wondervoices

डॉ.आंबेडकर: एक दिव्य प्रेरणा स्त्रोत

“Cultivation of mind is the ultimate aim of human existence.”

हे म्हणणे ज्यांनी प्रत्यक्षात आपल्या जीवनात उतरवले ते म्हणजे डॉ. बी . आर.आंबेडकर.

“गेल्या पाच हजार वर्षांमध्ये एवढा बुद्धिमान व्यक्ती जन्माला आला नाही. -आचार्य रजनीश”

अतिशय हुशार विद्यार्थी , महान दार्शनीक , स्वतःचा गौरव ,स्वत्वाचा आदर आणि उपयोगिता यावर काम करणारी एक महनीय व्यक्ती. स्वतःच्या आयुष्य रुपी नौकेचा सुकाणू स्वतःच्या हातात घेणारे. विचारांची सुस्पष्टता आणि स्वतंत्रता असणारे तसेच भारतीय

समाजातील जडत्व घालविणारे महान देशभक्त एक तेजस्वी कार्यकर्ता.

अतिशय प्रगतिशील, सकारात्मक ,उद्देश पूर्ण आणि उपयोगीता पूर्ण जीवन जगणारे म्हणूनच जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत शक्तिमान असणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व.

भारतामध्ये वर्ण व्यवस्था तयार करून एक वॉटर टाईट कंपार्टमेंट तयार करण्यात आले. जे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. माणसावर माणूस म्हणून अन्यायकारक. हे मानवनिर्मितच म्हणून तयार करण्यात आले असे म्हटले जाऊ शकते.त्यातही अनेक जाती आणि पोट जातींची रचना. ज्या मध्ये तुम्ही कितीही हालचाल करा. कर्तृत्व गाजवा. तुम्ही राहणार तेच आहात जिथे तुम्ही जन्म घेतला . यामुळे भारतीय संस्कृतीतील सामाजिक तरलता तर गेली त्याच अर्थाने मानवी तरलता सुद्धा गेली.

याच्या जोडीला कर्म सिद्धांत अशा पद्धतीने रोवण्यात आला, की प्रत्येक व्यक्तीला तो जिथे आहे. तिथे तो समाधानी नसेल, तर मी असं जीवन का जगतोय ?हा स्वतःला प्रश्न पडत असेल, तर त्याला तूच कारणीभूत आहेस असे बिंबवल्या जाणारा.

कर्म सिद्धांत ही बाब खूप वेगळी आहे परंतु ती समाजात पोहोचली मात्र या पद्धतीने.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे म्हटले जाते खरी ,परंतु ही शिल्पकारिता सामाजिक अभिसरणामध्ये रोखल्या गेलेली.

आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही तुमचा वर्ण ,तुमची जातच जर का तुमचा प्रवास कुठपर्यंत होणार ?हे निश्चित करत असेल तर मग आपण सामाजिक जडत्वा शिवाय मिळवलं काय? याचा प्रत्येकाला विचार करणे गरजेचे आहे.

त्यामुळेच माणूस म्हणून आजपर्यंत सुद्धा आपण एकसंध होऊ शकलो नाही. जेव्हा की आपल्याला 5000 वर्षाचा मानवतेचा सांस्कृतिक इतिहास आहे.

या कडे कोट बंदोबस्तात डॉ. आंबेडकर स्वतःच्या अद्वितीय आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व भिंती छेदत, विजेच्या सामर्थ्याने प्रवास करत. संपूर्ण जगासमोर मूर्तीमंत ज्ञानसूर्य म्हणून उभे ठाकले. इतरांनीही ती तोडावी यासाठी सामर्थ्य निर्माण केले.

माझ्या मते डॉ. आंबेडकर हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. ते साऱ्यांचेच आहेत. स्वतःचा आदर, स्वत्वाचा विकास स्वतःचा गौरव म्हणजे काय असते? हे प्रत्यक्ष जगून दाखवले. ज्या शाळेने त्यांना प्रवेश नाकारला ,ज्या समाजाने त्यांना जगणं नाकारलं अशा प्रत्येक शाळेत आज डॉ. आंबेडकरांची प्रतिमा आहे. आणि समाजाच्या प्रत्येक घटकावर संविधानाच्या रूपाने उपकार आहेत.

माझ्या अल्पमतीला नेहमी कौतुक वाटत राहिले ते ,सहा ते सात वर्षाचे मुल सर्व आयामानी संपूर्णतः नाकारलेल्या अवस्थेत कोणत्या अंतस्थ प्रेरणेने टिकून राहिले असेल याचं. त्याचं उत्तर त्यांच्या विचारधनातून उत्तर मिळते .

“नफरत कमजोर दिमाग का खेल है!”

11 भाषा आणि 64 विषयांमध्ये मास्टर्स ही पदवी. LONDON SCHOOL OF ECONOMICS यांनी त्यांना DOCTOR OF ALL SCIENCE ही पदवी दिली.

कोलंबिया विद्यापीठा तील आठ वर्षाचा अभ्यास त्यांनी दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केला रोज 21 तास अभ्यास.

पावलागणिक प्रचंड अपमान आणि तिरस्कारानेच त्यांना आत्मनिर्भर बनवले असावे. त्यांच्या जगण्याच्या विचाराचं अस्तर हेच असावं .–“The alone rise that strive.” उठता वही है जो महान प्रयत्न करता है!

त्यांच्या मते “Education should be the weapon for emancipation”. शिक्षणानी लोक स्वतंत्र झाली पाहिजेत. शिक्षण घेतल्याने सर्वजण धार्मिक ,वैचारिक बंधनातून मुक्त झाली पाहिजेत .बंधन मुक्त म्हणजे स्वतंत्र. स्वतंत्र विचारसरणी निर्माण करणे हे शिक्षणाचे काम आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ते केलं आणि इतरांनी ते करावं यासाठी सतत प्रेरणास्त्रोत राहिले.

प्रत्येक व्यक्ती जीवनभर विद्यार्थी असतो असे आपण म्हणतो परंतु बाबासाहेब विद्यार्थी पण जगले त्या विद्यार्थी पणानेच त्यांना गुरुपद प्रदान केले.

शिक्षणात त्यांनी उपयुक्तता वादाचा पुरस्कार केला. जे जे काल सुसंगत आहे आणि माझ्यासाठी उपयुक्त आहे. ते ते मी तिथून उचलावं आणि उपयोगात आणावं. आज ज्यांना आपण एकविसाव्या शतकाची कौशल्य म्हणून वापरतो ती बाबासाहेबा नी त्यांच्या जीवनात निरंतर वापरलीत असे त्यांच्या एकूण वावराहून लक्षात येते. learn, relearn and unlearn.

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे त्यांचे वचन सर्वश्रुत आहे. ज्ञानग्रहण करा.कशाचं ? सत्याच्या शोधाचं ज्ञान,मानवधर्म समजण्याचं ज्ञान, निसर्ग दत्त हक्क प्राप्त करण्याचे ज्ञान. त्यासाठी सघटित व्हा. कोणी संघटित व्हावं ?अस ज्ञान मिळवण्यासाठी ज्यांना नाकारल्या जाते त्यांनी. संघर्ष करा. कुणा विरुद्ध ? तर हे सर्व ज्ञान मार्ग ज्यांनी बंद केले. त्यांच्याविरुद्ध. आणि जर का आज हे जग ग्लोबल व्हिलेज आहे. या जगात ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत तर मग हा संघर्ष उरतो तो फक्त स्वतःच्या अज्ञानाशी.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सूत्र जर मला एकविसाव्या शतकात वापरायचं असेल तर मला हे स्पष्ट असले पाहिजे,की ज्ञानापासून, संघटित होण्यापासून, संघर्ष करण्यापासून मला रोखणाऱ्या ह्या प्रवृत्ती आहेत . त्या माझ्यातही आहेत आणि इतरांमध्ये ही. म्हणून आजचा संघर्ष जितका दृश्य आहे तितकाच अदृश्य ही.

आजचा युवक जेवढा बौद्धिक सामर्थ्य बाळगणारा असावा तितकाच तो चारित्र्यवान असण्यावर बाबासाहेबांनी भर दिला .आयुष्यात ते कधीही फक्त उपदेश देऊन थांबले नाहीत तर त्यांचे आचरण ही तसेच होते.

त्यांनी आणलेले आरक्षण हा आजही वादाचा मुद्दा असला तरीही संधीची समानता उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण गरजेचे होते .कारण आरक्षणाने श्रीमंत फक्त तोच व्यक्ती होईल ज्याला आरक्षण मिळेल. परंतु त्याचा सामाजिक फायदा त्या घरातील ,त्या गावातील, त्या तालुक्यातील, त्या जिल्ह्यातील एवढेच नाही तर त्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आत्मविश्वास वृद्धिंगत होण्याच्या मार्गाने मिळेल आणि मिळतो.

आरक्षणा विषयी ते पुढे जाऊन असेही म्हणतात “अवसर मिले पर जुनून न हो तो क्या करे?”त्यांच्यामध्ये एवढे काही होते की समाजासाठी काही करणे आणि हाल अपेष्टा सोसणे. यापेक्षा आपले एकट्याचे आयुष्य अतिशय सुंदर करू शकले असते. याविषयी ते असे म्हणत असत, इतिहासा ने, नियतीने “मुझे मोका दिया है, तो मैं सुख दुख भुलकर ,अपनी पुरी ताकत समाज के विकास के लिये लगा दुंगा जिससे करोडो लोगो को मानवीय जिंदगी मिल सकती है!

कारण त्यांनी त्यांच्या जीवनात अमानवीयते चा प्रत्येक पाऊला गणिक सामना केला होता.

अदम गोंडवी या प्रख्यात कवीच्या शब्दात सांगायचे झाले तर

आईए मेहसूस कीजिए जिंदगी के ताप को

चमारो की गलीमे मैं ले जाऊंगा आपको!!

त्यांच्या तर्कबुद्धी ची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे ते म्हणायचे “जर मला माझा स्वार्थ आणि देशहित यांच्यामध्ये निवड करायची असेल तर ,मी देशहिताची निवड करेल. पण जर का मला दलितांचे हित आणि देशहित यांच्यामध्ये निवड करायची असेल तर मी नेहमी दलितांचे हित निवडेल.

त्यांनी संविधानाच्या रूपाने प्रत्येक भारतीय व्यक्तीला जगाच्या पटलावर नेऊन ठेवले. त्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका संविधानात समाविष्ट व्यक्तींच्या मूलभूत हक्कांची आहे, समान नागरी कायदा, हिंदू कोड बिल ,त्या मधील महिलांच्या समान हक्काचा कायदा, मतदानाचा अधिकार त्यांनी बनवलेला श्रम कायदा-ज्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड, आठ तासापेक्षा जास्त काम करणाऱ्याला ओव्हर टाईम, महागाई भत्ता इत्यादींचा समावेश आहे.

सर्व कार्यकर्त्यांना आणि इतरांना प्रेरणास्त्रोत ठरणाऱ्या व्यक्ती ंच्या जीवनाचा सार बघायचा झाल्यास असल्यास त्या व्यक्तीचे प्रेरणास्त्रोत कोण होते ते बघावं लागेल?

भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले हे त्यांचे प्रेरणा स्त्रोत होते.

सोबत त्यांची आई सुद्धा. भिमाबाई नेहमी बाबासाहेबांना कोणाशीही भांडण न करण्याविषयी त्या सुचवत. जेव्हा भीमाबाई यांच्या मृत्यू समयी एकही वैद्य इलाज करण्यासाठी आला नाही. तेव्हाच त्यांनी जाणलं “की दैहीक रोगाचे निवारण करण्यासाठी जर इथे कोणी नाही याचा अर्थ हा समाजाला लागलेला मानसिक रोग आहे.”

कबीरांच्या दोह्यातच आंबेडकरांचे जीवनाचे सार .त्यांनी जीवनावरच सिद्ध केलेले त्यांचे प्रभुत्व अधोरेखित करता येईल

जाती न पूछो साधु की पूछ लिजिये ज्ञान

मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान.

!! श्री माऊली चरणी अर्पण!!

अश्विनी गावंडे

21 Responses

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आपण लेख मधून मांडले ना मॅडम अप्रतिम हे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व जनतेने सगळ्यांनी पहावं भलं होणार आहे

    1. ह्या लेखातून प्रेरणा मिळते. आपल्या कडून सुद्धा समाज कार्य व्हावे असं वाटते. खूप छान मॅडम असे पाठवत जा लेख.

  2. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अभ्यासपूर्वक माहीती .

  3. अप्रतिम लेख छानच लेख आहे अश्विनी फार अभ्यास करत लिहीते तु तुझ्या मुळे खुप छान लेख वाचायला मिळतात मुलांना पण खुप आवडले तुला धन्यवाद दिले आहेत त्यांनी

  4. डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलु अतिशय प्रभावी पध्दतीने खुप कमी शब्दात छान उलगडुन दाखविले आहेत…. लेख विचारप्रवृत्त करणारा आहे… खुप सखोल अभ्यास करुन लेखाची मांडणी झालेली दिसते.., अप्रतीम सुंदर लेखन

    प्रा. विजय टोपले
    निवृत्त..

  5. सखोल अभ्यासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे वर्णन आपल्या लेखणी द्वारे शब्दबद्ध केले आहेत, खरोखरच अप्रतिम लेखन ,🙏🙏🌹🌹

  6. अप्रतिम लेखन ताई.
    शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा.या वाक्याचा अतिशय मार्मिक अर्थ आपण लिहिला.खरंच खूप अभ्यासपूर्ण लेख.
    आपले खूप खूप अभिनंदन.

  7. संविधानाच्या रूपाने प्रत्येक माणसाच्या हाती आपलं स्वतःचं ओळखपत्र देणाऱ्या दूरदर्शी महामानवाच्या कर्तृत्वाचे व मानवाला जगतांना उपयोगी येणाऱ्या बाबींचे फारच सुंदर वर्णन आपण केले आहे. फारच छान लेख लिहीलेला आहे….

  8. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा मार्मिक अर्थ तुम्ही इतक्या सहज रितीने पटवून दिला. तुमच्या प्रत्येक लेखातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. धन्यवाद मॅडम .

  9. खूप अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेखन

  10. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्याकडे बघण्याचा अभ्यासपूर्ण सकस दृष्टिकोन, लेखाची मुद्देसूद मांडणी खूप आवडली.
    डॉक्टर आंबेडकरांची गुरुत्रयी म्हणजे दिव्यत्वाचा प्रकाशझोत.गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले. खऱ्या अर्थाने जीवन यांना कळले हो.
    अशा दिव्यत्वाच्या प्रकाश झोताने तळपणारा ज्ञानसूर्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. शतशः नमन:

  11. खूपच सुंदर
    खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी आपण आपल्या सदरहू लेखातून केली सदर लेखात केवळ एक बाजूंना मानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या जीवनासाठी आजच्या समाजासाठी स्वतंत्र्याच्या 75 वर्षानंतरही त्यांचे विचार किती आवश्यक आहे हे प्रत्येक मुद्द्यासह मांडल्याचे जाणवते.

  12. संपूर्ण मानव जातीसाठी आत्मपरीक्षण व सामाजिक जबाबदारी ची जाणीव या लेखातून होते. वैचारिक व प्रेरणादायी लेखन. अभिनंदन ताई.

  13. आपण सर्व विभूतींनी वेळात वेळ काढून लेख वाचला. एवढेच नसून आपल्या प्रतिसाद नोंदवला त्याबद्दल आपले मनापासून आभार.
    आपले असे प्रोत्साहन मला नवीन बळ देत राहते.

  14. आदरणीय अश्विनी ताई,
    सप्रेम जय हरि.
    दिव्यत्वाची जिथे प्रचिती! तेथे कर माझे जुळती!!
    आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने लिखाणातून
    सादरीकरण केलेलं महाराष्ट्रातील महान संत महात्मा ज्योतिबा फुले,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं विवरण मनाला खूपच भावलं
    त्यांच्या जीवनात आलेल्या चढ उताराचं प्रभावी वर्णन प्रत्यक्षच पहातोय असा भास होतो.या महान विभूतींनी त्यावेळी घेतलेले निर्णय समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी फारच प्रभावी ठरत आहेत शिक्षणाचं महत्त्व,समाजातील सर्व घटकांना मिळणारा न्याय, स्त्री -पुरुषांना मिळवणारा समान हक्क फार उशिरा का होईना आज अमलात आणला जात आहे,यांची सध्य परिस्थितीत जाणीव होत आहे.अशाच प्रकारे थोर महापुरुषांचे दर्शन घडविणारे बोधपर लिखाण होणे आपल्या कडून अपेक्षित .आपल्या अचाट बुद्धी कौशल्याला पुन्हाएकदा सलाम.

  15. अप्रतिम लेख आहे.खोलात जावुन अभ्यास केलास.डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उलगडा खुपचं छान केला आहेस.”आजच्या ज्ञान मय जगामध्ये आपला संघर्ष आपल्यातील अज्ञानाशीच आहे”. हा विचार मला अंतर्मुख करून गेला.
    तुझे लेख मला काही गोष्टींबाबत नव्याने विचार करायला भाग पाडतात.
    खुप शुभेच्छा

  16. अतिशय उत्तम असे लेखन व तर्कशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून यशस्वी मांडले आहे.तुमचे करावे तेवढे कौतुक,अभिनंदन
    खूप खूप मंगलमय शुभेच्छा……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *