श्री गणेशा
सुखकर्ता ,विघ्नहर्ता ,गणेश ,गणपती ,अधिपती या अनेक नावांसोबतच आपल्या प्रिय बापाला ब्रह्मवैवधपुराणांमध्ये द्वैमातुर असेही म्हटले जाते.
बरेचदा आपल्याला असं वाटतं नवीन वर्ष मग ते इंग्रजी नवीन वर्ष असो की भारतीय कॅलेंडर प्रमाणे चैत्र ,वैशाख पासून सुरु होणाऱ्या काळ असो. एक उत्साही वातावरण असतं आणि त्यामुळे भरपूर सकारात्मक आणि ऊर्जात्मक वाटते. परंतु असे नसून इंग्रजी महिन्याच्या ऑगस्ट ,सप्टेंबर किंवा भारतीय कॅलेंडर प्रमाणे श्रावण, भाद्रपद या काळामध्ये या ब्रह्मांडामध्ये परिवर्तनीय ऊर्जेचे प्रमाण हे कोणत्याही कालावधी पेक्षा जास्त असते.
मुख्यत: ऊर्जा ही त्रिकाल उपलब्ध असते आणि ऊर्जेचे वैशिष्ट्य म्हणजे ऊर्जा हे कायम तटस्थ असते .ती सकारात्मक ही नसते तसेच नकारात्मक नसते. परंतु असलेल्या ऊर्जेचा आपण कसा उपयोग करतो ?तिचे नियोजन कसे करतो ?यावरच कार्य आणि फलश्रुतींची दिशा उर्ध्व किंवा अधोगामी ठरत असते. असो.
एकदा इंद्रदेव पुष्पभद्रा नदीच्या तटावर विहार करायला निघालेले असतात. तेवढ्यात तिथे अप्सरा रंभा येते. ते दोघेही नंतर जलक्रीडा करण्यात रममाण होतात. त्यावेळी तेथे दुर्वास ऋषी येतात. जे विष्णू लोकांतून शिव लोकात चाललेले असतात. त्यांच्या हाती भगवान विष्णूंनी दिलेली पारिजातकाची फुले असतात जी भगवान विष्णू द्वारे अभिमंत्रित केलेली असतात. ही पारिजातकाची फुले जो कोणी व्यक्ती आपल्या डोक्यावर धारण करेल. तो केवळ बल किंवा बुद्धीतच अग्रगण्य होणार नाही. तर देवतांमध्ये सुद्धा अग्रगण्य होईल. ही त्या फुलांची फलश्रुती असते.
त्यावर दुर्वासा ऋषींना असं वाटते इंद्रदेवांपेक्षा ही फुले मस्तकावर धारण करण्याला लायक व्यक्ती कोण? म्हणून इंद्रदेवांनी ती फुले ग्रहण करावीत अशी ऋषी दुर्वासांची इच्छा असते. परंतु इंद्रदेव जलपक्रीडा करण्यात व्यस्त असतात. म्हणून ऋषी दुर्वासांकडे ती फुले घेऊन निष्काळजीपणाने आपले वाहन ऐरावत हत्तीच्या मस्तकावर ठेवतात. व पुन्हा आपल्या जलक्रीडा करण्यात रममाण होतात.
पण जेव्हा इंद्रदेवांना या फुलांचं रहस्य कळते तेव्हा ते ऐरावताचा तिरस्कार करायला लागतात. पुढे भगवान विष्णूंनी असेही म्हटलेले होते ,की ही फुले धारण करणाऱ्या व्यक्तीचा जो तिरस्कार करेल, तो शक्तीहीन होईल. अशाप्रकारे इंद्रदेव शक्तीहीन होतात.
अप्सरा रंभा त्यांना सोडून जाते. प्रत्यक्ष इंद्रदेव आपला तिरस्कार करतात म्हणून ऐरावत जंगलामध्ये निघून जातो.
इकडे शिवलोकामध्ये माता पार्वती मातीने एक पुतळा बनवतात. त्यामध्ये भगवान शिव जीवसूत्र आणि सृष्टी सूत्राच्या आधारावर प्राण भरतात. जगत् माता -पिता असणाऱ्या या पुत्राला सर्व देवतागण आशीर्वाद देण्यासाठी येतात. केवळ शनिदेव आशीर्वादाला द्यायला येत नाहीत.
यावर माता पार्वती जेव्हा शनि देवांना कारण विचारते. तेव्हा शनी देव सांगतात”हे माते मला असा शाप आहे की मी अशा कोणत्याही छोट्या बालकाला बघितलं तर त्याचं डोकं शरीरापासून वेगळं होऊन जाईल.”त्यावर माता-पार्वती त्यांना अशी चिंता सोडून, माझ्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी या असं सांगतात. जसे ही शनिदेव बाळाला आपल्या मांडीवर घेतात त्याच क्षणी बाळाचे डोकं हे त्याच्या धडापासून वेगळे होते.
पुढे भगवान शंकराच्या सूचनेप्रमाणे भगवान विष्णू ऐरावताच शीर कापून बालकाला लावायला सांगतात. हेच भगवान गणेश.
विष्णूच्या आशीर्वादाने आणि कृपेने आता बाल गणेशाला पारिजातकाचे फुल धारण केलेले शिर आलेले असते. त्यामुळे बालक बुद्धीशाली ,शक्तिशाली आणि प्रथम पुजनाचा मानकरी होतो. आता बाल गणेशाची एक माता माता पार्वती आणि दुसरी ऐरावताची माता ही सुद्धा बाल गणेशाची माता होते म्हणून गणेश द्वैमातुर.
आणि ही पूर्ण घटना भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला घटित होते म्हणून ही गणेश चतुर्थी.
त्यानंतर दहा दिवसाचे व्रत सुरू होते .ज्याला आपण उत्सव बनवले आहे. संपूर्ण भारत वर्षात सर्वात लांब चालणारे हे व्रत किंवा उत्सव आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर पहिल्यांदा हे व्रत घराघरातून चालत असे. परंतु लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना संघटित करण्यासाठी या व्रताला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामुळे या उत्सवाचा अध्यात्मिक विकासापेक्षा ,सार्वजनिक एकात्मतेसाठी जास्त उपयोग करण्यात आला. त्यामुळे व्रत चा मूळ हेतू हरवला. हा मूळ हेतू म्हणजे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती. अर्थात “नराचा नारायण होण्यापर्यंतचा प्रवास.”त्यासाठी लागणाऱ्या ऊर्जे ला अनुरूप अवकाशीय ग्रहगोलांची स्थिती सुद्धा असते.
बर मग दहा दिवसाचा उत्सव का? त्याचं कारण म्हणजे आपल्या दहा दिशा. मुख्य चार दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. चार उपमुख्य दिशा आग्नेय ,वायव्य ,नैऋत्य, ईशान्य. एक उर्ध्व दिशा म्हणजे आकाश आणि एक अधोदिशा अर्थात पाताळ. दिगपाल हे सर्व दिशांचे मालक असतात.म्हणजे या दहाही दिशांकडून आपल्याला ज्ञान, शक्ती ,बुद्धी मिळाली पाहिजे आणि सर्व विघ्नांचा नाश झाला पाहिजे. म्हणून दहा दिवसांचा व्रताचा सोहळा.
परंतु आजच्या काळात ह्या व्रत किंवा उत्सवाचे स्वरूप केवळ मनोरंजनात्मक होऊन राहिलेले आहे. त्याविषयी थोडे चिंतन होणे गरजेचे आहे.
गणेश पुराणांमध्ये स्वयं भगवान गणेश यांनी चंद्रदेवांना शाप दिल्याची कथा येते.(संपूर्ण कथा आपण पुढे बघणार आहोतच.) भगवान गणेश चंद्राला शाप देतात की तुला जो कोणी बघेल, तो दुःखी होईल. परंतु चंद्राला आपली चूक लक्षात येते आणि तो भगवान गणेशा ना माफी मागतो. त्यावर संपूर्ण शाप भगवान गणेश नष्ट तर करू शकत नाहीत. परंतु चंद्राला उशा: प देतात.”फक्त भाद्रपद चतुर्थीला जो ही कोणी तुला पाहिल तो दुखी होईल.”
आता इथे फक्त आकाशात दिसणाऱ्या चंद्राचीच गोष्ट नाही.
कारण चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. आणि आपलं मन म्हणजे काय? तर फक्त जीवन जगताना येणाऱ्या नकारात्मक अनुभवांचा संचय. आणि मनोरंजन म्हणजे काय? तर नकारात्मक अनुभवांनी ग्रस्त झालेल्या मनाला फुंकर मारून तात्पुरता सुखी करण्याचा प्रयत्न. जेव्हा की माणसाला परम सुखाची आस आहे.
आत्मा म्हणजे जगताना अनुभवलेले भाव. जे चिरकाल असतात. भाव म्हणजे मूल्य. आणि मूल्य म्हणजे व्यक्ती व्यक्तींना जोडणारे भाव विश्वास ,प्रेम ,स्नेह इत्यादी.
म्हणून अनेक आचार्य, विद्वान आणि पुराण असे सांगतात की या दहा दिवसांच्या उत्सवांमध्ये मनोरंजक काही केल्यापेक्षा मनाला (नकारात्मक स्मृतींना)ताब्यात ठेवून शिस्तप्रिय, साधनापूर्वक जगण्याचे हे दिवस.
या दहा दिवसांमध्ये ज्ञानवर्धक ,पुण्यप्राप्तीचे उपक्रम केले पाहिजेत. जे तात्पुरत्या आनंद आणि सुखापेक्षा चिरकालीन सुख प्रदान करू शकतील.
हा काळ आध्यात्मिक किर्तन, प्रवचन, ध्यानधारणा प्रार्थनेचा काळ आहे. यामध्ये आपण आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे असलेल्या आयुष्याचे सर्जनशील चित्र निर्माण करून, त्याचे प्रकटीकरण करू शकतो. व स्वतःच्या स्वप्नातील आयुष्य जगू शकतो. त्याकडे आपली ऊर्जा प्रत्येक मानवाने केंद्रित करावी आणि अवकाशीय ऊर्जेचा स्वतःच्या उर्द्वगामीत्वा साठी उपयोग करून घ्यावा.
म्हणतात ना
“मानव को जितना उन्नता अवकाश प्राप्त है
उतनाही अवनता अवकाश प्राप्त हैl”
म्हणून अस्तित्वात असलेल्या ऊर्जेचा उपयोग कसा करावा? हे महत्त्वाचे.
(क्रमशः)
!!श्री माऊली चरणी अर्पण!!
अश्विनी गावंडे
विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन करता ताई तुम्ही. त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. शाळा, मुख्याध्यापक प्रभार, कार्यालयाने सांगितलेली अनेक अशैक्षणिक कामे या सर्वांची पूर्तता करून आपण विस्तृत लेखन करता त्यासाठी खरंच आपले कौतुक.
तुमचे ही तेच सुरू आहे सर. लेख वाचल्याबद्दल खूप खूप आभार. तसेच प्रतिसादही दिला त्याबद्दल खूप कृतज्ञता.
खूप छान माहीती
“श्री गणेशा”लेखन खूपच छान! पुराणातील आज विस्मृतीत चाललेल्या कथानकाचे ,ओघवत्या शैलीतील लेखन सुंदरच. स्मृतींना उजाळा मिळाला. अवकाशीय ऊर्जेचे, उर्ध्वगामी आत्म उत्थानासाठी केंद्रीकरण, त्यासाठी सण -उत्सवांचा मूळ उद्देश, (काळाचे )महत्व, हा लेखनाचा मूळ गाभा, चिंतनातून चैतन्याचा पारिजात फुलल्याची अनुभूती देऊन जातो.
गणेश उत्सव कसा साजरा करावा या विषयी ची खूपच छान माहिती . सुंदर लेखन .
गणेशाची आराधना ,उपासना घराघरातून मोठ्या श्रद्धेने केली जाते .अनेक वर्षापासून आपण मोठ्या भक्ती भावाने गणेशाची स्थापना करतो ,परंतु हा गणेश गजवदन कसा झाला याची गोष्ट अजूनही सखोल माहिती नव्हती .ऐरावत हत्तीच मस्तक गणेशजींना लावलेल आहे हे तुमच्या लिखाणातूनच माहित झालं .खूप अभ्यासपूर्ण आणि ज्या पैलूंची पुसटशी माहिती सुद्धा आम्हाला नव्हती त्या सर्व गोष्टी आज खूप स्पष्ट झाल्या खऱ्या अर्थाने गणेशाची संपूर्ण माहिती मिळाली. माहिती पूर्ण ज्ञानवर्धक लेख आहे.
या दहा दिवसात नकारात्मक ऊर्जा कशी घालवता येईल हे खुप छान सांगितले… हा कालावधी कसा उत्साह वाढवणारा आहे… हे व्यवस्थित समजावून दिले… लेख एकदम सुंदर…
ही माहिती माहीत नव्हती खूप छान माहिती