ध्वज विजयाचा उंच धरा रे ……
राबिया बगदाद ची विख्यात संत .राबिया ही नेहमीच काहीतरी शोधत असायची. आजूबाजूच्या बघणाऱ्यांना नेहमी वाटायचं राबियाचं काहीतरी महत्त्वाचं हरवलेलं आहे. मग ते सर्वजण तिला शोधू लागायला यायचे. एक अर्धा तास झाला की विचारायचे, पण आई तू नेमके शोधतेस काय? ती म्हणायची मी पहिलेच तुम्हाला यायला नकार दिला होता ना .आता मला पुन्हा पुन्हा विचारू नका. तरीपण लोक विचारायचे थांबले नाही .
आई नेमकं सांग हरवलय काय आणि कुठे?
अरे सुई आणि दोरा हरवलाय. अच्छा कुठे?
अरे तिकडे झोपडीत.
मग आपण इथे सर्व काय करतो आहे?
मग शोधायचं तर झोपडीत शोधावे लागेल ना.
अरे कसं शोधावं तिकडे तर अंधार आहे ना.
हो मग आई आधी आपल्याला तिथे उजेड करावा लागेल आणि तिथेच शोधावं लागेल जिथे हरवले.
मग राबिया त्यांना म्हणायची तेच तर माझं म्हणणं आहे ना .
तिथे शोधावं लागेल, जिथे हरवलय.
मग कराना स्वतःच्या आत उजेड.
इथेच तर अंधार झालाय.
तिथलाच तर आनंद हरवला आहे.
इथे शोधावा लागेल ना .
बाहेर कुठे शोधताय आनंद?
राबियाच्या काळापासून आज आजतागायत जगात सर्वांचाच आनंद हरवला आहे. सर्वच जण आनंद बाहेर शोधतात आहेत.माझ्यातला आनंद शोधायचा म्हटला तरी सामान्य माणसाला तो सहज सोपा नाही शोधणं. परंतु तो सहज सोपा व्हावा ,यासाठी मानवी संस्कृतीने फार मोठं काम केलं आहे.
मुळात मानव संस्कृती घडवत असतो. कधी संस्कृती मानव घडवत असते. मानवाच्या अस्तित्वाचे मूळच मुळी आनंद आहे. मानवाचं जन्मच मुळी आनंद मिळवण्यासाठी आहे.
आनंदाचे उच्च प्रकटीकरण म्हणजे उत्सव आणि आनंद मिळवण्यासाठी सुद्धा उत्सव.
असाच एक उत्सव म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस भारतीय नववर्ष दिन. काही लोक गुढीपाडवा हा सण नसून वर्षारंभ आहे असे म्हणतात. त्यावेळी गौतमीपुत्र शालिवाहनाने शकांना हरवून स्वतःचे राज्य स्थापन करून शकसंवत्सर सुरू केलं. हा उत्सव महाराष्ट्र ,गुजरात ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे साजरा केला जातो.
गुढीपाडवा उत्सव आणि गुढी ची रचना व्यक्तीला चौफेर विचार करायला लावून हृदयाच्या आनंदापर्यंत पोहोचवतात. याला उर्ध्वगामी पद्धत असे म्हणू शकतो. अर्थात विचार बुद्धीच्या माध्यमातून हृदयापर्यंत.
हृदयातील आनंदाचे प्रकटीकरण नित्य उत्सव म्हणून साजरा करणे ही झाली अधोगामी पद्धत.
भारतीय आध्यात्मिक परंपरेत दोन्ही पद्धती ग्राह्य आहेत. कारण अध्यात्म आणि संस्कृती व मानवी जीवन हे मुळी वेगळे नाहीतच. कारण मानवी जीवनातील घटनांची संस्कृती बनत असते. म्हणून संस्कृती म्हणजे मानवी जीवनातील घटना आहेत. ज्या मानवी जीवनातच घडतात. मग मानव एक , आणि मानवी जीवनातील घटना वेगळ्या कशा ? जगणं वेगळं कसं?
म्हणून सण, समारंभ आणि उत्सव वेगळे कसे?
गुढीपाडवा या सणात नैसर्गिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि वैज्ञानिक मर्म दडलेले आहे .संस्कृती अशी एकात्मिकरणात्मकच असते.
गुढीपाडवा या सणातील नैसर्गिक भाव म्हणजे वसंत ऋतुचे आगमन. वसंत ऋतू नवोन्मेश, कोमल पालवींनी भरलेली सर्व वृक्षराजी. अर्थात नवीनतेची उभारी. तेही केव्हा ?जेव्हा संपूर्ण आसमंतात उन्हाचे जोर वाढत असताना.
कोमलता, नवीनता धारण करण्याची उमेद .ह्या कोमलतेचे नवीनतेचे रूपांतर एका सशक्त डेरेदार वृक्षात करण्याची अनिमिष ओढ. त्याचप्रमाणे बाहेरचे जग कितीही रखरखीत दिसत असले, तरीही मनातील कोमल, सकारात्मक, आशावादी , सुजनात्मक , शुद्ध, श्रेष्ठ रचनात्मक विचारांची पालवी तीही एका परिपक्व जीवनात रूपांतरित करण्याची जिद्द हाच पुरुषार्थ.
वातावरणातील ऊर्जा घेऊन विकास पावणेआणि इतरांचा विकास व्हावा म्हणून दात्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचण्याची ,दातृत्वाची ओढ शांत करून समाधान मिळवण्याची शिकवण. हाच गुढीचा नैसर्गिक भाव.विकास क्रम आणि विकास. संपूर्ण सृष्टीचा आणि सृष्टीतील प्रत्येक घटकाचा.
गुढीपाडव्याच्या सणातून दिसणारा दुसरा भाव म्हणजे ऐतिहासिक भाव आणि पौराणिक भाव. भगवान श्रीरामांचा रावणावर विजय मिळवून अयोध्येत पोहोचण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. असत्यावरील विजयाचा दिवस. अयोध्येतील लोकांनी गुढी उभारून साजरा केला. हा राम दशरथनंदन, कौशल्यापुत्र अयोध्येचा राजा तर आहेच. पण त्यापेक्षा वेगळा राम आहे. जो मर्यादा पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनाच्या मर्यादा जाणून त्या लांघून (पार करून)जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे. खरा विकास आहे. हे समजणारा आणि त्याच्या उदाहरणाच्या माध्यमातून सर्वांना समजून देणारा हा राम .
भारतीय परंपरेनुसार एकूण चार युग मानली जातात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग , कलियुग . कलियुगा पूर्वीच्या युगांमध्ये मानवाचे प्रत्यक्ष शत्रू दिसत तरी होते. सत्य युगामध्ये देव आणि दानव होतेच परंतु भू लोक आणि पाताळलोक असे अंतर राखून होते. त्रेता युगामध्ये रावणाच्या रूपाने रामाचा शत्रू हा दूर देशी होता. द्वापार युगात कंसाच्या रूपाने श्रीकृष्णाचा शत्रू घरातच आला. आणि आता तर प्रत्येक व्यक्तीचा शत्रू हा त्याच्या आत मध्येच आला आहे. सकारात्मक आणि नकारात्मकतेच्या रूपाने.
व्यक्तीने स्वतःच्या आतील नकारात्मकता संपवतो असे जरी ठरवले तरी मलाच संपवणे आले. म्हणून संपविण्यापेक्षा परिवर्तन महत्त्वाचे. कारण सकारात्मकता असो की नकारात्मकता दोन्हीही ऊर्जाच आहेत. ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे. न ऊर्जा निर्माण होते न तिचा नाश होतो. ऊर्जेचे केवळ परिवर्तन होते .म्हणून आजच्या काळात प्रत्येकाची रणभूमी झालेली मनोभूमी चे रूपांतर अयोध्येत करणे अर्थात अयोध्या म्हणजे अयुद्ध म्हणजे जिथे युद्ध नाही. घर्षण नाही. संघर्ष नाही असे.
मग प्रश्न उरतो की प्रत्येक मानवाची मनोभूमी ही रणभूमी झाली कशाने? तर विकृत विषय वासनांनी म्हणून या विकार वासनांना जिंकून सदगुणांची जागृती करणे. यासाठी साधना व असे सद्गुण निरंतर रहावे म्हणून उपासना. हा गुढीपाडव्यातील अध्यात्मिक भाव मला दिसतो.
गुढीपाडव्याच्या वैज्ञानिक मर्म त्याच्या प्रसादात दडलेले आहे. धने , गूळ कडुलिंबाची पाने आणि होळीची गाठी. यातील प्रत्येक गोष्ट पित्तनाशक, शरीर शांत करणारी त्यायोगे शरीराला सर्वात जवळचे असणारे ज्याला आपण अकरावे इंद्रिय म्हणतो ते मन शांत करणारी. कारण सर्व सिद्धींचे मूळ हे मनाच्या प्रसन्नतेतच आहे.
कडुलिंब हे प्रतिकात्मक सुद्धा आहे जीवनात येणाऱ्या कटू अनुभवांना पचवून होळीच्या गाठीच्या साखरेचीच गोडी साधावी. नात्यातील कटूता, स्मृतीतील कटूता समाप्त करावी. मग उरतात ती फक्त जगण्याची मूलभूत तत्व प्रेम, रस ,सौजन्य.
या सत्वगुणांनी युक्त होऊन नवीन शरीर धारण करणे त्याचे प्रतीक म्हणजे गुढीला लावलेली रेशमी तलम साडी. सत्व शरीर, कांचन काया. त्यावर उपडा तांब्याचा पेला म्हणजे तडीत वाहकच जणू.
हा तांब्याचा पेला म्हणजे ब्रम्हांडाची/अंतराळाची लालीमा, चैतन्य, शांती, विशालता ,पवित्रता, खेचून घेण्याची शक्ती. Connection with highest order. कारण “पिंडी ते ब्रह्मांडी”
गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी सृष्टीचे सृजन केले असे म्हणतात. ब्रम्हांडातील गुण पिंडित (व्यक्तीत) उतरवणे हीच मानवाची प्रमुख उच्चता हाच उत्कर्ष. मलीन मानवातून ब्रह्मांडाशी एकरूप मानव निर्माण करणे .यापेक्षा एका व्यक्तीची सृजनता ती काय असू शकते?
हाच उत्सव आणि हाच आनंद. म्हणून ह्याच आनंदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किंवा याच मार्गाने आनंदापर्यंत पोहोचणे. हीच मानवाची विजयी पताका हीच गुढी. असा ध्वज सर्वांनी उंच धरावा आणि एकमेकांच्या आशा पल्लवीत ठेवाव्यात. हाच मुक्काम हाच विश्राम आणि त्यासाठी सर्व श्रम
“साराश्रम विश्राम के लिये|”
एकदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे काही शिष्य गावोगावी आपली शिकवण देत फिरत होते. सर्वांना पुढच्या गावी जायचे होते. परंतु सर्वजण चालून चालून थकले होते. म्हणून आनंद गौतम बुद्धांचा शिष्य म्हणाला की तो तिथे शेजारी एक म्हातारा माणूस दिसतोय त्याला विचारायचं का ?गाव किती दूर आहे ते? भगवान म्हणाले विचार-त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितले की बस आता शेवटच्या टप्प्यात आले आहात तुम्ही. गाव फक्त दोन किलोमीटर उरलाय. आणि तो म्हातारा माणूस गौतम बुद्धांकडे पाहून हसला. हे आनंद ने बघितलं.
मग आता बसायचं कशाला दोनच किलोमीटरवर गाव असल्यामुळे म्हणून सर्वजण चालत राहिले. पण गाव काही येई ना.त्यानंतर एक म्हातारी स्त्री त्यांना दिसली. पुन्हा आनंद ने भगवानांना विचारलं. विचारायचं का आजीला गाव किती दूर आहे ते? भगवान म्हणाले विचार-आजीने पण तेच सांगितलं . गाव फक्त आता दोन किलोमीटर उरले आहे .ही आजी सुद्धा गौतम बुद्धांकडे पाहून हसली. हे ही आनंद नी टिपलं.
प्रत्येक जण दोन किलोमीटर म्हणत होता. परंतु गाव काही येईना . शेवटी एक शेतकरी शेतात काम करताना दिसला. आनंदला त्याला प्रश्न विचारण्याचा मोह काही आवरला नाही. त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारले. शेतकरी म्हणाला हे काय आलंच आहे गाव फक्त दोन किलोमीटर राहिलय. बस संध्याकाळच्या आत तुम्ही तिथे पोहोचालच.आणि तो शेतकरी सुद्धा गौतम बुद्धांकडे पाहून हसला.
यावर आनंदचा मात्र खूप त्रागा झाला. तो म्हणाला भगवन प्रत्येक जण दोन किलोमीटर गाव राहिलाय असं म्हणतोय आणि सांगितल्यानंतर प्रत्येक जण तुमच्याकडे पाहून हसतोय.
आनंद चा त्रागा ओळखून गौतम बुद्ध त्याला म्हणाले तुला आठवत नसेल परंतु मी या ठिकाणी यापूर्वी एकदा येऊन गेलो आहे. गाव अजूनही 20 किलोमीटर दूर आहे. परंतु प्रत्येकाने जर असेच सांगितले असते की गाव आणखी खूप दूर आहे. तर दोन किलोमीटरच्या ओढीने सहा किलोमीटर चाललेलो आपण इतके पुढे आलो असतो का?
मग ते तिघेही तुमच्याकडे पाहून का हसले? गौतम बुद्ध त्यावर हसले आणि म्हणाले. या पृथ्वीवर जन्म घेतला आहे. तर एकमेकांना प्रेरणा देत राहणे. प्रोत्साहित करत राहणे .हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. ते मला आणि त्या म्हाताऱ्या बाबांना, त्या म्हाताऱ्या आईला आणि त्या शेतकऱ्याला कळलेले आहे. म्हणून ते तिघेही माझ्याकडे पाहून हसले.
या जगात आपापली यात्रा पूर्ण करताना प्रत्येकाने प्रत्येकाला असेच प्रोत्साहित करण्याची भूमिका बजावायची आहे.हाच तर ध्वज विजयाचा उंच धरा रे ….
||श्री माऊली चरणी अर्पण ||
अश्विनी गावंडे
खूप सुंदर ताई…
या लिखाणातून तुमची प्रगल्भता निदर्शनास येते..
अतिशय प्रेरणादायी विचार..
“Beautiful writing! It’s thought-provoking and truly inspiring. I really enjoyed reading it!”👍👌👌
किती छान लिहिलय ग
आतापर्यंतच्या तुझ्या सर्व लेखांपैकी मला सर्वात जास्त आवडलेला हा लेख आहे.अशीच तुझी लेखणी कायम बहरत राहो ह्या शुभेच्छा
आपण सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो ,पण त्या मागचे खरे ज्ञान आणि विज्ञान आपल्याला सखोल माहित असतेच असे नाही .आपला प्रत्येक लेख ज्ञानाने ओतप्रोत असतो .आज लेख वाचल्यानंतर ज्ञानाची गुढी उभारल्यासारखे वाटले .अतिशय मार्मिक, अर्थपूर्ण, ज्ञानवर्धक ,दिशादर्शक असा लेख आहे .नेहमीसारखेच अर्थपूर्ण आणि मनाला भावेल,सुंदर असे लिखाण आहे.
https://www.noo.by/wiki/Backstreet_Boys:_Короли_бой-бэндов
स्वतः मधला आत्मविश्वास कायम ठेऊन सोबतच इतरांना त्यांच्या ध्येय्यासाठी प्रेरणा देत राहणे हा भगवान गौतम बुद्धांचा थोर उपदेश या लेखातील एका कथेत सांगितला आहे, तसेच गुढीपाडव्याच्या सणाचे महत्व अर्थपूर्ण स्पष्टीकरणातून मांडले आहेत, खूप छान Mam 🙏🙏धन्यवाद