निर्मिकांचा वारकरी
कोणत्याही मुलांच्या आई-वडिलांनी जे काम केले तेच काम त्यांची मुलेही करत राहतील. तर ते जगण्याच्या प्रक्रियेचा एक टप्पा वर कधी जाणार? अभावाच्या, दारिद्र्याच्या, दृष्टचक्राच्या ते आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या यातून बाहेर तरी कधी पडणार ?आणि मानवी आयुष्यातील अथांग शक्यतांचा त्यांना परिचय कधी होणारच नसेल तर त्या ते धुंडाळणार तरी कधी ?
हे वाक्य आज 21 व्या शतकाच्या आधुनिक युगात जितके लागू पडते .तितकेच ते 18व्यां शतकातही लागू पडले होते .म्हणजेच ज्योतिबांच्या काळात. मग प्रश्न उद्भवतो , की या दरम्यान आपण प्रगतीची वाट चाललोच नाही का ? की या पायावरचे ओझे त्या पायावर करत उभेच राहिलो आणि आपल्याला वाट चालण्याचा भास मात्र होत राहिला. असे म्हणण्याला कारणही तशीच आहेत .कारण कधी कोणती परिस्थिती उभी राहील आणि सर्व प्रकाश अंधारात आणि सर्व अंधार प्रकाशात परावर्तित होईल सांगता येत नाही.
शेवटी मर्त्य मानवाच्या हाती जीवन असेपर्यंत संघर्ष आणि अनिश्चित भविष्य एवढेच आहेत. या गोष्टी समजून घेण्याची प्रखर बुद्धिमत्ता असताना, एक दिवस ही सर्व प्रतिकूलता अनुकूलतेत बदलेल ह्या एका उमेदीवर इतरांसाठी स्वतःचे आयुष्य वेचणारे म्हणजे महात्मा फुले.
एखादे शिकार गिळून निपचीत पडलेल्या ॲनाकोंडा सारख्या समाजाला कड फेरायला भाग पाडणारे ज्योतिबा म्हणूनच महात्मा या पदाला आणि निर्मिकाचे वारकरी होण्याला सार्थ ठरतात.
ज्योतिबा नेहमी म्हणायचे 3000 वर्षाची जाती व्यवस्था तीस वर्षात जाईल. एवढा भोळसट आशावादी मी नाही. पण माझ्या वाट्याचे धक्के मात्र मी देत राहील.
ज्योतिबा अतिशय निर्भय ,निर्भीड काही अंशी तापट देखील होते जे सावित्रीबाईंच्या साथीने पुढे पुढे शांत होत गेले. प्रगल्भता मुळातच त्यांच्या अंगी होती. म्हणून तर मानवाच्या जगण्याचा उद्देश त्यांना लवकर सापडला. ज्याचा अर्थ त्यांना दैनंदिन जीवनाच्या वास्तविक अनुभवातून दिसला. तो म्हणजे मानव सेवा अर्थातच मानवी उत्थान. त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो म्हणजे प्रत्येक समस्येला समाधान द्यायचे.
त्यानंतर जी काही उलथापालथ त्यांच्या जीवनात झाली. या दांपत्याने भोगली याला तोड नाही.खरंतर एका दृष्टीने त्याचे लेखी पुरावे नसते .तर हे लोक असे जगले यावर कोणाचा विश्वास ही बसला नसता.
ज्योतिबांच्या सामाजिक सुधारणा अडसर ठरत असलेल्या लोकांनी ,त्यांना मारण्यासाठी 100 रुपये देऊन रामोशी पाठवले .ज्योतिबा त्यांना म्हणाले माझ्या मारण्याने तुम्हाला शंभर रुपये भेटत असतील आणि तुमच्या कुळांचा/ पिढ्यांचा उद्धार होणार असेल तर मला नक्की ठार करा .म्हणजे मी कुणाच्यातरी उपयोगात आलो हे पुण्य पदरात पडेल. आणि तिथेच त्यांचे शस्त्र खाली पडली.
पुढे यथावकाश या दोघांपैकी एक जण ज्योतिबांचा अंगरक्षक झाला तर दुसरा खूप शिकून विद्वान झाला त्यांनी ग्रंथ लेखन केले.
ज्योतिबा एक प्रगल्भ व्यक्ति सोबतच मनोशल्य चिकित्सक ही वाटतात. स्वतःच्या घरात सावित्रीबाई जेव्हा शिकण्या विषयी थोडी अनीच्छा प्रदर्शित करू लागल्या, कंटाळा आला किंवा थकल्या चं कारण सांगू लागल्या तेव्हा ज्योतिबा त्यांना म्हणाले “सावित्री तुला याआधी हे होत नव्हतं आताशा कंटाळा आणि थकवा येतोय हे बरोबरच कारण आहे.” ” कारण समाजात चालत असलेल्या स्त्री शिक्षणाविषयीच्या विरुद्ध असणाऱ्या दंतकथांनी आता तुझं मन काबीज केलंय त्याचं भय तुला वाटू लागले.” एकदा का तुझ्या अंतरंगातील हा भयाचा काटा निघाला की तुझी वाट आणि भविष्य खरंच सहज आणि सोपं आहे.
मळ्याची मशागत करणाऱ्या कुळातील ज्योतिबांनी मनाच्या मशागतीचे कार्य हाती घेतले कधी हळुवार विवेकाने तर कधी प्रखर तर्काने. जाती धर्माच्या, उच्चनीचतेच्या, स्पृश्य अस्पृश्यांच्या दलदलीत असलेल्या समाज मनाला या कुरीतींच्या दलदलीतून बाहेर काढायच असेल तर सर्व बुरसटलेल्या प्रथा परंपरांवर हल्ले चढवावेच लागतील ते समाज नष्ट करण्यासाठी नव्हे तर समाज आधुनिक करण्यासाठी.
सामाजिक सुधारण्याच्या जागरात जगत असताना सावित्रीबाईंनी ज्योतिबांमधील स्त्रीत्वाला खत पाणी घातले, तर ज्योतिबांनी सावित्रीबाई मधील पुरुषत्त्व जागृत केले. अन्यथा स्त्री समस्येच्या कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरचा भावनिक अस्तर ज्योतिबा समजू शकले नसते. आणि अंगावर शेण, माती ,घाण फेकणाऱ्या अरेला का रे ? म्हणण्याची प्रसंगी मुस्काटात ठेवून देण्याची पुरुषी सय सावित्रीबाईंच्या वागण्यात आली नसती .
निर्मिकांच्या वारकऱ्यांचा हा सामाजिक संसार. यात पूर्ण समाजाचं कुटुंब झालं दोन्ही कर्ते केवळ कर्म होऊन गेले एकूणच निर्मिकाचं कर्म झालं.
ज्योतिबा म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत .अखिल विश्वाला ज्याचा इतिहास प्रेरणादायी ठरला अशा शिवाजी महाराजांच्या समाधी शोधण्यापासून ते त्यांच्यावर पोवाडा लिहिणे या माध्यमातून स्वतःही प्रेरित होऊन तळागाळातील हिनेतेने वागवलेल्या लोकांच्या मनामध्ये प्रेरणा भरत.हे प्रवासाचे वर्तुळ तेव्हा पूर्ण झालं जेव्हा मुलींच्या शाळेत पोत्यातून(लोकांच्या भयामुळे तिचे वडील तिला पोत्यातून लपवून शाळेत आणत असत) येणारी मुक्ता साळवे ग्रंथ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता झाली. फातिमा शेख जेव्हा मुस्लिम स्त्रियांच्या उत्थानासाठी सिद्ध झाली .
शिक्षणापासून ते घरातील पाण्याचा हौद खुला करून देईपर्यंत. बालहत्या प्रतिबंधक गृहापासून ते सत्यशोधक समाजापर्यंत. विधवा विवाहपासून ते न्हाव्याच्या संप घडवून आणण्यापर्यंत .स्त्री पुरुष समानतेपासून ते कामगार कल्याणापर्यंत .
कार्यात किती विविधता प्रत्येक कार्याची लांबी, रुंदी आणि खोली वेगळी. वेळ आणि अवकाशात त्याचे महत्त्व वेगळे. प्रत्येक कार्याच्या गरजेप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये अपरिमित ऊर्जा स्त्रोताचे काम ज्योतिबांनी कधीही न दिसणाऱ्या दिव्या प्रमाणे केले. या समाजरूपी कापडाची कधी जबरदस्तीने विण उसवली तर कधी हळुवार तूरपाई केली .
इंग्रजांचा राज्य भारतावर टिकणार नाही. हे त्यांना स्पष्ट होते. परंतु ते नेहमी म्हणायचे असा समाज स्वतंत्र होऊनही काय कामाचा. जो त्याच्या अर्ध्याहुन लोकांना माणसाचा जगणं नाकारतो. स्वतःच्या कुरीती आणि कुप्रथांच्या दलदलीत आम्हाला सुधारणांची काही गरज नाही. असे बेगडी आत्मविश्वासा वर ठणकावून सांगत राहतो.
आज सारख्या बोल घेवड्या समाजसुधारकांवर फुल्यांनी निर्भीड हल्ले केले त्यांच्या या हल्ल्यांमध्ये भाषेची प्रखरता होती, विरोध होता खरी, पण प्रत्येक वेळी त्यांच्या मनामध्ये जखम व्हायची ती पाखंडी आणि दांभिकपणा मुळे. ते म्हणायचे सामाजिक सुधारणांचे अर्ध्वर्यू म्हटल्या जाणारे आधारस्तंभ जेव्हा हलतात तेव्हा राग नाही येत, वाईट वाटतं .शोषितांचा विवेक जागृत करणे कर्म कठीण पण खरी मेख तर ही आहे की ,या आधार स्तंभाचाच स्पष्ट निर्णय होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
बालहत्या प्रतिबंध गृह जेव्हा काशीबाई या विधवेची अवस्था पाहून इतर विधवांसाठी सुरू केले तेव्हा ते म्हणाले, की जातीप्रथा आणि रुढीसाठी स्त्रियांना पुनर्विवाहाचा हक्क जर नाकारत असाल. तर यापेक्षा वेगळे काय होणार आहे? क्षु द्रातील सुधारणा आणि स्त्रियांना त्यांच्या ज्ञानाचा ,विकासाचा ,जगण्याचा हक्कच दिला जात नसेल तर त्यांचे पर्यावसन कशात होणार? मला कधीही नाकारणाऱ्या चा राग येत नाही. तर त्यांच्या अज्ञानामुळे आगळीक घडते आहे याचे दुःख होते.
ज्योतिबांच्या मनात सर्वांविषयीचा किती स्वीकार भाव होता .म्हणून अशी व्यक्तिमत्वे आणि आणि त्यांची कार्य कालातीत होतात.
1868 सालचा प्रसंग जेव्हा फुले दांपत्याला मुल होत नव्हते. तेव्हा घरच्यांनी ज्योतिबांना दुसरे लग्न करण्याचा तकादा लावला. त्यावर ते म्हणाले मला दुसरे लग्न करण्याचा हक्क आपण सर्वजण देत आहात त्याचप्रमाणे सावित्रीलाही हा हक्क आपण दिला पाहिजे. तरच तो न्याय्य ठरेल .नाहीतर तो सावित्री वरचा अन्यायच ,आज 2024 आहे…..
खरं म्हणजे कोणत्याही महापुरुषाच्या चरित्राचा अवलोकन आपण तेव्हाच करतो जेव्हा असे महान कार्य करण्याचे बळ कोणत्या विश्वासावर त्यांच्या अंगी आलं असावं ?हे बघण्यासाठी. त्यातून प्रत्येकाला
माझ्याही अंगीअस बळ यावं असे कुठेतरी खोलवर जिविशा उमटते शेवटी मी ही या निर्मिकाचाच वारकरी आहे .
आज समाजासाठी असे कार्य करण्याची आवश्यकता नाही. केवळ मी माझे उत्थान करू शकलो तरी खूप आहे.
“कारण जगात असा एकही बुरुज नाही की जिथे ,घोरपड लावता येत नाही.”
!! श्री माऊली चरणी अर्पण!!
अश्विनी गावंडे.
थोडक्यात लयभारी..
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा जीवनपट खूप ऊत्तमरितीने अभ्यासपूर्ण मांडलाय.खूप खूप धन्यवाद.खरच तुझे लेखन खूप प्रभावी आहे
आति सुंदर
Very good 👍 👏 👌
Mast yekdam
अप्रतिम, खूपच छान… ज्योतिबा किती छान रेखाटले… अतिसुंदर लिखाण… अश्विनी….
EXCELLANT…….. YOU WROTE VERY NICE TAI👌👌👌👌🙏🙏🙏
sundar madani tai
खूपच अप्रतिम लेखन,👌👌u😊�j😊jमहात्मा फुलेंच्या काळातील जीवनपट जणू डोळ्यांसमोर उभा केला, धन्यवाद Mam 🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण… प्रेरक… तुमच्या या लेखामुळे अनेकांना दिशा मिळेल… अप्रतिम शब्दांकन…. खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन मॅडम
खूप सुंदर लिहिलंय.. शेवटचे काही वाक्य तर काहीतरी करण्याची उभारी मनाला देऊन जातात.
खूप छान लिहिले छोटू ताई,
खूप छान लेखन सावित्रीबाई फुले व jyotiba यांचा जिवन प्रवास, त्यांचे कार्य आम्हाला खूप माहिती मिळाली आहे प्रत्येक लेखात खूप विचार दडलाय तुमच्या, खुप खुप अभिनंदन mam
तुम्ही खरंच छानच लिहिता मॅडम
अंतर्मनातील अंधारल्या दलदलीत जेव्हा विवेकरुपी ज्ञानसूर्याचे कवडसे डोकावतात, तेव्हा चैतन्य -संजीवनीतुन फुललेली ज्योतिबांसारखी ज्ञानकमळेच विश्वात्मकाच्या पूजेसाठी सार्थ ठरतात. निर्मिकांचे वारकरी होतात. तेथे कर माझे जुळती!!
तुमचा लेखन प्रपंच अतिशय सुंदर! मनाची मशागत करून विवेकाचे बीज पेरणारा.