wondervoices

समर्पित
युद्ध नही जिनके जीवन मे
वो भी बडे अभागे होंगे l
न तो प्राण का धोका होगा
न तो रण से भागे होंगे. ll
अतिशय अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या सुभाषचद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी प्रभावती देवी आणि जानकीनाथ बोस या मातापित्यांच्या पोटी कटक ओडिसा मध्ये झाला. वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षीच त्यांनी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे चारित्र्य ,साहित्य फक्त वाचूनच काढले नाही, तर पावलावर पाऊल टाकणे सुरू केले.

मानवी जीवनात ईश्वर प्राप्ती हे लक्ष असल्याचे सुभाष बाबूंच्या लक्षात आले.

मग प्रश्न उपस्थित झाला ईश्वर कुठे आणि कसा भेटतो?
तर ईश्वर मानवाच्या रूपातच भेटतो.
त्यासाठी मग काय करावं लागतं ?
तर मानव सेवा.
हेच ब्रीद घेऊन जीवनभर सुभाष बाबू चालत राहिले.

मानव सेवा हीच देश सेवा झाली. आणि देशाची सेवा करणे म्हणजेच मानवाची सेवा.

आधुनिक काळामध्ये देश सेवेला समर्पित जीवन जगल्याचं मोठे उदाहरण सुभाष बाबूंपेक्षा  कोणते दुसरे  असूच शकत नाही.

भारतात इंग्रजांच्या राज्यात आरोग्य सेवेचे बारा वाजलेले होते .इंग्रज भारतीय लोकांना किडामुंग्यांपेक्षा जास्त किंमत देत नव्हते .याचे शल्य सुभाष बाबूंच्या हृदयामध्ये होते . परंतु मी संपूर्ण यंत्रणा सुधारू तर शकत नाही. तरी मी  माझ्या ठिकाणी बदल घडवू शकतो. प्लेग वा इतर अनेक  साथीच्या रोगात अनेक लोक मृत्यू मुखी पडत असत त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम TEEN  AGE मध्येच सुभाष बाबूंनी केले.

सुभाष बाबू च्या घरासमोर एक बुढी अम्मा राहायची. अतिशय गरीब. तिला मदत करायची म्हणून सुभाष बाबू कॉलेजला पायी जायचे आणि भाड्याचे वाचलेले पैसे त्या अम्मा ला द्यायचे.
हे संस्कार, ही संस्कृती त्यांना घरातून तसेच विवेकानंद आणि परमहंसांच्या शिकवण ग्रहण करण्यातून मिळाली.

सुभाष बाबू प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत असताना एक इंग्रज प्रोफेसर विनाकारण भारतीय मुलांना त्रास द्यायचे, मारायचे. सुभाष बाबू मुळातच नेतृत्व गुण असलेले व्यक्तिमत्व होते. नैसर्गिक रित्या कॉलेजमध्ये सुद्धा ते नेतृत्व करत होते. ही मारण्याची बातमी सुभाष बाबु पर्यंत पोहोचली. ते तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून प्रिन्सिपल कडे घेऊन गेले. त्यावर सुभाष बाबू प्रिन्सिपल सरांना म्हणाले की कृपा करून प्रोफेसराना मारण्याचे कारण विचारा आणि कारण नसेल तर माफी मागायला लावा. यावर त्यांनी माफी मागण्यास नकार दिला तेव्हा सुभाष बाबु नी कॉलेजमध्ये धरणे आंदोलन सुरू केले .
वर्तमानपत्रांमध्ये याच्या बातम्या छापून आल्या आणि कॉलेजची बदनामी झाली. अखेर प्रोफेसरांनी
माफी मागितली. परंतु भारतीय विद्यार्थ्यांना विनाकारण मारणे मात्र सोडले नाही. यावर सुभाष बाबूंनी विद्यार्थ्यांना सांगितले की प्रोफेसर विनाकारण मारणे सोडत नसतील तर ,जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. म्हणून आपणही प्रोफेसरांना मारायचे. खरंतर इथे केवळ अपमान करणे हा हेतू नसून ती अन्यायाविरुद्धची चीड होती. पुढे अशाच काही कारणांमुळे कॉलेजमधून सुभाष बाबूंना बडतर्फ करण्यात आले.

सुभाष चंद्र बोस यांचे वडील निष्णात सरकारी वकील होते व ते आपल्या मुलाची कुशाग्र बुद्धिमत्ता जाणून होते.त्यांनी सुभाष बाबूंचे मन आय. सी. एस. (Indian Civil Services)ची परीक्षा देण्याकडे वळवले. त्यासाठी सुभाष बाबूंना लंडनमध्ये जाऊन अभ्यास करावा लागणार होता. किमान चार वर्ष कालावधी घेणारा हा अभ्यासक्रम सुभाष बाबूंनी केवळ आठ महिन्यात पूर्ण करून आय.सी.एस. परीक्षा चौथ्या क्रमांकाने यशस्वी करून दाखवली.

एक भारतीय केवळ आठ महिन्यात आयसीएस ची चौथी रँक मिळवतो हे इंग्रजांसाठी अद्भुत होते.

पुढे त्यांनी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव म्हणा किंवा देशाच्या लोकांची सेवा म्हणा किंवा मातृभूमी सर्वोपरी आणि हीच सेवा श्रेष्ठ म्हणून आयसीएस परीक्षेतून मिळालेल्या नोकरीचा त्याग केला.

या सर्व गोष्टी भारतीय जनता बघत होती. सुभाष बाबू म्हणायचे “मी एकटा नोकरी करून सरकारी पैशांचा मलिदा खाउ आणि पैशांच्या राशीवर लोळू.” “इथे मात्र माझे देश बांधव हालअपेष्टा भोगत आहेत “.”माझी मातृभूमी गुलामगिरीत आहे.”यासाठी काम करणे हेच माझे जीवन ध्येय आहे. यावर देशभरातील लोकांनी त्यांचे प्रचंड कौतुक केले व भारतीय राजकारणात नव्या सूर्याचा उदय झाला.

सुभाष बाबू गांधीजींना आपले गुरु मानत असत. पुढे त्यांच्यात मतभेद झाले परंतु सुभाष बाबूंच्या  मनातून गांधीजी साठी असणारा आदर कमी झाला नाही. त्यांना दिलेले गुरुपद त्यांनी कायम राखले. त्यांनीच सर्वप्रथम गांधीजींना राष्ट्रपिता अर्थात FATHER OF NATION असे संबोधन दिले.

1942 च्या भारत छोडो आंदोलनाला सर्व भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वात राहण्याचा व त्यांच्या आज्ञा पाळण्याचे आवाहन जर्मनीतील बर्लिन रेडिओवरून सुभाष बाबू नी केले.

गांधीजींचे अहिंसा तत्व त्यांना मान्य होते .परंतु त्यांचे गांधीजींना एकच म्हणणे होते की “बापू तुम्ही बरोबरच आहात. पण ज्या उच्चस्तरावरून तुम्ही वागत आहात. तो तुमच्या शत्रूचा स्तर नाही.” म्हणून शत्रूचा बिमोड हा शत्रूच्याच मार्गाने करावा लागेल. त्याच्याशी त्याला समजते त्याच भाषेतून बोलावे लागेल. करिता आपणास शस्त्र हाती घ्यावेच लागतील. मात्र ही बाब गांधीजींना मान्य नव्हती.

गांधीजींना सुभाष बाबू मध्ये कायम जहालपणा दिसला. त्यांनी सुभाष बाबूंना मताधिक्याने निवडून येऊन सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्याअध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला लावला. त्यायोगे त्यांनी सुभाष चंद्र बोस यांना भारतीय राजकारणातून निष्कासित केले.

भारतात सुभाष बाबूंची लोकप्रियता प्रचंड होती. किंबहुना गांधीजींच्या पेक्षा जास्त होती. परंतु या सर्व धोरणांमुळे त्यांनी आपला मार्ग निवडला. ते एकदा गांधीजींना म्हणाले होते की ,”बापू आपण माझे गुरु आहात व सदैव राहणार आहात. आपले मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ,ध्येय मात्र दोघांचेही एकच आहे. ”

सुभाष चंद्र बोस अतिशय पुढारलेल्या विचारसरणीचे होते. त्यांच्याकडे ध्येयापर्यंत जाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होते. “शत्रूचा शत्रू आपला मित्र” या न्यायाने दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रजांना कोंडीत पकडून भारत स्वतंत्र करून घ्यायचा. ह्या रणनीतीने ते पुढे जात राहिले.
“बडे बदलाव के लिए बडा कदम”

कलकत्त्याच्या घरातून इंग्रजांच्या नजर कैदेतून निघून ते काबुल मार्गे जर्मनीला पोहोचले. त्या काळात “फ्यूएरर”म्हटल्या जाणाऱ्या हिटलरला भेटून भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत मागण्याचा प्रयत्न त्यांना करायचा होता. हिटलर ने त्यांना मदतही केली.

त्यांच्या प्रत्येक कृतीतून विवेकानंदांच्या वाचनातून आलेल्या,” स्वतःच्या ताकदीवरचा विश्वास व कमालीचा निडरपणा दिसतो.” भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काही लोक फक्त देशांतर्गत विचार करत राहिले. आडाखे बांधत राहिले. तेव्हा सुभाषचद्रबोस मात्र जागतिक पातळीवरचे नियोजन करत होते. त्यांच्या दृष्टीचा आवाका खूप मोठा होता.

“म्हणून मानवी जीवनात विचारांचे अनन्यसधारण महत्त्व आहे. त्यासाठी खूप चांगले वाचले पाहिजे. कारण वाचनच माणसाचे विचार घडवतात आणि विचार आयुष्य. ”

हिटलरने स्वतःचे आत्मचरित्र “माईन कांफ”मध्ये भारतीय लोकांना ब्रिटिशांनी स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवले ही खूप चांगली गोष्ट आहे. असे नमूद केले होते. असे हिटलर ने नमूद करणे म्हणजे “भारतीय नागरिक” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे.” असे सुभाषचंद्र बोस मानत असत. ही गोष्ट त्यांनी जर्मन शिष्टमंडळासमोर मांडली तेव्हा शिष्टमंडळातील काही लोक की ज्यांना सुभाषबाबूंना खरोखर मदत करण्याची इच्छा होती , ते सुभाषचद्र बोस यांना म्हणाले तुम्ही हिटलर समोर ही गोष्ट काढू नका .तुम्हाला जी मदत पाहिजे त्याविषयी बोला .मदत मिळवा आणि निघून जा.

काय निडरता ! सुभाष बाबूंची .जगाच्या पटलावरील सर्वात मोठ्या हुकूमशहाच्या समोर जाताच सर्वात पहिल्यांदा सुभाष बाबूंनी हीच गोष्ट पहिल्यांदा नमूद केली. आपला परखड  निषेध नोंदवला. हिटलरला या बाबीचा खरा तर राग आला होता.परंतु त्यांनी विषय बदलला. याचे पर्यावसान हिटलरच्या त्या पुस्तकाच्या नवीन आवृत्ती मधून सुभाषबाबूंना आक्षेपार्ह भाग काढून टाकण्या मध्ये झाले.

जर्मनीचा हुकूमशाह हिटलर कोणालाही भेटताना तोतया लोक वापरत असे. एकदम स्वतः कधीही पुढे येत नसे . सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस हिटलरच्या भेटीला गेले असता. एक ,दोन ,तीन ,चार असे हिटलरच्या रूपात वेगवेगळे लोक भेटीला आले असता .प्रत्येकाला सुभाषचंद्र बोस यांनी ओळखले आणि तुम्ही खरे हिटलर नाही. असे प्रत्येकाला सांगितले. शेवटी प्रत्यक्ष हिटलर जेव्हा समोर आल . तेव्हा हिटलरने सर्वात पहिला प्रश्न सुभाष बाबूंना विचारला की तुम्ही हे सर्व कसे काय ओळखले ?”

त्यावर सुभाष बाबू म्हणाले “एका गुलाम राष्ट्रातील व्यक्तीला त्याच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचा गर्व तुमच्या चेहऱ्यावर कुठेही दिसला नाही जो आता दिसतो आहे.”
हिटलरला हे सुभाष बाबूंचे बारीक निरीक्षण आणि कुशाग्रता अवाक करणारे होते.

पुढे हिटलरने सुभाष बाबूंना जागतिक महायुद्ध काळातील विमानाच्या प्रवासातील धोका ओळखून जपानला जाण्यासाठी स्वतःच्या नौसेनेतील खास पाणबुडी दिली . 9 फेब्रुवारी 1943 ला पाणबुडीत बसलेले सुभाषचंद्र बोस 13 मे 1943 ला इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर पोहोचले. सुभाष बाबूना जर्मन नौकेवरील सर्व व्यक्तींनी स्वतःच्या गळ्यातील ताईत म्हणून वागवले. पण बोटीवर खाण्यासाठी मात्र “ब्रेड आणि कडक मास व डबाबंद बेचव भाज्या असायच्या.”हळूहळू सुभाषबाबूंनी खाणे एकदम बंद करून टाकले.
दिवसभर पाण्याखालून चालणारी पाणबुडी रात्री केवळ चार्जिंग व्हावे म्हणून समुद्राच्या पृष्ठभागावर यायची. जगाच्या बाह्यपटलावर कुठलीही यशस्विता दिसत नसताना. तीन महिने दिवस रात्र सुभाष चंद्र बोस यांनी अंधार भोगला केवळ “स्वातंत्र्याच्या पहाटेसाठी.”

सुभाष चंद्र बोस यांच्यासोबत पाणबुडीवर अबिद हुसेन होता. एकदा त्याला बोटीच्या भांडार गृहात तांदूळ आणि डाळीचे एक पोते दिसले. लगेच त्याने सुभाष बाबु साठी खिचडी बनवून दिली. खिचडी इतकी चविष्ट  होती ,की सुभाष चंद्र बोस यांनी बोटीवरच्या सर्व जर्मनांना खाण्यासाठी बोलावले. आता मात्र आबिद ची पंचाईत झाली. तो सुभाष चंद्र बोस यांना जर्मनांना  जेवायला बोलावू नका असेही म्हणू शकत नव्हता. कारण सुभाष बाबूंना ते आवडले नसते. आबिदला मात्र डाळ तांदुळ पुरण्याची चिंता होती.परंतु शेवटी त्याने जर्मन लोकांनाच सांगितले की तुम्ही सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत जेवायला बसत जाऊ नका.

स्वतःच्या जीवापेक्षा जास्त अतिव प्रेम करणारी माणसं सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या जीवनात कमावली होती.
या अर्थाने सुभाषचंद्र बोस आणि आबिद हुसेन पानबुडीतून प्रवास करणारे पहिले भारतीय ठरले.

ह्या प्रवासात 28 एप्रिल 1943 रोजी समुद्रातल्या समुद्रात सुभाष चंद्र बोस जर्मनीच्या पाणबुडीतून निघून जपानच्या पाणबुडीत बसले. त्यावेळी महासागर प्रचंड खवळलेला होता. बाहेर प्रचंड युद्ध सुरू होते. अशा काळात दोन्ही देशांच्या पाणबुडी सुभाषचंद्र बोस यांच्या साठी दोन दिवस समुद्रात समांतर चालत राहिल्यात.

दुसऱ्या देशातील लोकांनी जे जाणले ते भारतीयांनी नाही किती UNDERESTIMATE केले आहे आपण सुभाष चंद्र बोसांना.

जर्मनीत सुभाष बाबूंनी ‘फ्री इंडिया ‘सेंटरची स्थापना केली तेथील 5000 युद्धकैदी आणि सिंगापूर येथील रासबिहारी बोस यांनी तयार केलेली 85000 लोकांचीच पुढे आझाद हिंद सेना झाली. जिने ब्रिटिश साम्राज्याला घाम फोडला.

स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करणारे बॅरिस्टर जिना म्हणाले होते. जर सुभाषचंद्र बोस भारताचे पंतप्रधान होणार असतील तर मला वेगळा पाकिस्तानच नको आहे.कारण मला सुभाष चंद्र बोस यांचे नेतृत्व मान्य आहे.

जपानच्या पंतप्रधानांशी बोलताना सुभाष चंद्र बोस त्यांना म्हणाले ‘आशियामध्ये असणारे आपण दोन देश मग आपला आशिया खंड ब्रिटिशांच्या ताब्यात कशाला? ‘ शिवाय आपण दोन्ही देश SPIRITUALY CONNECTED देश आहोत. जपान ने भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी मदत केली .पुढे हिरोशिमा-नागासाकी बॉम्बस्फोटाने युद्धाचे स्वरूपच पालटले.

सुभाष चंद्र बोस यांच्या जो GEO POLITICS च्या प्रभावाने इंग्रज सैन्यात भारतीय सैनिकांनी प्रचंड विद्रोह केला. ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याने आपले गुडघे टेकले.

युद्धाच्या बदललेल्या स्वरूपामुळे पुढे सुभाषचंद्र बोस मॉस्कोतून मदत मिळवण्यासाठी व्हिएतनांम वरून निघाले. तेव्हाच सुभाष चंद्र बोस यांचे विमान तैवांन मध्ये क्रॅश झाले असे म्हणतात.  यातच सुभाष चंद्र बोस यांचा अंत झाला. ही बाब आजतागायत संदिग्ध आहे. या बाबीचा शोध घेण्यासाठी आजवर अनेक चौकशी आयोग स्थापन करण्यात आले. कित्येकांचे रिपोर्ट तर तैवांनला त्या दिवशी विमान अपघात घडलाच नाही असेही आहेत.

तर पुढे गुमनामी बाबा म्हणून सत्तरच्या दशकापर्यंत जगणारे सुभाषचंद्र बोसच होते असे दावे ही समोर आले आहेत.
एकूण काय तर विमान अपघातात मारले गेले असतील तरी देशासाठीच समर्पित आणि स्वतःची ओळख लपवून गुमनामी बाबा म्हणून जगले असतील तरीही देशासाठी समर्पित.

“जन जन के जीवन को सार्थक बनाने वाला”हा स्वातंत्र्य सेनानी. याची थोरवी ओळखण्यात आपण सर्व भारतीय सर्वस्वी कमी पडलो हे मात्र नक्की. कदाचित आपल्या सर्वांची लायकी नसावी त्यांच्या नेतृत्वात चालण्याची. त्यांचा आवाका, त्यांची प्रज्ञा आपल्या देशाला झेपली नाही ती नाहीच.

या संपूर्ण धकाधकीच्या आयुष्यात सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्यातील “हिरवे पान” म्हणजे इमिली शांकेल. जिने ठे इंडियन THE INDIAN FREEDOM STRUGGLE हे सुभाष बाबूंचे  पुस्तक टाईप करण्यास सुभाष बाबुना टायपिस्ट म्हणून मदत केली.
पुढे तीच एमिली बोस झाली व त्यांना अनिता नावाची मुलगी झाली.
अशा भारतीय योध्याला  शत:शत: नमन.
SALUTE TO UNSUNG HERO OF INDIA.

“I LOVE THOSE WHO YEARN FOR IMPOSSIBLE ”
संपूर्ण समर्पण हीच भारताची संस्कृती हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आणि सुभाष चंद्र बोस म्हणजे या समर्पणाची क्रियात्मकता.
जयहिंद
llश्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे
अकोला

8 Responses

  1. आतापर्यंत न वाचलेली माहिती वाचण्यास मिळाली खूप छान

  2. बापरे खरच ताई खूपच छान माहिती.. विशेष म्हणजे सुभाष चंद्र बोस हे स्वामी विवेकानंद आणि परमहंस यांच्या विचाराने प्रेरित होते हे वाचनातून लक्षात आले आणि समजले खरोखर खूपच सुंदर

  3. सर्वप्रथम आदरणीय सुभाषबाबूंना कोटी कोटी वंदन.तुझी लिखाणाची शैली ओघवती आहे.वाचताना आ.नेताजींचा जीवनपट डोळ्यासमोरून तरळून गेला आणि डोळे पाणावले.लेखाचे शीर्षकही समर्पक, अत्यंत चपखल ! अशाच उत्तमोत्तम लेखांसाठी तुझा हात सतत लिहीता राहू दे.

  4. अप्रतिम प्रत्येक ज्ञानात भर घालणारा लेख .

  5. आपणा सर्व वाचकांचे खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आपण हा लेख वाचल सोबतच प्रतिसादही नोंदवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  6. सुभाषचंद्र बोस यांच्यावर केलेले लेखन अप्रतीम….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *