wondervoices

रंगारी श्रावण
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
संपूर्ण वर्षभरात मनी हर्ष दाटविणारा महिना म्हणजे श्रावण. अवनीचे तन मन प्रफुल्लित करून चैतन्यमयी करणारा हा श्रावण मास .संपूर्ण सृष्टी हिरवी करून सोडणारा. खरं तर हिरवा रंग म्हणजे समृद्धीचा रंग. या काळात निसर्ग समृद्धी पासून मानवी मनाच्या चित्तवृत्ती ही प्रफुल्लीत होतात. प्रफुल्लित चित्र वृत्तीने सर्व मने आनंद विभोर होतात. बाहेरच्या वातावरणाचा मानवी मनावर आणि मानवी मनाच्या  परिणाम बाह्य पर्यावरणावर प्रतिबिंबित होत असतो.

इंग्लिश मध्ये निसर्गाला  Nature म्हणतात. आणि मानवी स्वभावाला सुद्धा इंग्लिश मध्ये Nature च म्हणतात. कारण मानव हा निसर्गाचे प्रती रूपच आहे.
“गागर मी सागर और सागर मे गागर l”

म्हणतात ना -“पानी रे पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलाया लगे उस जैसा “तसंच मानवी मनाचं असलं पाहिजे .नितळ ,स्वच्छ ,सुंदर परंतु काळाच्या ओघात जगण्याच्या घिसाडघाईत कधी मनावर मलावरण येतं आणि पारदर्शीपणा निघून जातो ते कळतच नाही.

परंतु हा जन्मदाता निसर्ग आहे ना या मानवी स्वभाव रुपी निसर्गाला वारंवार नितळ होण्याची संधी देणारा. श्रावण महिन्याच्या रूपाने.
श्रावण या शब्दाचे दोन अर्थ होतात एक श्रवण हे एका नक्षत्राचे नाव आहे. आणि दुसरे श्रवण म्हणजे ऐकणे.

भारतीय सनातनी परंपरेमध्ये जी काही महिन्यांची नावे दिलेली आहेत ,ती म्हणजे पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये आहे यावरून दिली जातात. उदाहरणार्थ चंद्र पौर्णिमेला कृतिका नक्षत्रात असतो .म्हणून तो कार्तिक मास. जेव्हा चंद्र पौर्णिमेला चित्र नक्षत्रात असतो तो चैत्र मास. आणि चंद्र पौर्णिमेला श्रवण नक्षत्रात असतो म्हणून तो श्रावण मास.

खरंतर भारतीय सनातन हिंदू परंपरेमध्ये (सनातन चा अर्थ हिंदू किंवा कुठलाही धर्म नसून निसर्ग नियमाला अनुसरून आचरण करणे असा होतो.) चातुर्मास म्हणजे आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत. हा संपूर्ण कालखंड पवित्र मानला जातो. त्याला कारणही तसंच होतं .या काळात समाजातील अध्यात्माच्या दिशेने वाटचाल करणारे जे काही साधुसंत , समाजाचे गुरुपद भूषविणारे जे व्यक्ती होते. ते आपापले भ्रमण थांबवून एका स्थानावर स्थिर होत असत. व संपूर्ण चातुर्मास एका ठिकाणी वास्तव्यास असत. या वास्तव्याचा फायदा सामान्य जन मानवी जीवनाची  रहस्यमयता, तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी  करत. त्यामध्ये कीर्तन, प्रवचन ,सत्संग यांचा माध्यम म्हणून उपयोग केला जाई. याची सुरुवात देवशयनी एकादशी पासून होते. त्यापूर्वीची गुरुपौर्णिमा सुद्धा प्रतिकात्मक मानल्या जाते.

या काळात मानवाला सतत दिशा देणारी त्याचे उत्थान करणारी जी देवांची ऊर्जा असते. ती शयन करते. तरी मग चातुर्मास त्यातल्या त्यात श्रावण एवढा महत्त्वाचा आणि पवित्र कसा?
स्कंद पुराणात भगवान शंकर सनत कुमारांशी संवाद साधताना “मला श्रावण मास खूप प्रिय असल्याचे सांगतात.”
अलंकार प्रियो विष्णू
अभिषेक प्रिय: शिव:
संपूर्ण सृष्टी जर शिवतत्व मानली. तर त्यावरील अभिषेक मानव पूर्ण करू शकत नाही म्हणून स्वतः शिवच श्रावण महिन्यात अभिषेक करून घेतात असेही म्हणण्याचा एक प्रघात आहे.
श्रावण महिन्यात चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. चंद्र मनाचा कारक आहे चंद्राच्या या स्थानामुळे लोकांची शास्त्रामध्ये रुची निर्माण होते. चंद्राच्या या स्थानामुळेच लोकमन (receptive mode) स्वीकार भावात असते. या काळात लोकांची मने भावनाप्रधान असतात. त्यामुळे उत्सव संवाद आप्तस्वकीयांमध्ये भेटणे ,बोलणे ,मिसळणे हे जास्त प्रमाणात आणि सहज होते.

हेच मानवी जीवन समृद्ध करते. कारण या पृथ्वीतलावर मानवाचे अस्तित्वच मुळी भाव प्रधान आहे .तेच जगणं आणि तोच भाव आहे आणि भावच मौलिक आहे तेच देवत्व तेच शिवतत्व आहे.

हे सर्व चंद्राच्या स्थानामुळेच किंवा ग्रहगोलांच्या भौगोलिक स्थितीमुळेच घडत असेल असे बुद्धीला पटत नसेल  तर आदीं अनादी काळापासून चालत आलेल्या या गोष्टी कालौघातात टिकल्याच नसत्या असा आपला माझा तार्किक विचार.
तरीही मानवाची यात्रा ही “मानण्यापासून जाणण्यापर्यंत” आहे. आणि जाणून घेण्याचे क्षेत्र सर्वांसाठी खुले आहे.

या काळात मानवी मन सकारात्मक ,संवर्धनात्मक भावांनी विभोर असते .आध्यात्मिक ,प्रेरणात्मक, उच्च प्रभावात्मक बाबींकडे मानवी मन निसर्गतः ओढ ग्रस्त असते.
आताच्या एकविसाव्या शतकाच्या भाषेत सांगायचे झाले तर श्रावण मासात मानवाचा emotional quotient high असतो.
सत्यपात्री ,भक्ती ,संवर्धनात्मक काम करणाऱ्या लोकांसोबत राहण्याची स्वभावात्मक ओढ निर्माण करणारा हा कालखंड आहे .एवढेच नसून  इतरांच्या विध्वंसात्मक  कृती किंवा स्वतःच्या विध्वंसात्मक विचारांकडे आपोआप पाठ फिरवावी वाटणारा हा काळ.

म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या?”आपण स्वतः अनुभव घेऊन बघूच शकतो की?

पुरातन काळी ऋषी मुनी संबोधन असणाऱ्या विभूतींना आताच्या काळातील संशोधन कर्ते (researchers ) म्हटले पाहिजे. त्यांनीच एकूण भौगोलिक ऊर्जेचा मानवी जीवनात कसा उपयोग करावा? याकरिता सण ,समारंभ, उत्सव ,व्रतवैकल्ये या मार्गाने आपल्याला नियोजनच उपलब्ध करून दिले. परंतु आताच्या काळात या गोष्टींकडे बघण्याची आपली दृष्टी  धूसर झाली आहे. त्यातील संदर्भ, अर्थ धुसर झाले आहेत.

एकूणच ज्या सवयी माझ्या उत्थानामध्ये काम करत नाहीत, त्या सवयी ,ते विचार, ते लोक सोडण्या पर्यंत माझ्या चित्तवृत्ती प्रवृत्त होतात. जर का अशी प्रक्रिया सर्वांसोबतच घडत असेल तर यापेक्षा आनंददायी ते काय?

कारण प्रत्येक व्यक्तीवर निसर्ग कृपा ,देवकृपा ,गुरुकृपा सर्वच कृपा असतातच किंबहुना म्हणूनच त्याचे अस्तित्व आहे. फक्त तो स्व कृपा करत नाही कारण स्व कृपेसाठी लागणारे स्वनिरीक्षण त्यांनी सोडले आहे.

श्रवणाचा दुसरा अर्थ म्हणजे ऐकणे वेदांतांमध्ये ऐकण्याच्या प्रक्रियेला ज्ञानप्राप्तीचे एक मात्र साधन मानले आहे. मलाही वाटते अनेक दृक ,श्राव्य आणि दृकश्राव्य साधने उपलब्ध असली तरी ज्ञानाचे एक मात्र साधन म्हणजे श्रवणच आहे.

आपण प्रत्येक गोष्ट जी बघतो त्यावर विचार करतो. जी गोष्ट ऐकतो त्यावर सुद्धा विचार करतो. किंवा कोणती कृती करतो त्यावरही विचार करतो. किंवा वरील सर्व क्रिया करण्याआधी विचार करूनच करतो.

एवढेच नाही तर वाचतो त्यावरही विचार करतो. आणि विचार करतो म्हणजे काय? स्वतःच स्वतःशी बोलतो. मग हे बोलणे ऐकणारा कोण? मीच.

म्हणजे वक्ताही मी आणि श्रोताही मीच. म्हणजेच श्रवणानेच मनन होतं अर्थात मंथन. समुद्रमंथनही श्रावण महिन्यातच झाले होते असे सांगितले जाते. त्यातूनही विष आणि अमृत बाहेर पडलेच होते .मंथनातूनच चिंतनाचा उगम होतो. आणि चिंतनातूनच काय चांगले  ?काय वाईट?  हा परिपाक मिळतो. त्यानुसारच नित्य आचरण ठरते. हेच नीधिध्यासन.

श्रवण ,मनन ,चिंतन आणि निधीध्यासना नेच मानवाचा रंग बदलू शकतो. जे वाल्या कोळी चे वाल्मिकी होताना झाले. तुलसीदासांचे संत शिरोमणी  तुलसीदास होताना झाले. संत तुकारामांना दुष्काळामध्ये श्रीमंत होण्याच्या सर्व संधी उपलब्ध असताना त्यांनी लोकांना दान करणे निवडले. अगदी अलीकडील उदाहरणे द्यायचे म्हणजे महात्मा फुलेंनी धन ,धान्य ,संपत्ती पायाशी लोळण घेत असताना लोकसेवा निवडली. तेच बाबा आमटेंनी पण केलं. प्रत्येक वेळी  श्रावण महिना असणे गरजेचे नाही. कारण मानवी मनात अंतर श्रावण सतत तेवत असतो. किंबहुना तो तेवत ठेवणे हिच स्वकृपा. मानवी जीवनाची शाश्वतता आणि अशाश्वतता काय? हे मंथनातून निष्पन्न होणे गरजेचे.आणि ती संधी प्रत्येक वर्षी उपलब्ध करून देणारा हा श्रावण म्हणून हा रंगारी श्रावण. अशा रीतीने मानवी मनातील अंतर श्रावण जागृत करणारा हा रंगारी श्रावण.

एक मित्र त्याच्या मित्राला भेटण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जातो. दोघांच्या गप्पागोष्टी चालत असताना. त्या मित्राचा कुत्रा पायदानावर बसून सतत कू…. कूँ..   असा ओरडत असतो. भेटायला आलेला मित्र मालक मित्राला विचारतो तुझा कुत्रा सतत असा का ओरडत आहे? त्यावर मालक मित्र म्हणतो कदाचित त्याला ते पायदान रूतत असेल. मग पहिला मित्र म्हणतो मग तो तिथून उठत का नाही? मालक मित्र म्हणतो कदाचित त्याला ते पायदान उठण्या इतकेही रुतत नसेल?

ll श्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे

16 Responses

  1. श्रावणाचे खूप छान महत्त्व सांगितलेले आहे खूपच छान माहिती…. माहिती नसलेल्या ही बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या,👋👌👌😊

  2. खूप छान लेख.नेहमीप्रमाणे तुझ्या लेखातून दरवेळी नवीन माहिती मिळते.खरच खूप छान लिहिलेस.

  3. ग्रेट हो मॅडम.किती भारी लिहिलंय.खुप अभ्यास पूर्ण लेख.आणि नवीन माहिती मिळाली भरपूर या लेखामधून.
    जबरदस्त लेखन आहे.खुप खुप शुभेच्छा.

  4. खुपच मस्त 👍👍👌👌वाचतांना मनाला उभारी आल्यासारखे वाटले मस्त

  5. श्रावण मासाचे आपल्या जीवनातील महत्व व अर्थ खुप छान प्रकारे उलगडुन सांगितले. खुपच अर्थपूर्ण विवेचन आहे.आपल्या संस्कृतीतील आध्यात्म आणि निसर्गाची सांगड अप्रतिमपणे स्पष्ट केलेस.
    खुप छान

  6. अविनाश यशवंतराव मोहिते. सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक says:

    खुप छान लिहिले मॅडम… खुप बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख केला… अप्रतिम लिखाण ताईसाहेब…

  7. अप्रतिम लिहिले नेहमीसारखे बढिया !!! लिखाणाला गाढा अभ्यास लागतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *