्हाला नरकात जावे लागले तरी आमची तयारी आहे.

भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जन्म संदर्भात एक सूत्र दिले आहे-परित्राणाय साधुनाम (सदगुणांचे रक्षण)
विनासायच दुष्कृता म् (दुर्गुणांचा नाश)
पण या सर्वांची सुरुवात स्वतःचा स्वीकार, स्वतःचा सन्मान स्वतःवरील प्रेम यातूनच होणार आहे. हीच आपली जन्मा अधिक अष्टमी.

त्यानंतरच आनंद स्वरूपाच्या चरणी भाव अर्पण अर्थातच भक्ती यालाच चित्तशुद्धी म्हणतात. (Highest stage of consciousness.)हा असा उथ्थानाचा मार्ग दाखवणारा आनंद स्वरूप सारथी.
ll श्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे

12 Responses

  1. अतिशय सुंदर लेख छानच लेख वाचून खूप आनंद झालाय तुझे लेख छानच असतात आणि ज्ञानात भर पडेल असेच असतात तु लेख लिहीत राहा आणि आम्हाला अशीच मेजवानी देत राहा

    1. खूप छान.नेहमीच अभ्यासपूर्ण लेखन करतेस .

  2. लेख तर अप्रतिमच,पण ज्योतीषाचं भरपूर ज्ञान आहे लेखकाला हेही कळतं वाचताना.जातक पारीजात चा उल्लेख आणि का अनेक ठिकाणी ज्योतिष च्या अभ्यासाचा स्पर्श इथे जाणवतो.वास्तव मांडलं.5000 वर्षांनंतरही श्रीकृष्णाचं तत्वज्ञान उपयोगी आहे जीवनात.खुप सुंदर पणे पटवून दिले.
    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

  3. नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर, कृष्ण म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, कृष्णाचं तत्वज्ञान म्हणजे अखिल ब्रम्हांडाचे नियम.
    खरचं खुपचं छान लेख

  4. खूप सुंदर लेखन व अशाच पुढील वाचनीय लेखनासाठी शुभेच्छा

  5. सर्व वाचकांचे मनापासून आभार वेळात वेळ काढून आपण हा लेख वाचला आणि प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल खूप धन्यवाद.

  6. अप्रतिम! तुमचा ‘सारथी’ लेख वाचत असतानाच “श्रीकृष्णाचे” जन्माष्टमीचे प्राकट्य अनुभवलं. प्रतिक्रिया काय लिहू मॅडम? अंतर्मन, अनुभूतीने ओतप्रोत करण्याची ताकद तुमच्या शब्दात आहे. 🙏शब्दच नाहीत. लेखाशीर्ष ‘सारथी’ खूपच समर्पक आहे. !!
    !!श्रीकृष्णार्पण!!🙏🕉️

  7. लेख वाचून मन प्रसन्न तर झालेच आणि श्रीकृष्णाची भक्ती दुप्पट वाढली, खरोखर एनर्जीचा दाता , योग्य न्याय देण्यासाठी स्वतः सारथी होऊन मार्गदर्शन करणारा, प्रत्येक क्षणी निर्णय कसा घ्यावा हे सांगणारा श्रीकृष्ण समजला.तसेच जनमाष्टमी चे महत्व सुध्धा पटवून देणारा लेख.
    असेच अभ्यासपूर्ण लेखन आम्हा वाचकांना मिळत राहावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *