wondervoices

पवनसुत

स्टीफन कोवे यांचे एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे.Seven habits of highly effective people त्यात एक कथा आहे. एक लढाऊ जहाजाचा कॅप्टन त्याच्या जहाजातून समोर दिसणाऱ्या प्रकाश अर्थात उजेडाला सांगतो .(त्याला ती एक दुसरे जहाज वाटते.)तुझ्या जहाजाची दिशा 20 टक्क्यांनी बदलून घे .त्यावर समोरचा व्यक्ती नाही म्हणतो. या लढाऊ जहाजाचा कॅप्टन हा उच्च दर्जाचा अधिकारी असतो. समोरील नाही हे उत्तर ऐकून, तो विचारतो तुला माहित आहे का मी कोण बोलतोय? मी लढाऊ विमानाचा हायेस्ट लेव्हलचा कॅप्टन बोलतो आहे. समोरचा माणूस म्हणतो सर मी सेकंड रँक चा सेलर बोलतो आहे. मी सांगतो आहे की मी माझी दिशा बदलवू शकत नाही.

समोरून कोण ऑर्डर देतोय हे ऐकल्यावरही नाही. यावर सेकंड रँक चा सेलर म्हणतो. सर मी लाईट हाऊस मधून बोलतोय. कॅप्टनच्या लगेच लक्षात येतं आणि तो समोरच्याला सांगतो ठीक आहे मग मी माझी दिशा बदलतो.

तात्पर्य हेच की लाईट हाऊस गाईड आहे. मार्गदर्शक आहे .जो बरोबर मार्ग दाखविण्यासाठी आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील लाईट हाऊस म्हणजे आपले गुरु. ज्याने गुरुचे ऐकले. तोच योग्य मार्गाचा पथिक.

पवनसूत हनुमान हे आपल्या सर्वांचे गुरु. भारतातील प्रत्येक लहान मुलांसाठी हनुमान म्हणजे एक सुपर हिरो च जणू.त्याच्याच कथा, त्याच्याच कविता, त्याचाच पराक्रम त्याचेच कार्टून इत्यादी इत्यादी. मग प्रश्न असा निर्माण होतो. की, आज 5000 वर्षे झाली तरी पण आपण हनुमानाच्या कथा का ऐकतो?

पण दुर्भाग्यवश असे झाले की आपला समाज आणि आपण आजही छोटी मुलेच राहिलो. समजेच्या अर्थाने. छोट्या छोट्या कथाभोवती घोटाळत राहिलो. ना आपण कथेचा सार काढला. ना त्यापासून काही शिकलो. कोणी जबरीने विचारलेच तर फक्त विश्वास ठेवा असं म्हणत राहिलो. ज्याचे पर्यावसान पर्यावरण कधी अंधविश्वासात झाले हे कळलंही नाही.

सरते शेवटी या पवनसुताचा उपयोग आपण आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनातील तणाव ,भयग्रस्तता ,चिंता अशा परिस्थितीशी झुंजण्यात आणि निम्न भावनांपासून मुक्त होण्यासाठी करत राहिलो.

संत तुलसीदासांच्या काळातील ही घटना. त्यांचा श्रद्धावान असणं ,नीतिमान असणं समाजाला खूप उपयोगाचं होतं .त्यामुळे समाजामध्ये त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. अकबर बादशहाला या सर्व गोष्टींचा जरा रागच आला. एक दिवस त्यांनी संत तुलसीदासांना जबरदस्तीने  बोलावून घेतले. आणि त्यांना आज्ञा केली सतत भगवंत भगवंत करत असतो ना . चल आता दाखव तुझ्या भगवंताचा चमत्कार. यावर तुलसीदासांनी जसा ही नकार दिला, तसं त्यांनी फतेपुर सिक्रीला संत तुलसीदास यांना बंदीवान बनवलं.

बंदीवासातले पुढील चाळीस दिवस संत तुलसीदासांनी रोज एक चौपाईची रचना करत. हनुमान चालीसा रचला. जशी तुलसीदासांची चाळीसावी चौपाई पूर्ण झाली. तशी पूर्ण फतेपुर सिक्रीमध्ये जंगलातील संपूर्ण वानर सेना अवतरली. या वानर सेनने जो काही फत्तेपूर सिक्री मध्ये धुमाकूळ घातला. त्याचे वर्णनच करता येईना. अनेक उपाय करून झाले परंतु परिस्थिती आटोक्यात येईना. शेवटी बादशहा अकबर संत तुलसीदासांना शरण आला आणि आता मी यापुढे काय करू? आपण मार्गदर्शन करा असे विनवू लागला. त्यावर संत तुलसीदास म्हणाले बादशहा तुम्ही आता फतेपुर सिक्री मधून निघून जा आणि यापुढे कधी इथे पाय ठेवू नका.

त्यानंतर बादशहा अकबर कधीच फतेपुर सिक्रीला आला नाही.

फक्त चालीसा रचल्यामुळे इतके काय झाले? इतके ताकद आणि इतके वैशिष्ट्य असणारा हा चिरंजीवी हनुमान कोण आहे? तो कोणाचा भक्त आहे? त्यामुळे त्याला इतकी शक्ती प्राप्त आहे. याचा विचार करणे क्रमप्राप्त होते.

सामान्यतः आपल्यालाही हनुमान हा श्रीरामाचा भक्त आहे. हे माहित आहेच. संत कबीर सुद्धा श्रीरामाचेच भक्त होते. त्यांनाही एकदा प्रश्न विचारला गेला की तुम्ही कोणत्या रामाचे भक्त आहात. तेव्हा कबीर दोह्यातून व्यक्त झाले.

एक राम दशरथ का बेटा

दुजा राम घटघट मे बैठा

तिजा राम जगत पसारा

चौथा राम जगत से न्यारा ||

दशरथ का बेटा अर्थात आपल्या कथा मधला राम, वाल्मिकी रचित किंवा संत तुलसीदास रचित रामायणातला आदर्श राम. दुजाराम म्हणजे आत्मराम जो प्रत्येकामध्ये आहे. तिजा राम जगतपसारा म्हणजे जगतामध्ये जी काही व्यापक शक्ती आहे. म्हणजेच प्रकृती अर्थात ब्रम्हांडाचे साकार रूप. मग चौथा राम कोण? निराकार रूप ब्रम्हाचं निराकार रूप. हेच पूजनीय आहे. हेच रामाचे मूळ स्वरूप आहे. यालाच रामाचे परमार्थ रूप असेही म्हणतात. जे अविगत , अलख, अनादी ,अनुपम आहे. अभिगत म्हणजे कालातीत, अलख म्हणजे ज्याला पाहूच शकत नाही, अनंत म्हणजे ज्याला आधी नाही आणि अंतही नाहीअसे,अनुपम म्हणजे ज्याला कोणतीही उपमा देऊ शकत नाही.

हा राम सकल विकार रहित गतभेदा आहे . गतभेदा म्हणजेच भेदाभेदाच्या पुढे आहे. हाच राम हनुमानाचे आराध्य आहे. म्हणजेच हनुमान असे सद्गुरु आहेत की ज्यांनी रामरूपी ब्रम्हाला स्वतःच्या हृदयात बसविलेआहे.

मग हनुमंत कोण?

पवनसुत-पवन अर्थात वायू ,प्राण ज्यायोगे सर्वांचे जीवन चालते, जो सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, जो अखिल ब्रम्हांडाचा श्वास आहे तोच हा पवनसुत.

शास्त्रामध्ये पाच प्रकारचे प्राण मानले गेले आहेत. प्राण, अपान ,समान ,उदान आणि व्यान. हेच ते पंचमुखी हनुमान ज्यांचा उल्लेख हनुमान चालीसा मध्ये संत तुलसीदासांनी पाच वेळा जय जय म्हणून केला आहे. याच प्राणशक्तीने आमची शरीर चालतात आणि तिन्ही लोक पण.

