रक्षासूत्र
बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है l
प्यार के दो तार से संसार बांधा है ll
रक्षाबंधन करताना प्रत्येक बहीण राखीच्या रूपाने संपूर्ण संसार तिच्या भावाच्या हातात बांधते. याचा अर्थ तिच्या इच्छा ,आकांक्षा याचा रक्षण कर्ता भाऊच आहे. भावा बहिणीचं एक अद्वितीय नातं असतं. परस्परांसोबत जीवन व्यतीत करताना जीवनात कधी बहीण भावाची आई होते .तर कधी भाऊ बहिणीचा पिता .कधी मित्र तर कधी मैत्रीण .
आई-वडील आणि मुल यांच्यामध्ये जे प्रेम असतं तसंच प्रेम बहीण आणि भावाच्या नात्यांमध्ये असतं. म्हणजे
आई-वडिलांनी स्वतःच्या मुलावर प्रेम करणं हे नैसर्गिक आहे .परंतु मुलांनी आई-वडिलांवर प्रेम करणं हा संस्काराचा भाग आहे. म्हणून बहीण भावाचं नातं म्हणजे नैसर्गिक संस्कारांचा परिपाक आहे.
हे जग खूप मोठे आहे .यामध्ये अनेक मानवी परस्पर संबंध आहेत.नाती आहेत .जी निभावणं जटील आहे. असा प्रथमदर्शनी भास होतो .परंतु संबंध आणि नात्यांमधील जटिलता ही ते अनेक असल्यामुळे नसून प्रत्येक संबंध आणि नात्यातून आपल्याला अवास्तव अपेक्षा असल्याने आहेत. असे मला वाटते.
आई-वडिलांचे मुलांवर आणि बहिण भावांचं एकमेकांवर असणार प्रेम .हे बिनशर्त (unconditional love)प्रेम असतं .अर्थात या प्रेमात सहज स्वीकार असतो. एकमेकांसाठी कितीही केलं तरी मी कमीच केलं. म्हणून आणखी आणखी करण्याचा किंवा देण्याचा जो भाव आहे. तो या नात्यात असतो. जो आत्मानुभुती पर्यंत पोहोचविणारा असतो. प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे जबाबदारी. काळजी आणि जबाबदारी ह्या दोन्ही गोष्टी सक्रिय असतात. म्हणून प्रेम कधीही निष्क्रिय असूच शकत नाही.
संपूर्ण पृथ्वीवर 800 कोटी मानव अस्तित्वात आहे. ज्यांना केवळ सात प्रकारच्या नात्यांमध्ये गुंफता येते. (बाबा नागराज माझे शिक्षागुरू)माता -पिता यामध्ये तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप सर्व येतात. (मामा मामी, मावशी काका ,मामा आत्या, काका काकू इत्यादी) बहिण – भाऊ, मित्र – मित्र ,गुरु -, साथी -सहयोगी (दायित्व आणि कर्तव्य) पुत्र -पुत्री आणि पती-पत्नी.
नातं कुठलंही असो, केवळ संबोधनाने ते तयार होत नाही. संबंधांनी संबोधन असतं. आणि संबंध तेव्हाच प्रस्थापित होतात जिथे भाव असतो .मूल्य असतात .कोणतेही नाते मोहाने टिकत नाही .तर स्नेहाने टिकते .मोह म्हणजे सुखी होण्यासाठी करणे. तर स्नेह म्हणजे सुखी होऊन करणे. स्नेहाचे नाते उपयोगिता आणि परस्पर -पूरकता या तत्त्वांवर आधारित असते. आणि स्नेह हा निष्ठेने व्यक्त होतो.
विश्वास ,सन्मान, स्नेह हे कोणत्याही संबंधांचे आधार मूल्य आहेत. संबंधांमध्ये जे भाव किंवा मूल्य आहेत तेच संबोधन आहे.
मेरे अपनेपन का जितना विस्तार है
मेरे सुख का उतनाही फैलाव हैं l
विश्वास हे स्थापित मूल्य आहे .जे परस्पर सौजन्याने व्यक्त होते. सन्मान हे स्थापित मूल्य आहे .जे सौहार्दतेने व्यक्त होते. स्नेह परस्पर निष्ठेने व्यक्त होतो. तर वात्सल्य सहजतेने .ममता उदारतेने .श्रद्धा पूज्यतेने . कृतज्ञता सौम्यतेने आणि प्रेम हे पूर्ण मूल्य अनन्यतेने व्यक्त होते.(बाबा नागराज माझे शिक्षा गुरू) या मूल्य प्रवाहितेने च व्यक्तीचे व्यक्तित्व घडत जाते. आणि तो पूर्णत्वाकडे सिद्ध होतो.
मानव लक्ष तेच आहे .
“पूर्णतेच्या अर्थाने जे अनुबंध तयार होतात तेच संबंध. ”
मग आताच्या काळात संबंधांचे जे स्वरूप दिसते ते असे नाही .कारण आमचे आजचे संबंध हे सुविधेवर आधारित आहेत .तू मला पाहिजे ती सुविधा देशील तर मी तुझा संबंधी. सुविधा म्हणजे शरीरगत गरजा. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी. ह्या तर पाहिजेतच परंतु मानवी संबंध हे त्या पुढचे आहेत. जे मानवाला तृप्त करतात .सुविधा शरीराला सुख प्रदान करतात. आणि मानवी मूल्य जीवनाला तृप्तता देतात. कारण हे भाव आणि मूल्यच मानवाचे या पृथ्वीतलावर चे अस्तित्व आहे.
कृष्णाने द्रौपदीला हेच दिले. वनवासात राहूनही राम आणि सीतेने एकमेकांना. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्त्रि- पुरुषांना हाच भाव दिला. समाजातील सर्व जाणत्या कर्त्या पुरुषांनी हीच मूल्य प्रवाहीता प्रत्येकाला देऊन मानवी मनाची मशागत केली. कारण त्यांना कळलं होतं. मानवाची सीमा फक्त शरीरापर्यंत नाही. तर ती शरीराच्या पुढे सुरू होते. आणि हा अंधार दूर करायचा असेल तर समजदारीची पणती पेटवण्याचे काम अर्थात समजदारीचं, मूल्य प्रवाहितेचं काम करणे गरजेचे आहे.
आज मात्र सुविधेच्या सुकाळात मूल्यांचा दुष्काळ निर्माण झालाय म्हणून हे रक्षासुत्राचे जागरण.
रक्षा कवच किंवा रक्षा संदर्भात भविष्य पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते .सत्ययुगाच्या काळात देव आणि दानवां चे युद्ध सुरू होते. दानव जिंकण्याच्या एकदम जवळ होते . परंतु अचानक न जाणो कुठून इंद्रात शक्ती संचारली आणि युद्धाचे पारडं फिरले. यावर सर्व दानव आपला राजा बळी याच्याकडे गेले. आणि त्याला गुरु शुक्राचार्यांकडे ही बाब विचारण्याची विनंती केली. शुक्राचार्यांनी त्यांच्या ज्ञानचक्षुनी पहिले आणि त्यांनी सर्वांना सांगितले युद्धाच्या दरम्यान इंद्राची पत्नी शची हिने गुरु ब्रुहस्पतिंकडे जाऊन मदतीची रचना केली. गुरु बृहस्पती हे शुक्राचार्यांचे सुद्धा गुरु होते. त्यावर ब्रुहस्पतींनी शचीला एक धागा अर्थात रक्षा सूत्र दिले आणि त्या रक्षासुत्राला इंद्राच्या हातावर कधी व कसे बांधायचे याची पद्धत सांगितली. बाकी आपल्यासमोर जे घडले ते आहेच.
मग सर्व दानव म्हणाले आपणही बृहस्पतींना रक्षा सूत्र मागू त्यावर गुरु शुक्राचार्य म्हणाले या अशा योगासाठी आपल्याला पुढील एक वर्ष तरी वाट पाहावी लागेल. भविष्य पुराणातील कथा इथेच संपते.
पुढे भागवत पुराणामध्ये अशी कथा आहे .की नंतर दानवां चा राजा बळी युद्ध जिंकतो आणि सृष्टीवर आपले राज्य प्रस्थापित करतो. आपले राज्य असेच अबाधित राहावे म्हणून तो 100 अश्वमेध यज्ञ करतो. त्यात त्याला सफलताही मिळत असते. या कारणाने देवांच्या मनात चिंता उत्पन्न होते आणि सर्व देवता भगवान विष्णूंना आपण यावर काहीतरी तोडगा काढावा. ही विनवणी करण्यासाठी जातात. त्यानंतर भगवान विष्णू वामन रूप धारण करून बळीराजाला दान मागण्यासाठी जातात. आणि केवळ तीन पावले जमीन मागतात. तितक्यात दानावां चे गुरु शुक्राचार्य यांच्या लक्षात येते की हे वामनरूप म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत.
परंतु आता वेळ निघून गेलेली असते. दोन पावलांमध्ये भगवान विष्णू अखिल ब्रम्हांड काबीज करतात. आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू ?असे बळीराजाला विचारतात. बळीराजा जरी दानवांचा राजा होता .तरी तो भक्त प्रल्हाद याचा नातू होता. त्यामुळे मुळामध्ये तो सद्गुणी होता. आणि दिलेले वचन पाळण्यासाठी तो कटिबद्ध होता. त्याने तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवायला श्री विष्णूंना विनवले.
बळीराजाचे हे औदार्य पाहून विष्णूंना त्यांची दया आली व बळीराजाला म्हणाले. तुला काय मागायचे ते माग मी तुला द्यायला तयार आहे. यावर बळीराजा भगवान विष्णूंना आपला चौकीदार होण्याची विनवणी करतो आणि म्हणतो की भगवन तुम्ही जर माझ्यासमोर सतत असलात .तर माझे लक्ष विचलित होणार नाही . तुमच्या भक्ती आणि तुमच्या चरणां शिवाय माझे मन कुठेही जाणार नाही. म्हणून मजवर कृपा करा आपण माझा चौकीदार व्हा. सतत माझ्या नजरेसमोर रहा. विष्णु भगवान ही मागणी स्वीकारतात.
इकडे लक्ष्मी माता भगवान विष्णूंची घरी वाट पाहत असतात. संपूर्ण घडलेला प्रकार त्यांना कळतो आणि नंतर लक्ष्मी माता एक सामान्य स्त्री बनून बळीराजाकडे रक्षासूत्र बांधायला येतात. बळीराजाही मातेला न ओळखता एक सामान्य स्त्रीचा स्वतःची बहीण म्हणून स्वीकार करतो. आणि रक्षा सूत्र बांधल्यावर तिला काहीतरी मागण्याची विनंती करतो. यावर लक्ष्मी माता बळीराजाला म्हणते तुमचे जे चौकीदार आहेत .ते माझे पती आहेत म्हणून आपण त्यांना मुक्त करावी एवढीच साधी माझी मागणी आहे. बळीराजाच्या संपूर्ण गोष्ट लक्षात येते आणि अशा रीतीने भगवान विष्णूची मुक्तता होते.
शचिनने इंद्रदेवांना रक्षासूत्र बांधणे. तसेच लक्ष्मी माते ने राजा बळीला रक्षासूत्र बांधणे . या दोन्ही घटना घडण्याचा एकच दिवस आणि तो म्हणजे श्रावण शुक्ल पौर्णिमेचा दिवस. अर्थात श्रावण पौर्णिमा. तेव्हापासून ते आजतागायत या दिवसाला ,या दिवशी उपस्थित असलेल्या भौगोलिक ऊर्जेला आणि रक्षासुत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे .
कारण या दिवशी भौगोलिक ऊर्जा या रक्षा कवचाला मदत करत असते. चंद्र श्रवण नक्षत्रात असतो व त्यामुळे ब्रम्हांडात संरचनात्मक, सकारात्मक, सुरक्षात्मक ऊर्जेची निर्मिती झालेली असते . ज्याचा प्रत्येक मानव आपल्या जीवनात उपयोग करून घेऊ शकतो.
दोन्ही पौराणिक कथांमध्ये एक समान धागा आहे. रक्षासूत्र बांधणारी स्त्री आहे आणि बांधून घेणारा पुरुष. मुख्य म्हणजे या दोन्ही गोष्टीतून पुरुषाचीच रक्षा झालेली आहे . परंतु एकविसाव्या शतकापर्यंत पोहोचता पोहोचता भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून बहीण रक्षासूत्र किंवा राखी बांधते. असे म्हटले जाते.
खरंतर आजच्या काळात तर पुरुष आणि स्त्री या दोघांना रक्षासूत्राची गरज आहे. यामधून लक्षात घेण्याची एक बाब ही सुद्धा आहे की, या सृष्टीत स्त्री-पुरुष असा काही भेदाभेद नाही. सृष्टीची निरंतरता राहावी म्हणून निसर्गाने केलेली ती एक योजना आहे. स्त्री पुरुष हे प्रथमतः मानव आहेत. आणि मानव हा एकच सृष्टीचा शाश्वत धागा आहे.
एकमेकांना रक्षासूत्र बांधताना कोणता भाव मनी आहे? कोणते मूल्य प्रवाहित होत आहे. हे महत्त्वाचे आहे. कारण ब्रम्हांडामध्ये उपस्थित असलेली ऊर्जा ही निरपेक्ष आहे. ती मनाच्या भावाला किंवा मूल्याला सहाय्यभूत होणारच आहे. म्हणून आपल्या मनात काय भाव आहेत? करिता रक्षा सूत्राचा उद्देश शुभ असणे महत्वपूर्ण आहे. त्यातूनच परस्पर उत्कर्ष निश्चित आहे.
सर्वांचा मतितार्थ एकच प्रतीत होतो. परस्पर काळजी, परस्परांसाठी त्याग ,समर्पण भावना , समानानुभूती आणि सहानुभूती हा आत्मानुभूतीपर्यंत जाणारा मार्ग आहे. यापेक्षा वेगळा स्नेह तो कोणता? प्रेम ते काय ?आणि पूर्णता ती काय?
ll श्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे
माझी ताई..Actually We are brother & sister from different mothers… किती सुंदर लेख लिहिला तायडे…I really liked it… वयानी लहान पण ज्ञानानी श्रेष्ठ अशी तू माझी बहीण की माझ्या विचलित अवस्थेत नेहमीच आधार बनून समोर आलीस… काय कोण्या जन्मात आपण नक्कीच भाऊ बहीण राहिलो आहोत म्हणूनच पुन्हा निसर्गाने धर्माच्या नात्यानी बांधले आहे… एक तुझा भाऊ म्हणून तूझ्या सोबत नेहमीच असेल असे या रक्षाबंधन पर्वावर तुला सांगावसं वाटले. ही लेखवरची प्रतिक्रिया होईल की नाही हे मला सांगता येणार नाही. पण आपल्या बहीण भावाच्या नात्याचे प्रमाण म्हणावायस हरकत नाही. असो लेखामध्ये विषय खुप छान मांडला ग दीदी… God bless you… अशीच जन्मोजन्मी माझी बहीण म्हणून जन्म घे ही स्वार्थी भावना मांडतो…
Grateful to u BRO
खरंच ताई खूप सुंदर लेख लिहिला दाटलेल्या भावना जागृत झाल्या. खूप छान…. सरांनी पण तुम्हाला खूप छान प्रतिक्रिया दिल्या वाचून खूप अभिमान वाटला 👌👌😊😊👍
Very nice 👌👏 touching article
Thank you Ma’am for u r comments u give u r time for reading &sharing u r comments.
Thank you so much Sangita तू प्रत्येक वेळी माझी लेख वाचतेस आणि प्रत्येक वेळी प्रतिक्रिया ही देतेस. प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा प्रतिसाद देतेस .
प्रिय… ताई आज आपण रक्षाबंधन निमित्त लिहिलेले लेख अप्रति आहे. या लेखांमध्ये दिलेला संदर्भ, पात्र, त्यांच्या भूमिका आणि त्यांच्यामध्ये असलेले विविध प्रकारचे नाते संबंध आपण अतिशय प्रभावीपणे आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. तसेच मांडणी करत असताना नात्याची कुंपण अतिशय प्रभावीपणे विणली आहे. नाती का ?? आणि कशासाठी असायला पाहिजे आणि नात्यांमधील स्नेह यासंबंधी आपण विस्तृतपणे लिखाण केले आहे.
शब्दांची मांडणी आणि वाक्यरचना खरोखरच अप्रतिम आहे रक्षाबंधनानिमित्त ताई आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !!!! आणि आपल्या राखीचा स्वीकार करतो …🙏🙏🙏🙏आणि थांबतो..
तुमचाच एक भाऊ
प्रा. नवनाथ बडे
Grateful to you Sir
अश्विनी, रक्षाबंधनाचा खुप छान विस्तारीत अर्थ मांडलास..
खुप सुंदर ….
Grateful to u Kaka .u r response gives me energy.
खूप छान माहीती पौरीणीक कथेतून माहीतीतुन छान माहीती दिलीस पूर्वी पुरूषासाठी स्त्री रक्षासुत्र बांधायची पण काळानुसार नेहमीय्रमाणे यातही बदल झालाच पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे स्त्री आणि पुरूष म्हणजे बहीण आणि भाऊ दोघांनाही एकमेकांच्या रक्षासुत्राची गरज आहे मात्र नक्की
खूपच छान माहीती देतेस ग अश्वीनी नेहमीच तुझ्या लेखातून
रक्षाबंधन म्हणजेच रक्षासूत्र याचा गहणार्थ आज कळला. लेखाला भौगोलिक, अध्यात्मिक जोड देऊन उत्तम प्रकारे अनुभवांची सांगड घातली आहे .खरंच तुमच्या ज्ञानाला ,लिखाणाला ,जगण्यातल्या अनुभवायला जोड नाही ,याची प्रचिती तुमच्या प्रत्येकच लेखांमधून मिळते. अभ्यासपूर्ण लेख असल्याने मनाला भाव तोच भावतो खूप आवडला.
आदरणीय Mam 🙏,आपण रक्षासूत्राबाबतचे महत्व पौराणिक कथांच्या उदाहरणातून खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहेत. बहिण -भाऊ, भाऊ -भाऊ किंवा बहीण-बहीण यांच्यामध्ये एकमेकांना जपण्याचे एक रक्षासूत्र त्यांच्यामध्ये परिवारातील संस्कारातूनच बांधले गेलेले असते, याबाबत मी सहमत आहे. खूप छान लेखन. धन्यवाद🙏🙏
रक्षा सुत्राची गरज परस्परांना असते छान प्रतिपादन! 🎊
खूप सुंदर लेख, रक्षा सूत्र किती आवश्यक आणि गरजेचे आहे, आजही आपण किती असुरक्षित आहोत, हे विविध ठिकाणी सतत घडणाऱ्या ,अंगावर शहारे आणणाऱ्या घटना ऐकतो ,पाहतो, खरंच रक्षा सूत्र प्रत्येकाला असावे .
खूप छान वाटले लेख वाचून .मुद्देसूद लिहिण्याचे कसब दिसून येते.
Great article! I really appreciate the clear and detailed insights you’ve provided on this topic. It’s always refreshing to read content that breaks things down so well, making it easy for readers to grasp even complex ideas. I also found the practical tips you’ve shared to be very helpful. Looking forward to more informative posts like this! Keep up the good work!