मृत्युंजय

मृत्युंजय
देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था
महापराक्रमी ,परम प्रतापी एक ही शंभू राजा था
उण्या पुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात 140 लढाया लढून अपराजित राहिलेला संपूर्ण इतिहासात एकमेव राजा म्हणजे शंभूराजा .(गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तशी नोंद आहे.)शस्त्र आणि शास्त्र, बल आणि बुद्धीचा समतोल म्हणजे शंभूराजा. वक्तृत्व आणि कर्तृत्व याचा योग्य संगम म्हणजे शंभूराजा.
Courageous, confident, decision maker, innovative and amazing leader हे सर्व गुण एका ठाई असणारा म्हणजे शंभूराजा.
जिजाऊ मा साहेबांनी दोन छत्रपती स्वराज्यासाठी तयार केले आणि या दोन्ही छत्रपतींनी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारा एक एक मावळा तयार केला .
मराठे (जो मर कर भी नही हटते )जन्माला येतानाच आपल्या भाळावर विश्वास लिहून जन्माला येतात. अशा लाखो मराठी विरांच्या बलिदानाचा पाया ह्या सह्यांद्रिला आहे. म्हणूनच तो आजही बेदाग आणि बेलाग आहे.
स्वराज्याची पायाभरणी पूर्ण झालेली असताना जिजाऊ मां साहेबांनी छत्रपतींचे पुढचं version तयार केलं जो स्वराज्याच संरक्षण आणि संवर्धन करेल. कधी कधी तर असं वाटतं की शिवाजी महाराज जे जे करायचे राहून गेले त्या सर्व पराक्रमाची कसर संभाजी महाराजांच्या रूपाने पूर्णत्वास नेल्या गेली.
वयाच्या नवव्या वर्षापर्यंतच लोककल्याणकारी राज्याच्या या बाळराजाने स्वराज्याचे प्रतिनिधित्व करण्याची योग्यता प्राप्त केली होती. राजा जयसिंगाच्या तळावर ओलीस म्हणून राहिले. याच राजनीतीच्या सारीपाटावर औरंगजेबाचे सप्त हजारी मनसबदार झाले .तेव्हा याच खेळात शिवाजी महाराज पंच आजारी मनसबदार होते. जणू काही औरंगजेबाने तेव्हाच बाप से बेटा सवाई असल्याचं मान्य केलं होतं. याच वर्षी प्रसिद्ध आग्र्याच्या दरबारात उभा राहण्याचा इतिहास प्रसिद्ध प्रसंग उभा ठाकला. त्याच वयात १२५० मैलाचा प्रवास शंभूराजांनी लिलया पेलला. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या रोमांचकारी घटनेचा सुकाणू त्यांचाच शंभू बाळ होता. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत 16 भाषांचे ज्ञान आणि बुधभूषणम व नखशिखा यासारख्या संस्कृत ग्रंथांचा कर्ता होता .आज पर्यंतच्या राजघराण्यात पाहायला मिळणार नाही असं बुद्धी आणि बलाचं हे rare combination होतं. वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून न्यायासन व इतर कारभाराही संभाजी राजांनी सांभाळाला. शिवाजी महाराज व जिजाऊ मासाहेब यांच्याकडे येणारे खटलेही न्यायनिवाड्यासाठी संभाजी राजांकडे ते दोघेही सोपवीत असत ,कारण न्यायासन, सिंहासन व धर्मासनाची शृंखला त्यांना ज्ञात होती .त्याच्यावर रयतेचा विश्वास होता. स्वराज्य धर्म हाच धर्मविचार होता तिथे हिंदू ,मुस्लिम धर्म महत्त्वाचा नसून प्रत्येक व्यक्तीची अस्मिता, स्वातंत्र्य आणि तिची मूल्य महत्त्वाची होती.
स्वराज्य टिकवण, संवर्धित आणि संरक्षित ठेवणे हे कार्य शंभूराजांनी नुसतच पेलेलं नाही. तर अखिल विश्वाला अपराजितता काय असते ? ते दाखवून दिलं.
माणसानं जगावं कसं? याचं मूर्तीमंत उदाहरण पेश करणाऱ्या पित्याच्या पोटी माणसानं मरावं कसं ?हे दाखवून देणारा पुत्र जन्मावा. काय विलक्षण योगायोग आहे नियतीचा.
शंभूराजांच्या संपूर्ण भीमपराक्रमाच्या मुळाशी मला तर नेहमी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे आपली आजी काय आहे? आपले पिता कोण आहेत? त्यांचं या जगी काय महत्त्व आहे? हे समजून घेण्याची परिपक्वता संभाजी राजांमध्ये खूप लहानपणापासूनच होती.
आपण शिवपुत्र आहोत आणि शिव विचाराने अर्थात स्वराज्य विचाराने जगण्याचे आपले व्रत आहे .या दोन्ही गोष्टी त्यांनी कधी नजरेआड होऊ दिल्या नाहीत.
32 वर्षाच्या आयुष्यात या बाबींवरचा त्यांचा focus कधी ढळला नाही .मी तर पुढे जाऊन असेही म्हणेल की संभाजी राजे हे शिवपुत्रापेक्षा शिवभक्त जास्त होते आणि भक्ताला देवाचा शब्दच अखेरचा असतो.
विलक्षण बुद्धिमान ,तेजस्वी बलसंपन्न–बलसंपन्न असल्यानेच औरंगजेबाने सतत 40 दिवस केलेले अनन्वित अत्याचार ते सहन करू शकले.
भीती त्यांना माहीतच नव्हती आग्रा मुक्कामी असताना औरंगजेब भर दरबारात नऊ वर्षाच्या शंभूराजांना म्हणाला “हमे पता चला है की तुम कुश्ती खेलने मे बडे माहीर हो ,हमारे दरबार मे भी बडे बडे पहेलवान है, बोलो किसके साथ कुश्ती खेलना चाहोगे”त्यावर शंभूराजे उत्तरले “हा हम कुश्ती खेलने मे माहिर जरूर है पर हम कुश्ती बराबर वाले पहेलवानो के साथ ही खेलते है”सबब……….
काशीचे गागाभट्टनी शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत म्हणून आम्ही राज्याभिषेक करणार नाही. असे जेव्हा सांगितले तेव्हा संभाजी महाराजांनी त्यांच्याशी शास्त्रार्थ प्रश्नोत्तर केलेत .त्यावर गागा भट्ट ही निरूत्तर झाले आणि मराठी स्वराज्याला संभाजी महाराजांच्या रूपाने पहिला युवराज मिळाला.
ज्या कोणी मंत्रीगणांना स्वराज्यावर मालकी हक्क सांगायची लालसा निर्माण झाली. त्यांना आता पुरते कळून चुकले होते की प्रत्यक्ष राजाचं स्वराज्यावर स्वतःचा हक्क सांगत नाही .यापुढेही संभाजी मुळे या गोष्टी शक्य होणार नाहीत आणि मग फंद फितुरी आणि कटकारस्थानं सुरू झालीत. त्यातून खरा इतिहास बाटवणं सुरू झाला. संभाजीची प्रतिमा मलीन करण्याचे अनेक मार्गाने प्रयत्न सुरू झाले. “ते बदफैली आहेत,रंगेल आणि रगेल आहेत.” हे जनमानसात पोहोचवणं सुरू झाले. त्याचाच धागा पकडून शिवाजी महाराजांवर निघाले नाहीत एवढे म्हणजे ६० नाटके आणि २७ चित्रपट काढले गेले. इतिहासाची संपूर्ण शहानिशा न करता. संभाजी राजांवर जीवघेणे विषप्रयोग झाले. त्यांची सुपारी देऊन झाली. एवढेच नाही तर शंभूराजांना अटक करण्यापर्यंत कारस्थाने होत राहिली.
औरंगजेबाचा राजपुत्र अकबर जेव्हा औरंगजेबाशी पटेनासं झालं तेव्हा यल्गार पुकारून स्वराज्यात शरण घेऊन राहिला. स्वराज्यात येण्यास एकमेव कारण होते ते म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानात औरंगजेबाला पुरून उरणारा एकच राजा अस्तित्वात आहे तो म्हणजे संभाजी.
याच अकबराला संभाजीने आपला मित्र म्हणून स्वीकारले परंतु अकबराला भेट दिलेला हार अकबराने एका नर्तकीला भेट दिला हे समजल्यावर अकबर मैत्रीच्या लायक नाही त्याला दिल्या जाणाऱ्या सर्व रसदीवर बंदी आणली. चारित्र्याच्या आधारावर असा निर्णय घेऊ शकणारे संभाजी रंगेल आणि रगेल कसे असू शकतील?
संभाजी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष, भावनिकता आणि जिवंतता यांचा संगम. पित्याचा लोकांचा पिता असण्याचा वारसा व कर्तव्य संभाजींनी कधी सोडले नाहीत.
पोर्तुगीज ,इंग्रज ,डच ,कुतुबशाही, आदिलशाही ,सिद्धी एवढेच नाही तर मोघलांवरची पकडही कधी त्यांनी ढिली पडू दिली नाही.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आता स्वराज्याचा घास घ्यायला वेळ लागणार नाही .या कल्पनेने आठ लाखाची सेना आणि अपरिमित खजिना घेऊन आशियातील सर्वात मोठ्या राज्याचा आलमगीर ,सर्वात छोट्या राज्याचं परिपत्य करण्यासाठी दक्षिणेत दाखल झाला. कोणाचीही छाती दडपून टाकेल एवढा औरंगजेबाच्या सैन्याचा विस्तार होता. एकदा का औरंगजेबाची छावणी चा तळ पडला की आजूबाजूचा तीन मैलाचा परिसर व्यापला जात असे.
पण समोर शिवाजींचा कर्तुत्ववान छावा होता. तो तेव्हाच कडाडला”तू भलेही आलमगीर असशील पण आता मराठी मातीत तुला गाडल्याशिवाय राहणार नाही.”
नऊ वर्ष सतत संघर्ष आणि युद्ध औरंगजेब महाराष्ट्रात आणि शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या राज्यात चढाया करत होते, छापे मारत होते, लूट करत होते. एवढी एवढी शकल करीत निघाले आलमगीरच्या साम्राज्याची की एवढी धूळधाण कधीही शिवाजी महाराजांनी केली नव्हती काहीही केलं तरी शंभूराजांना औरंगजेबाला रोखता येईना.
आणि स्वराज्याचा प्रदेशही जिंकता येईना .औरंगजेब सतत फिरत होता पण कुठे पोहोचत नव्हता सतत लढाया करत होता पण कुठे जिंकत नव्हता. शंभूराजाचा पराक्रम आणि बुद्धीची झेप कधी त्याच्या आवाक्यात आली नाही.
मग औरंगजेब एखादा किल्ला जिंकून कमीत कमी स्वराज्याला भगदाड पाडायला निघाला. सहज एक दिवसात जिंकता येईल अशा रामशेज किल्ल्याची त्यांनी निवड केली. कारण काहीही करून यश मिळवणं जिंकणं हे त्याच्यासाठी श्वासा इतके महत्त्वाचे झाले होते. रामशेजवर केवळ 600 मावळे. एक नाही दोन नाही तर सहा वर्ष सहाशे मावळ्यांनी किल्ला लढवला. काय नेतृत्व असेल शंभूराजांचे ?काय निष्ठावान होता एक एक मावळा.
औरंगजेबाने आता शंभूराजांचे पूरते पाणी ओळखले होते.
आदिलशाही आणि कुतुबशाही कडे मोर्चा वळवून नाममात्र वेळात त्यानी ते दोन्ही काबीज केले. मात्र शंभू राजांना उघड उघड लढाईत जिंकता येणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. म्हणूनच तीन हजार लोकांचं फंद फितुरीचं खूप खोलवर जाळ विणलं. येसूबाई (संभाजींची पत्नी)चा भाऊ गणोजी शिर्के ही या जाळ्याचाच एक भाग होता.
संभाजी आणि येसूबाई सौभाग्य ला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य मांनणारे हे दोन्हीही स्वराज्याचे खंदे सेवक .
संभाजी महाराज औरंगजेबाकडनं पकडल्या जाणं हे स्वराज्याचं फार मोठं दुर्दैव होतं. 2 फेब्रुवारी 1689 ला शंभूराजांना पकडल्यानंतर अकरा मार्च 1689 ला महाराजांचे शीर कलम करण्यात आलं. तोपर्यंत चाळीस दिवस औरंगजेबाने अत्याचाराचा, छळाचा आणि क्रौर्याचा कळस गाठला.
उंटावरून धिंड काढणे , विदूषकी कपडे घालणे ,काटेरी साखळ दंड कोणीही या आणि फटके मारा, लघु शंका करा ,घाण टाका विटंबना विटंबना केली शौर्याची. केस उपटणे ,डोळे फोडणे,जीभ कापणे कातडी सोलणे, त्यावर गरम मिठाचे पाणी टाकणे, बोटे कापणे, मासाचे लचके तोडणे असे प्रकार केले.
तरीही ताठ कणा होता पाठीचा झुकला नाही शिवरायांचा छावा. शिवपुत्र म्हणून राष्ट्रधर्मासाठी, स्वातंत्र्यासाठी ,स्वराज्यासाठी, मराठी अस्मितेसाठी.
ज्या शरीराला त्रास देऊन आनंदी होण्याची ,बदला घेण्याची औरंगजेबाची इच्छा होती त्या शरीराच्या मर्यादांचे सिमोल्लंघन शंभू राजांनी बालपणीच रामकृष्णांच्या गोष्टी ऐकतानाच केले होते.
ज्या इंद्रायणी भीमा तीरी हा शंभूराजा बाळसला मोठा झाला पराक्रमी झाला. त्याच मातांच्या तीरी शंभू राजाचं शरीर छिन्न विछिन्न करून टाकण्यात आलं . गलबलले पूर्ण स्वराज्याचे काळीज ,निशब्द झाला आसमंत पण तो शंभूराजा आनंदात होता. कारण त्याची भक्ती आणि कर्तव्य त्यानी पूर्ण करून देवत्व प्राप्त केलं होतं.
राजे तुम हो साचे खूब लढे हो जंग
देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग.
हाच फरक असतो स्व मूल्यात आणि अहंकारात जगण्याचा.
अश्विनी गावंडे