अलख निरंजन अनुपम श्रीरामाच अर्थात ब्रह्मस्वरूप श्रीरामाच सुद्धा हेच स्वरूप आहे. हे स्वरूप समजून घेण्यासाठीच मनुष्य जीवनाचे श्रम आहेत.

ब्रह्म स्वरूप श्रीरामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी अंतिम गंतव्यपर्यंत पोहोचण्यासाठीच हनुमंता सारख्या सद्गुरूची प्रत्येक मनुष्याला गरज आहे .कारण तो जय हनुमान आहे. जे म्हणजे ज्याने स्वतःवर विजय मिळवलेला आहे. विजय हा दुसऱ्यावर मिळवला जातो.

हा पवनसुत आम्हाला काय देतो? अर्थात प्राण आम्हाला काय देतो?

बल अर्थात साहस , विद्या म्हणजेच विवेक देतो. ज्याला बल आणि विद्येची प्राप्ती होते तिथेच त्याचे क्लेश (अज्ञान, अहंकार, राग, द्वेष ,अभिनवेश) आणि विकारांचा (काम, क्रोध, मोह, मत्सर, माया आणि लोभ ) यांचा नाश होतो. हेच क्लेश आणि विकार आजच्या युगात आमचे मालक बनवून चालत आहेत, किंवा आपण त्याचे गुलाम म्हणून वागत आहोत.

परंतु ब्रह्मस्वरूप जाणण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात कशी होते हे -सॉक्रेटिसच्या शब्दात सांगायचे झाले तर “the only true wisdom is knowing you know nothing. “स्वतःला बुद्धीहीन समजून.

“क्योंकी सारा श्रम विश्राम के लिए है|”

विश्राम तिथूनच सुरू होईल हीचसफलता. आणि सफलता मिळवण्यासाठीच लीन होणे गरजेचे आहे.

मग लीन होऊन कोणते कार्य सुरू करायचे आहे?

मनरूपी दर्पणाला स्वच्छ करणे. कारण आपलं मन विकारांनी मलीन आहे. म्हणून तर मला माझ्या घटातील रामाचे दर्शन होत नाही.

त्याकरिता वापरायचे साधन कोणते?

हनुमंतासारख्या सद्गुरूची “सरोज चरण रज”अर्थात कमळरूपी चरणांची धूळ घेऊन मलीन मन घासून स्वच्छ करायचे.

माझे मन स्वच्छ झाले की नाही हे कसे समजेल?

जोपर्यंत माझ्या मनात त्या ब्रह्मरूपी रामचंद्राची छाया दिसणार नाही. तोपर्यंत माझे मन स्वच्छ झाले हे समजणारही नाही.

इथे कमळ किंवा प्रभू रामचंद्राची छाया दोन्ही गोष्टी लौकिक/ प्राकृतिक आहेत. कारण निराकार अलख निरंजनापर्यंत पोहोचण्यासाठीची माझी वाट मात्र साकार रुपी असणे गरजेचे आहे. म्हणून माझ्या श्री गुरूंचे चरण हे कमलरुपी अर्थात चिखलरूपी आसक्तीत राहूनही अनासक्त असतील तरच मला प्रत्येक घटात बसणारा राम दिसेल.(आत्मराम)

याशिवाय या जगताच्या प्रकृती रुपी पसाऱ्यातील प्रत्येक अंशातील रामाची ओळख होईल. तरच beyond time and space म्हणजेच कालातीत असणाऱ्या higher order अर्थात ब्रह्म स्वरूप रामापर्यंत पोहोचता येईल.

मुख्य म्हणजे मनाची मलिनता दूर होणे सुरू झाले की , ,मला माझ्या मर्यादा कळतील. मिळवायचे काय आणि किती ? याच्या अथांगतेची नश्वरता लक्षात येईल. There is no enough is enough. हा मनातील भाव नष्ट होऊन. धर्म ,अर्थ, काम ,मोक्ष यामध्ये तृप्तता येईल. समृद्धीचा भाव येईल .मनातील अभावांचा अभाव नष्ट होईल.

कारण सद्गुरूंचे पूजन केल्याने लौकिक पुरुषार्थ आणि अलौकिक पुरुषार्थ याविषयी पूर्ण अर्थाने कळेल. लौकिक पुरुषार्थ म्हणजे मला काहीतरी पाहिजे आहे जे माझ्याकडे नाही त्याला मिळवण्याचा प्रयास. आणि अलौकिक पुरुषार्थ म्हणजे जे माझ्याकडे आधीच आहे त्याच्याप्रती सजग होण्याचा सतत सजग राहण्याचा प्रयास. (Awareness)

अर्थात जे भौतिक जगतात जे अपर्याप्त आहे ते प्राप्त करणे आणि अलौकिक जगतात”जो प्राप्त हे वही पर्याप्त है|”हे श्री गुरुचरणी लीन झाल्याशिवाय कळत नाही म्हणून लिहिता किंवा विनम्रता हेच या जगतातील सार्वकालिक सत्य आहे.

हा स्वतःच्या मर्यादा स्पष्ट होण्यानेच मानवाला त्याचं शौर्य, धैर्य, वीरता, संयम ,बुद्धिमत्ता ,नीती ,पराक्रम पांडित्य प्रदान करतात.

हेच माझ्यातील प्राणचे कार्य आहे ज्याची अधिकारी व्यक्ती जय हनुमान आहे .ज्याने हा ब्रह्म स्वरूप प्राण स्वतःमध्ये धारण करून स्वतः तेजपुंज तर झाला आहेच ,शिवाय तिन्ही लोक प्रकाशित केले आहेत.

देव लोकात इंद्राच्या ध्वजेवर मनुष्यलोकात दशरथ पुत्र रामाला मदत करून आणि पाताळ लोकात राक्षसी प्रवृत्तीचा नाश करून.

सप्तचक्र धारण करणारा मनुष्य देह जर समोर ठेवला तर मुलाधार, स्वादिष्टान आणि मणिपूर चक्र म्हणजे रावण. आणि वरचे तीन म्हणजे विशुद्ध, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार म्हणजे राम. हृदय म्हणजे अनाहत चक्र म्हणजेच हनुमान तर.

रावणाला ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरु हनुमानाची गरज आहे आणि राम समजून घेण्यासाठी सुद्धा हनुमानच पाहिजे. अनाहत चक्रात हृदयात वास्तव्य करणारा प्राणरूपी हनुमंत प्रत्येक व्यक्तीचं auto rhythm आहे. जो आपल्याला highest auto rhythm शी जोडण्यास तत्पर आहे. या अर्थाने हनुमान हा रामदूत आहे.

हनुमान अंजनी पुत्र आहे. निरंजन म्हणजे ज्यात डाग नाही आणि अंजन म्हणजे ज्यात डाग आहे. प्रकृतीत डाग आहे .पण प्रकृती साकारही आहे .आपल्यासमोर हनुमंत नेहमी साकार रूपातच राहतील ते गुणात बांधलेलेच राहतील. (गुण ते गुणातीतापर्यंतचा प्रवास घडवून आणण्यासाठी.)त्यांनी श्वासावर विजय मिळवलेलाच असेल तिथेच प्राणाचा संतुलन असेल .जेव्हा वाटेल तेव्हा हनुमान प्राण पुरवू शकतील म्हणूनच ते महावीर.

महावीर म्हणजे जो मन आणि आत्म्याचे रक्षण करतो. महावीर पूजनीय असतात.

असे सद्गुरू हनुमान कोणाचे काम करतात? कोणाला फळ देतात?

तर आजच्या काळासारखे त्यांनीही फिल्टर लावलेले आहेत. जे रामाचे काम करतात अर्थात निष्काम कर्म. हनुमानालाही त्यांच्यातच रस आहे. ज्यांना सत्संगात रस आहे.

कोणाचा सत्संग?

राम लक्ष्मण आणि सीतेचा सत्संग. सीता म्हणजे समभाव लक्ष्मण म्हणजे मनाचे एक लक्ष आणि राम म्हणजे ब्रह्माचे प्रतीक.

“जो समभावाने आपल्या मनाचे एक लक्ष धारण करून ब्रम्हाकडे अग्रेसर आहे.ते त्यांचे फक्त कार्यच करत नाही तर कार्य करण्यास आतुर असतात.”

आजच्या कलियुगातील प्रत्येक व्यक्तीचे मन हे मेघनाथ सारख्या असुरी प्रवृत्तीच्या प्रहारांनी मूर्च्छित झाले आहे . त्यामुळे ब्रम्हाला जाणण्यासाठी आलेलो आपण त्या eternal source शी disconnect झालो आहोत.

म्हणून तर कळत नाही की ज्या रामाला भेटायला मी जितका आतुर आहे त्यापेक्षा तो राम माझ्याशी भेटायला आतुर आहे. हे कळण्यासाठी हृदयातला प्राण हे माध्यम आहे.” I never know beloved too desires us -Rumi”

एकदा चित्रकूट नदी च्या घाटावर संत तुलसीदास चंदन उगाळत बसलेले असतात, आणि रामाच्या आठवणीने रडत असतात. तितक्यात त्यांच्यासमोर भगवान राम एका लहान बालकाच्या रूपात प्रकट होतात. व त्यांना चंदन मागतात. तुलसीदास भगवान रामाच्या आठवणीने खूप व्याकुळ आणि आतुर झालेले असतात. ते त्या बालकाला दुसऱ्याकडून चंदन घेण्यास सांगतात. परंतु भगवानरूपी बालक मात्र त्यांच्याकडूनच चंदन घेण्याचा अट्टाहास करतो. तेव्हा तुलसीदास त्याला त्रास न देण्याची विनवणी करतात. तुम्ही का रडत आहे ?तेवढं तरी सांगा. अनेकदा नकार देऊन झाल्यानंतर शेवटी तुलसीदास सांगतात की मला माझ्या देवाची खुप आठवण येते आहे.

बालक रुपी राम म्हणतात एवढी भक्ताला आठवण येत असताना आणि तो एवढा रडत असताना जर का ते भेटायला येत नाही म्हणजे तो खूप कठोर हृदयी असावा.

त्या बालकांनी आपल्या दैवताला असे म्हटलेले ही त्यांना आवडत नाही. ते म्हणतात तस काही नाहीये माझा भगवंत कोमल हृदयी आहे.

तेवढ्यात तिथे एक पोपट येतो आणि तो संत तुलसीदासांना सांगतो की ज्या रामासाठी ज्या भगवंतासाठी तू रडतो आहेस तो भगवंत साक्षात तुझ्यासमोर उभा आहे.

सांगण्याचं तात्पर्य हेच की प्रत्यक्ष भगवंत समोर जरी उभा राहिला तरी हा भगवंत आहे. याची जाणीव करून देणारा सद्गुरु मात्र जीवनात असणे गरजेचे आहे.

हा पवनसुत हाच सद्गुरु आहे.

ब्रह्मरूपी रामाने अशा या सद्गुरुरूपी हनुमंताला मिठी मारली आहे. कारण हनुमंताकडे प्रत्येकाला संजीवन देण्याची बुटी आहे.

ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यालाच फक्त आपण मिठी मारतो. असे नसून ,ज्याला आपण आपल्यासारखे मानतो त्यालाही आपण मिठी मारतो. ज्याला सगळं काही देण्याची इच्छा असते फक्त शब्दांनीच किंवा डोळ्यांनीच नाही तर, आपल्या रोमरोमातून देण्याची इच्छा असते म्हणून आपण मिठी मारतो. अशी इच्छा प्रत्यक्ष ब्रह्म रुपी भगवंताला हनुमंताला देण्याची इच्छा आहे. तोच पवनसुत आपला सद्गुरू आहे.

मृत्यू देवता यमाला पण आपण सर्वजण आवडतो.कारण त्यांनाही माहित आहे जोपर्यंत आपण सद्गुरु हनुमंताच्या हाती पडणार नाही तोपर्यंत अनेक वेळी त्याच्या हाती पडू. एक वेळ हनुमंताच्या हाती पडलो तर तो आपल्याला सर्व पार करून नेल्याशिवाय सोडणार नाही.

Glory never be explained it can only be experienced.

आणखीही खूप मांडण्यासारखे आहे. परंतु या अथांग ज्ञानाच्या समुद्रातील कणातील एकच कण मी वेचू शकले याची मला जाण आहे.

||श्री माऊली चरणी अर्पण||

अश्विनी गावंडे

7 Responses

  1. Khup sakhol dhyan, tumcha lekhn mhanje sabdachya athag sagrat pohe hoya dhanywad madam ani khup khup shubhechrchha

  2. मॅडम,खरंच खूप सुंदर !मंत्रमुग्ध करणारा लेख! या अक्षररुपी प्रवाही लेख यात्रेतून निर्गुण, निराकार ब्रह्म समजवण्यासाठी, साकार सद्गुरु पवनसुताच्या ,थेट हृदय गाभाऱ्यात पोहचवलंत. राम, लक्ष्मण , सीता यांच्या साक्षात्कारासाठी विवेकात्मचक्षुच महत्त्वाचे. सश्रद्ध तप,साधने शिवाय पर्याय नाही. जो प्राप्त है ,वही पर्याप्त है! पर्यंतचा हा प्रवास…….…!
    **** WITH GRATITUDE !

  3. खूप छान लेख.एक राम दशरथ का बेटा,चौथा राम जगतसे न्यारा.खूप सुंदर मांडलय .

  4. पवनसुत हनुमान ,रामभक्त हनुमान……… खरोखरच आपल्या लेखातून प्रत्येकच वेळ न ऐकलेल्या न माहीत असलेल्या अशा किती तरी गोष्टी, माहिती उलगडत जातात आणि लेख खूप काही ज्ञान वाढवून जातो…. लेख खरच खूप सुंदर आहे. अभ्यासपूर्ण लेखन आहे.

  5. 🙏महावीर हनुमान यांच्या विषयीच्या अथांग ज्ञानाच्या समुद्रातील आपण वेचलेल्या एका कणातील विस्तृत ज्ञानातील एक कण जरी वेचून ते ज्ञान माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचावे हीच माझी प्रभू रामांच्या चरणी प्रार्थना आहे, 🙏🙏जय श्रीराम, जय श्रीहनुमान 🙏🙏💐💐

  6. अश्वत्थामा बलिर् व्यासो हनुमंतो बिभिषणो परशुरामः कृपाचार्य सप्तै ते चिरजीवनः या आपल्या सप्त चिरंजीवांबद्दल मला अपार आदर वाटतो, त्यांच्याविषयी श्रध्दाभाव मनात दाटतो.कसलं विलक्षण योगसामर्थ्य आणि तपःसाधना असेल त्यांची.अशा आपल्या सप्त चिरंजीवांपैकी श्री हनुमंताला गुरू मानणं हा माझ्यासाठी खूप स्वागतार्ह, नवीन,परम अनुकरणीय विचार आहे.कारण श्री मारुतीराया म्हणजे शक्तीची देवता.आणि मारुतीराया म्हणजे संकटमोचक ही आपल्या मनाची द्रृढ झालेली धारणा आहे. या पार्श्वभूमीवर हनुमंताला गुरू मानून त्याच्या भगवान श्रीरामाप्रती असलेल्या निरापद,निरामय भक्तीमार्गावर पाऊल टाकायला मिळालं तर आपलं अहोभाग्यच! लेख उत्तमच.लेखातील उदाहरणेही चपखल! एका सर्वस्वी,वेगळ्या, अनुकरणीय, चिंतनशील विचार करण्याची ऊर्जा या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद. असाच तुझा हात लिहीता राहू दे .आणि तुझं किमान एक तरी पुस्तक आम्हाला लवकरात लवकर वाचायला मिळेल ही श्री माऊलींचरणी प्रार्थना .

  7. सर्व सन्मानानीय वाचकांना माझा मनापासून नमस्कार आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हा सर्व लेख वाचला त्यावर एवढ्या सुंदर प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *