महर्षी रमण यांच्याजवळ एक एम. एस. सी. केमिस्ट्री झालेला पीएचडी करणारा मुलगा आला आणि म्हणाला स्वामीजी “मला देवाला जाणून घेण्याची इच्छा आहे.” मला आता फक्त तेच करायचं आहे. त्यावर महर्षी रामन त्याला म्हणाले
“कुणावर प्रेम झालय का तुझं कधी?”
त्यावर तो म्हणाला
स्वामीजी मी अशा गोष्टींच्या फंदात पडत नाही.
त्यावर महर्षींनी त्याला विचारलं “कधी असं वाटलं का तुला की अमुक एक मुलगी जर मला भेटली नाही, तर बस संपलं माझं आयुष्य?” त्यावर तो स्वामीजींना म्हणाला” मी सांगितलं ना महाराज मी अशा फंदात पडत नाही.”
तेव्हा महर्षी त्याला म्हणाले “मग जा तू मी तुझी देवाशी भेट घडवून आणू शकत नाही ? तू देव कोण आहे हे समजू शकत नाहीस.”
“कारण तू अजून माणसाशीच भेटला नाहीस.”
कारण या जगात प्रेमासारखा सुंदर भावच दुसरा कुठलां नाही.
ज्याने खरं प्रेम केलं आहे. त्याचा भावच वेगळा असतो त्या व्यक्तीप्रती.
तू है तो दिल धडकता है |
तू है तो सास आती है |
तू ना तो घर घर नही लगता |
तू है तो डर नही लगता |
तू है तो गम ना आते है |
तू है तो मुस्कुराते है |
तू है तो दिल धडकता है……
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती व्यक्ती असतेच असते. की जिच्यामुळे त्याच आयुष्य चालू असतं .कधी ती प्रेयसी असते ,तर कधी प्रियकर ,कधी बायको असते तर कधी नवरा ,कधी आई असते तर कधी वडील, कधी बहीण असते तर कधी भाऊ ,तर कधी आणखी कोणी.
व्यक्तीच्या आयुष्यात सर्वोच्च जर काही असेल तर प्रेम. मानवी विकासाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रेममयता, प्रेम पूर्णता. व्हॅलेंटाईन डे हा असाच प्रेम दिवस म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये साजरा केला जातो. खरंतर व्हॅलेंटाईन डे म्हणजे संत व्हॅलेंटाईन यांचा मृत्यू दिन.
इटलीतील प्रखर ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन. त्याकाळी युरोपमध्ये लिव्ह- इन – रिलेशनशिपचे चलन होते. ज्या पद्धतीने आता आपल्याकडे चांगलेच मूळ धरले आहे.
लिव्ह – इन -रिलेशनशिप म्हणजे मानवी जीवनातील सततची अस्थिरता. याचे संत व्हॅलेंटाईनने निरीक्षण केले. त्यानंतर पौर्वात्य संस्कृती बघितली तर इकडे लग्न. एक व्यक्ती आवडली ,ती निवडली. तिच्याशी लग्न करून सुखनैव राहता येते. ज्यामुळे मानवी जीवनातील अस्थिरता नष्ट होते. असे त्यांना वाटत होते. कारण मुळात माणूस हा सुखधर्मी आहे .त्याला त्याचे जीवन आरामात जगायचं असतं.
म्हणून संत व्हॅलेंटाईन यांनी लग्न करून राहण्याची पद्धती निवडली आणि त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. लग्न किंवा परिवार संस्थेतील शांती , स्थैर्य लोकांनाही पटू लागले. मग युरोपातील अनेक लोक लग्न करून राहू लागले. ते मात्र तेथील राजा क्लोडीयस याला अजिबात आवडले नाही. कारण व्हॅलेंटाईन हे आपली परंपरा मोडीत काढत आहेत .असे त्यांना वाटले. 14 फेब्रुवारी 478 A.D. ला त्यांनी संत व्हॅलेंटाईन ला बोलावून घेतले आणि फाशी दिली.
आजही युरोपमध्ये जे लोक लग्न करतात ते हा दिवस साजरा करतात.
जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव असतो. परंतु भारतीय सनातन संस्कृतीमध्ये (आताशा हा शब्द वापरण्याची इच्छा होत नाही कारण तो अनेक अर्थांनी निसरडा झाला आहे.) परंतु भारतीय सनातन संस्कृती दुसरे तिसरे काही नसून निसर्ग नियमच आहे. तर अशा या निसर्ग नियमानुसार मानवी जीवन हा “नित्य उत्सव” आहे. म्हणून वर्षातून एकदा प्रेमाचा दिवस साजरा करून संपवणे एवढे छोटे मानवी जीवन नाही.
आज या कृत्रिम हुशारीच्या (Artificial intelligence) जगात. आपण प्रेम खूप संकीर्ण करून टाकले आहे. खूप शारीर करून टाकले आहे . आजकाल चे प्रेम हे खूप दिखाऊ झाले आहे. जेव्हा की प्रेम हा खूप नाजूक आणि तरल भाव आहे.
मुळात मानव म्हणजे कोण? व्यक्ती. व्यक्ती म्हणजे कोण? तर जो व्यक्त होतो तो व्यक्ती. व्यक्ती कसा व्यक्त होतो? तर त्याच्या वागण्या बोलण्यातून. आणि व्यक्तीच्या प्रत्येक वागण्या बोलण्याच्या मागे असतात ते विचार. जे सूक्ष्मतम असतात.
विचार तयार होतात ते व्यक्तीच्या भावा तून (emotion s). अर्थात भाव व्यक्त करण्यासाठीच विचार . विचार व्यक्त करण्यासाठीच वागणे बोलणे म्हणजे भावच.जे व्यक्तीचे मूळ आहे. जे मूळ आहे तेच व्यक्तीचे मूल्य आहे. हे मूल्य म्हणजेच व्यक्तीची मौलिकता आहे.
व्यक्तीमध्ये इतर अनेक मूल्य आहेत परंतु प्रेममयता हे सर्वोच्च मूल्य आहे.
प्रेम म्हणजे शृंगार नाही . प्रेम म्हणजे आवेश नाही. प्रेम म्हणजे संमोहन ही नाही .
प्रेम पूर्ण मूल्य आहे .मानवी जीवनाचा चर्मोत्कर्ष आहे प्रेम. मानवी जीवनाचा जन्मोत्कर्ष आहे प्रेम. प्रेम म्हणजे अनन्यता जिथे कोणी अन्य राहतच नाही. प्रत्येक व्यक्ती प्रेमास्पद आहे.
प्रेम पूर्ण होणे ही मानवी जीवनाची यात्रा आहे. मानव प्रेममय होणे हे गुरुमूल्य आहे .यामध्ये अनेक लघु मूल्य अर्थात अनेक इतर मूल्य सामावलेले असतात.
सर्व नाती संबंधांचा आधार आहे विश्वास मूल्य जे सौजन्याने व्यक्त होते. व्यक्ती आत्मविश्वास पूर्ण असेल जगाप्रती आश्वस्त तर त्याच्या वागण्यामध्ये सौजन्यता येते. म्हणण्याचे तात्पर्य विश्वास हे निहित मूल्य आहे, जे सौजन्यतेने व्यक्त होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर विश्वास ही व्यक्तीची स्थिती आहे आणि सौजन्यता ही त्याची गती आहे.
दुसरे मूल्य आहे सन्मान जे सौहार्दतेने व्यक्त होते. सन्मान म्हणजे समानतेने वागवणे. प्रत्येकाने एकमेकांना सन्मानाने वागवणे ही प्रत्येक नातेसंबंधाची मागणी असते. ही समानतेची वागणूक असेल तरच नातेसंबंध टिकतात. हे आपल्याला दैनंदिन जीवनातही निदर्शनास येते.
इस सृष्टी मे मेरी उपयोगीता ही मेरा सन्मान है|
तिसरे मूल्य स्नेह जे निष्ठेने व्यक्त होते. अर्थात मानवी जीवन जगण्याच्या शृंखलेमध्ये मी पुढे असेल तर दुसऱ्याला पुढे आणण्यासाठी पूरक ठरेल आणि मागे असेल तर दुसरा मला पूरक ठरून स्वतःची उपयोगिता सिद्ध करून मला पुढे नेईल. एकूणच मानवी संबंधांमध्ये असणारी परस्परपूरकता आणि उपयोगिता हा या मूल्याचा पाया आहे.
चौथे मूल्य आहे ममता जे उदारतेने व्यक्त होते. ममता ही सामान्यतः आईकडून किंवा आई स्वरूपाकडून व्यक्त होते. ममता म्हणजेच स्वतःच्या प्रतिरुपतेची स्वीकृतीआणि त्याची निरंतरता. ममता व्यक्त होते ती स्वतःचे तन-मन-धन याचे अर्पण समर्पण करून. हे मूल्य आई आणि मुले यांच्यामध्ये दिसून येते.
पाचवे मूल्य आहे वात्सल्य. जे सहजतेने व्यक्त होते. वत्स शब्दापासून वात्सल्य हा शब्द तयार झाला आहे .वत्स म्हणजे मुलगा. त्याचे सर्वतोमुखी समाधान करणे त्याला सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे. त्याला शिकवणे , समजदार बनवणे. हे मूल्य सामान्यतः वडिलांचे मुलां प्रती आणि गुरुचे शिष्या प्रती घडते. म्हणजे वडील मुलाला सहजतेने किंवा गुरु शिष्याला अनेक गोष्टी सहजतेने शिकवतात त्याला विकासक्रमात पुढे नेतात.
सहावे मूल्य आहे श्रद्धा. जे पूज्यतेने व्यक्त होते. श्रद्धा म्हणजे आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे ,जे श्रेय आहे त्याची ओळख व स्वीकार आणि त्या माध्यमातून स्वतःचे गुणात्मक परिवर्तन. व्यक्तीचे गुणात्मक परिवर्तन तेव्हाच शक्य आहे जेव्हा ज्या व्यक्तीवर श्रद्धा आहे ती व्यक्ती पूज्य असते.
पुढचे मूल्य आहे गौरव याचा अर्थ आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे त्याची ओळख आणि त्या दृष्टीने आपले मार्गक्रमण. जे सरलतेने व्यक्त होते. जो व्यक्ती गौरवांन्वित मानला जातो तोही स्वतःची उपयोगिता ओळखून सरल तेने व्यक्त होतो.
पुढचे मूल्य आहे कृतज्ञता. कृतज्ञता हे मूल्य परस्परांमध्ये सौम्यतेने व्यक्त होते. ज्या व्यक्तीच्या मदतीने माझ्या विकास झाला, माझी उन्नती झाली, माझी प्रगती झाली त्याच्याविषयीची कृतज्ञता. अशा व्यक्तीशी वागताना मी माझ्या स्वेच्छेने माझे नियंत्रण करतो. मी सौम्य होतो.
“हर मानव अपनी उचाई को ,कृतज्ञता की सीडियो से होकर ही पार पाता हैl”
शेवटचे सर्वोच्च पूर्ण मूल्य आहे ते म्हणजे प्रेम. जे अनन्यतेने व्यक्त होते. अनन्यता म्हणजे “ना कोई अन्य”या जगात मला कोणी दुसरा वाटतच नाही.
(सर्व मानवी मूल्याची जाणीव आणि अस्तित्व समजावून सांगणारे ए .नागराज जीवन विद्या – मध्यस्थ दर्शनाचे प्रणेते.)
जेव्हा आपण एखाद्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लागला की आपण प्रेमातच असतो. एखादे काम आत्मविश्वासाने करतो तेव्हाही आपण प्रेमातच असतो. आपण ज्या व्यक्तीला सन्मान देतो त्याने आपल्याला सन्मान दिला की आपण प्रेमातच असतो. जेव्हा आपण एखाद्याला निष्ठेने मदत करतो तेव्हा घेणारा आणि देणारा दोघेही स्नेहात अर्थात प्रेमातच असतात. एखादी आई किंवा आई स्वरूप कोणी ही आपले सर्वस्व अर्पण करून उदारतेने व्यक्त होते तेव्हाही आपण प्रेमातच असतो. जेव्हा एखादा पिता किंवा एखादा गुरु एखादा पुत्र किंवा एखादा शिष्य याला जीवनाचे तत्त्वज्ञान सहज समजून जातो तेव्हाही आपण प्रेमातच असतो. आपले एखाद्या श्रद्धास्थान जेव्हा आपल्या तील गुणात्मक परिवर्तना मुळे आपल्याला जवळ करतो तेव्हाही आपण प्रेमातच असतो. जेव्हा आपल्याला कोणी गौरवान्वीत करतो तेव्हाही आपण प्रेमातच असतो. जेव्हा कुणाविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा ही आपण प्रेमातच असतो. ही सर्व मूल्य परस्पर व्यवहारात दिसतात. अर्थात आदान प्रदान करणारी दोन्ही व्यक्ती प्रेमातच असतात.
प्रत्येक मूल्याची सर्वोच्चता प्रेमच आहे. प्रेम हेच पूर्ण मूल्य आहे. ह्याच सर्व प्रक्रिया मानवी व्यवहारांमध्ये नित्य घटित होत असतात हाच “नित्य उत्सव “आहे.
“हम जब प्रेम मे होते है, तब जिते है, नहीं तो सिर्फ वक्त की तरह बितते है|”
परंतु आपल्या सर्वांची आज ही पातळी नाही की आपण सर्वांसोबत अनन्यतेने राहू शकू. म्हणून एका व्यक्तीपासून सुरुवात. अशी व्यक्ती ज्याच्या सोबत सर्व गोष्टींची भागीदारी करू शकू. अगदी सहज. एवढेच काय तर एकमेकांचे शरीरही एकमेकांना सोपवू शकू. कमीत कमी ह्या एका व्यक्तीसोबत तरी या जगात इतरांसोबत आपण खेळत असलेला लपंडाव खेळावा लागणार नाही इतके सहज.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी अजूनही पोहोचलो नाही की जिथे आपण एकटेच सर्व सृष्टी सोबत आरामात राहू शकू . म्हणून सोबतीची गरज आहे. म्हणून एकमेकांच्या साथीने मार्गक्रमण करत एकमेकांची पूर्णता साधत. पूर्णते कडची वाटचाल.
अंतिम विश्रामाकडे वाटचाल.
पण हे कसं शक्य होईल? कबीर म्हणतात ना”प्रेम की गली बडी संकरि जा मे दुज्या ना समाये”
कमीत कमी या विश्वात तरी एक व्यक्ती सोबत मी असा होऊ शकेल जिथे माझे अस्तित्वच राहणार नाही.
एक दिसेल तर दुसरा दिसणार नाही आणि दुसरा असेल तर पहिला असणार नाही.
म्हणजेच “दो जिस्म मगर एक जान”
हे सारे मूल्य जगत जगत इथपर्यंत पोहोचणे म्हणजेच एवढे “सारे श्रम विश्रामा” पर्यंत पोहोचण्यासाठी. स्वअस्तित्वाचा लय होण्यासाठी. सुरुवातीला त्या एका व्यक्तीसमोर अस्तित्वाचा लय करणे आणि पुढे अनेकांमध्ये अनन्यता शोधणे. शेवटी संपूर्ण अस्तित्वामध्येच माझा विलय होणे. हेच सर्वांचे अंतिम गंतव्य.
प्रेम म्हणजे आकाश. आपण मोहालाच प्रेम समजून बसलोय. “तू मला हे दे मग मी तुला ते देईल” असे व्यवहारिक. हेच आपलं प्रेम आहे. हा मोह आहे. मोह म्हणजे पृथ्वीतत्व आणि प्रेम म्हणजे आकाश. प्रेम माणसाला आकाश बनवतो म्हणूनच ते स्वतंत्र करतं. आम्हाला पृथ्वी पकडून आकाश व्हायचं आहे. जे अशक्य आहे. प्रेम म्हणजे ज्याच्यावर प्रेम करता त्याला कुठल्याही अपेक्षाविना सर्वोत्तम प्रदान करण्याचा भाव.
जे मानवी जीवनात प्रत्येक क्षणाला घटीत होत असते.
शेवटी
“प्रेम ही बंधन का कारण है lऔर प्रेम ही मोक्ष”
||श्री माऊली चरणी अर्पण||
अश्विनी गावंडे
खूपच छान आपणलिहिलेल्या लेखातून अनेक बोध होतात, द्या नामध्ये भर पडते.अनेक गोष्टी कळतात. खूप छान.
प्रेमाची खरी संकल्पना स्पष्ट झाली, प्रेम हे अनंत काळ अस्तित्व टिकवून असल्याने एक व्हॅलेंटाईन डे साजरा करून संपणार नाही तर ते जीवन भर अगदी मरणोत्तर ही चालत राहावे.
खूप छान माहिती
व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो ,अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली .प्रेम म्हणजे सगळ्या मूल्याचे सार, जीवनाचे उदात्त भावना. अतिशय सुंदर असा लेख मला खूप आवडला .प्रेमाची इतकी सखोल, सरल आणि सर्व स्पर्शी व्याख्या प्रथमतःच वाचायला मिळाली.
Vallentine चा खरा अर्थ कळला…. बस प्रेम सर्व काही आहे. पण प्रेमाचा खरा अर्थ कळणे आवश्यक आहे…. अप्रतिम यापेक्षा काय व्यक्त व्हायला हवं… खरोखर धन्यवाद ताई एवढं छान समजावून दिलं….
खूप छान लेख, शीर्षकही अत्यंत चपखल, समर्पक! तुला तुझ्या लेखांसाठी इतकी सुंदर, समर्पक आणि लेखविषयाला सर्वांगी सामावून घेणारी शीर्षकं कशी सुचतात,याचा एकदा शोध घ्यायला हवा आहे.शाळा आणि शाळेच्या सर्व व्यापातून वेळ काढून आमच्यासाठी असे उत्तमोत्तम लेख लिहीतेस त्यासाठी तुझं खूप खूप खू——प कौतुक.असाच तुझा हात लिहीता राहू दे.
आपल्या सर्व वाचकांचे ज्यांना इथे पोस्ट करता येत नाहीत आणि मला ज्यांनी व्हाट्सअप वर आपले प्रतिसाद नोंदवलेत त्या सर्व वाचकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या अशाच ऊर्जा पूर्ण प्रतिसादाने लेख लिहिण्याची उर्मी जागी राहते. खूप धन्यवाद पोस्ट
आपल्या सर्व वाचकांचे ज्यांना इथे पोस्ट करता येत नाहीत आणि मला ज्यांनी व्हाट्सअप वर आपले प्रतिसाद नोंदवलेत त्या सर्व वाचकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या अशाच ऊर्जा पूर्ण प्रतिसादाने लेख लिहिण्याची उर्मी जागी राहते. खूप धन्यवाद .
प्रेमाची खरी व्याख्या खुप छान पध्दतीने मांडली. प्रेम हे सर्वोच्य मुल्य अतिशय उत्तम उकल केली.
संत व्हॅलेंटिन ची माहिती मिळाली………. सर्वोच्च मूल्य प्रेम आहे. प्रेमरूप ही मेरी पूर्णतः है | मै ही प्रेम हूं ||…. अप्रतिम अश्विनी ताई 👌👌👌👌👌👍👍👍
अतिशय सुंदर, समर्पक प्रेमाचा अर्ध सांगितला आजच्या भरकटलेल्या युवा पिढीला गरज आहे या विषयावर समुपदेशनाची नेहमीप्रमाणे best
खुप छान आणि अर्थपूर्ण माहिती
ईश्वराला सुद्धा ( अपेक्षा विरहीत ) प्रेमाशिवाय प्राप्त करता येत नाही . छान लेखन .
प्रेमाची उच्चातम परिभाषा समजावून सांगणारा लेख .👌👌
“Great article! You’ve captured the essence of Valentine’s Day beautifully. Keep writing!”
प्रेमाचा सर्वांगीण अर्थ अतिशय सहज व सोप्या भाषेत उदाहरण व दाखल्या सह स्पष्ट केला. खूपच सुंदर लेखन मॅडम.