ज्ञान गणेश
वेदकाळात गणपती हा शब्द होता परंतु त्याला रूप किंवा आकृतीबंध नव्हते. भारतामध्ये गुप्त कालानंतर गणपतीचे रूप प्रस्तुत होऊ लागले. सतराव्या शतकापासून महाराष्ट्रात मराठी साम्राज्याच्या अधिपत्याखाली गणपतीच्या रूपाचं आणि दैवताचं प्रचलन झालं. पुढे पेशवाई मध्ये गणपती ही पेशव्यांची इष्टदेवता होती. नंतर लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेच्या असंतोषाला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मार्गातून एक नवीन वाचा फोडली.
महाराष्ट्रातील गणपती हे आराध्य आणि तितकेच लोकप्रिय असे दैवत आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटणारे हे दैवत असल्यामुळे त्याविषयीच्या लहानातील लहान गोष्ट माहित करून घेणे गरजेचे वाटते त्यामुळे खूप प्रश्न विचारल्या जातात.
आधुनिक काळात अशा प्रश्नांना frequently ask question अर्थात F.A.Q म्हटले आजच्या लेखात हाच फॉर्मुला वापरून गणपती विषयीचे आपले ज्ञान उजागर करून घेऊया.
गणेश मूर्तीचा आकृतीबंध नेहमीच्या देवाधिकांच्या आकृतीबंधात सामावणारा नाही. शिर हत्तीचे आणि धड मात्र माणसाचे असे कसे ? परंतु असेही म्हटले जाते की देवाला भक्तांना व्यावहारिक रूपाने न बघता अलौकिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. कारण एका दैवताला आकार देणे म्हणजे तो अलौकिक आणि सामान्य माणसाच्या पुढचाच असला पाहिजे त्याशिवाय ते दैवत कसले ?
या जगातील प्रत्येक गोष्ट ही कल्पनेच्या माध्यमातूनच साकार होते. Everything in the world from imagination.दोन हजार वर्षापासून आपण मांगल्य हा शब्द वापरत आलो आहोत.
भगवान गणेशाचा आकृतीबंध पाहताना शीर प्राण्याचं आणि धड मनुष्याचा अस एकत्रीकरण केलेलं आहे .याचा अर्थ बोध असा की प्रत्येक मानवात आजही पशुत्वाचे गुण आहेत .मानवाची यात्रा “पशु से पुरुष तक”किंवा” वानर से नर तक”अशी आहे.
मग प्रश्न असा उठतो की हत्तीचेच शीर का? याच्या उत्तरात हत्ती हा जमिनीवर विचरण करणारा सर्वात मोठा प्राणी असून तो शाकाहारी आहे. त्याची भूक भागवताना कोणत्या प्राण्याला मारत नाही.हत्तीला तसा नैसर्गिक शत्रू कोणीही नाही. जसे वाघ आणि हरिण. मोर आणि साप इत्यादी. तसेच हत्तीशी स्वतःहून वैरत्व घ्यावं एवढ्या ताकतीचा दुसरा प्राणीही नाही.
दुसर स्पष्टीकरण असं देता येईल क्षीरसागरातून जेव्हा लक्ष्मीचा जन्म झाला त्याच्या मागोमाग तिथून गज येतात त्यांना दिग्गज असे म्हटले जाते. आणि ते लक्ष्मीच्या सुरक्षिततेसाठी असतात. त्या अर्थाने हत्ती मांगल्याचे प्रतीक , धनधान्याचे ,समृद्धीचे ,वैभवाचे प्रतीक आहेत. जसे काळे ढग पाऊस आणतात तसे पांढरे ढग संपन्नतेचे प्रतीक मानले जातात. तसेच हत्ती सुद्धा संपन्नतेचे प्रतीक मानले जातात.
त्याशिवाय वैज्ञानिक सत्य हे आहे की,हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी समजल्या जातो. हत्तीच्या मेंदूमध्ये मानवी मेंदूपेक्षा तीन पट जास्त न्यूरोन्स असतात. हत्ती वेगवेगळ्या भाषा समजू शकतात. हत्ती हा भावनिक प्राणी आहे. आणि जेव्हा आपला आराध्य दैवत हे शीर धारण करते याचा अर्थ ते व्यक्तीला बुद्धिमान आणि भावनिक दोन्ही होण्याचा संदेश देतो.
गणपतीच्या शरीराला चार हात का? गणपती आमचे आराध्य दैवत . अलौकिक आणि पराक्रमी. या अर्थाने चार हात. भक्ताला एका हाताने मोदक प्रदान करतो तर दुसऱ्या हाताने शस्त्रही उचलतो म्हणजेच समतोल.
भारतीय परंपरा ही मौखिक आणि आकृतीबंधांची परंपरा आहे. सगुणाची परंपरा आहे जी शेवटी व्यक्तीला निर्गुणापर्यंत नेते.
पुढचा प्रश्न उपस्थित होतो? आराध्याच्या किंवा देवतेच्या हाती शस्त्र का? जेव्हा प्रकृती पासून संस्कृतीचा विकास होतो तेव्हा हिंसा ही पायाभूत असते. जसे भुकेसाठी प्रकृतीमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून खातो.जसे नगर बांधताना जंगलांचा नाश केल्या जातो. शेती करताना जंगले तोडल्या जातात. अर्थात प्रगती ही प्रकृती सोबत हिंसा केल्याशिवाय होऊ शकत नाही.
अहिंसा ही संकल्पना योगी परंपरेतून आलेली आहे. तर हिंसा ही संकल्पना भोगी परंपरेतून आलेली आहे. परंतु त्यामध्ये समतोल असणे गरजेचे आहे. म्हणून एका हाती शस्त्र असले तरीही, एक हात आशीर्वाद देतो आहे.
इतर देवतांना आपण गणेशा सारखं आपल्या घरी आणून त्यांचा उत्सव साजरा करत नाही? मग गणपतीलाच घरी आणण्याचं कारण काय? भारतामध्ये दोन परंपरा आहेत एक आगम आणि दुसरी निगम.
आगम परंपरेमध्ये देवाला आकृतीबंध देतात. देवतेला आवाहन करून घरी आणतात. तिला जीवन जगण्यासाठी आशीर्वाद मागतात. आणि मग निश्चित कालावधीनंतर देवतेचं विसर्जन करतात. निगम परंपरा ही यज्ञाची परंपरा आहे.
गणपतीला आवाहन आमंत्रण देणे ,आपल्या घरी बोलावणे करणे म्हणजे काय? गणपतीला आमंत्रण देणे याचा अर्थ गणपती हा गणांचा पती आहे त्याच्यासोबत गण ही येतील.यक्ष ,गण जंगलात राहतात . जंगल म्हणजेच प्रकृती. याचा अर्थ प्रकृतीला बोलावून संस्कृती तयार करणे. आणि पुन्हा प्रकृती प्रकृतीत विसर्जित करणे.
याचा अर्थ बोध एकच “सर्व गोष्टी नश्वर आहेत.”या विश्वात काहीही अमर नाही. सर्व गोष्टी निर्माण होतात, नष्ट होतात पुन्हा निर्माण होतात हा अनुभव म्हणजे निसर्गाच्या तालासुराचा अनुभव आहे.
गणपतीची स्थापना भाद्रपदातच का? भाद्रपद महिन्यामध्ये संपूर्ण सृष्टी हिरवीगार असते. माता पार्वती जर निसर्गाचे प्रतीक मानले तर गणपती हे त्या निसर्गाचे फळ आहे. म्हणजेच शिवाचा श्रावण महिना त्यानंतर गौरी पूजन आणि त्यानंतर गणेश. सुपीकता जर माता पार्वती असेल तर समृद्धी गणपती आहे.
एक प्रकारची ही निसर्ग पूजाच आहे. शिव ,गौरी आणि गणेश.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करतात? मूर्तीला भाव नसतो.जीव नसतो.परंतु एकदा का प्राणप्रतिष्ठा केली, की ती मूर्ती जिवंत होते. म्हणजे आपण तिला मानवी रूप प्रदान मानवी भावभावना सहज समजून घेऊ शकते.म्हणजे भक्त मूर्तिशी बोलू शकतो आणि मूर्ती भक्ताची गाऱ्हाणी ऐकू शकते. भक्त मूर्तीचे दर्शन घेऊ शकतो आणि मूर्ती भक्ताचे. प्राणप्रतिष्ठे ने जीव फुटलेल्या मूर्तीत मग मानवी आचरण प्रस्थापित होते. मग देवाला भूकही लागणार म्हणून भोग/नैवेद्य. जे जे वैशिष्ट्य मला मर्त्य मानव म्हणून माझे आहेत तेच आता मूर्तीतही विराजित होतात.
गणपतीच्या आवडीनिवडी कशा ठरल्या? आवडीनिवडी या संवाद निर्माण करण्यासाठी असतात. त्या प्रतीकात्मक असतात. आवडीनिवडी ह्या दृश्य प्रतीकेच आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या हातातील मोदकाचा आकार बघितला तर तो जुन्या काळातील पैशाच्या गठरी दिसतो. हीच सुखाची गठरी. हे सुखाचे दृश्य प्रतीक.
गणेशाचे लंबोदर काय सूचित करते? पूर्वीच्या काळी अन्नधान्याची एवढी मुबलकता नव्हती. गणेश मूर्तीचे दाखवलेले लंब उदर किंवा यक्ष शरीर. हे समृद्धीचे प्रतीक आहे. सोप्या शब्दात खाऊन पिऊन सुखी. समृद्धी म्हणजे “अभाव का अभाव.”दैवत हे परिपूर्णतेच प्रतिकच असले पाहिजे. तिथे काही कमी असण्याचा भावच नसतो.
श्री गणेशा विषयी अनेक आख्यायिका निर्माण झालेल्या आहेत. जीवन समजून घ्यायचं असेल तर वैरागी होणे गरजेचे आहे. परंतु सामान्य जनाचा जीवनाचा प्रवास हा भोगातूनच जातो. म्हणून गणेश हे एक असं दैवत आहे जो योगी आणि भोगाचा मध्य साधतो.
भगवान शंकरांना मूल नको होतं जबाबदारी नको होती- योगी. तर माता पार्वतीला मूल हवं होतं-भोगी. भगवान शंकरांना जर मूल नको आहे. तर माझे मीच निर्माण करेल म्हणून विना नायकाचा पुत्र निर्माण केला माता-पार्वतीने. म्हणून विनायक. म्हणून तर प्रत्यक्ष पित्याला ओळखलं नाही. युद्धामध्ये भगवान शंकरांनी शिरच्छेद केला त्यानंतर ऐरावताच शीर आणून गणेशाला लावण्यात आलं.
भगवान शंकर आणि माता पार्वती माता पिता झालेत. श्री गणेशाच्या रूपाने योगी आणि भोगींचे मिलन झाले.
प्रकृती आणि संस्कृतीचे मिलन झाले. शिव आणि शक्तीचे मिलन झाले .म्हणजे श्री गणेश दोन विचारांना एकत्र आणणारा. शिव आणि शक्तीची उत्पत्ती असणारे भगवान गणेश हे मुलाधार चक्राचा देवता आहे. मुलाधार चक्र म्हणजे जीवनाला स्थिरत्व आणि शांती निर्माण करणारे चक्र. मुलाधार चक्र म्हणजे योग आणि भोग दोन्ही. जीवनाची सुरुवात तिथूनच होते. त्याचं देवत्व असणारा श्री गणेश हा समतोल साधणारा आपला आराध्य.
गणेशाला ज्ञानदेवता का म्हटले जाते? भगवान गणेशांचे वास्तव्य हे कैलासावर होते. एकदा कुबेर त्यांना म्हणाला इथे काय राहता ? एखाद्या वैराग्या सारखे? माझ्याकडे चला .ऐश्वर्या संपन्न रहा. भोग भोगा. म्हणून मग भगवान गणेश कुबेराकडे जेवणासाठी जातात. श्री गणेश जेवायला बसतात. गणेशांच जेवण सुरूच असतं. गणेश जेवतच जातात जेवत जातात. इकडे कुबेराकडचं सगळं बनवलेलं अन्न संपतं. तरी गणेश मागतच जातात . सांगतात “मला आणखी जेवायला आणा माझं पोट भरलेलं नाही.”
यावर कुबेर श्रीगणेशांना प्रश्न विचारतो? हे काय आहे? श्री गणेश सांगतात पशुला जेवण दिल्याने. त्याचे पोट भरते. तो खाण थांबवतो. नंतर भूक लागल्यावर आणखी खातो. परंतु मनुष्याचे तसे नाही मनुष्याला जेवण दिल्याने त्याचे भूक वाढते. पोट भरते परंतु हव्यास (greed ) संपत नाही .अर्थात भोग भोगल्यानंतर आणखी भोगावेसे वाटतात. भोगाचा अंत्य बिंदू सापडत नाही.
भोगाला समतोल करायला योग लागतो .म्हणून मी कैलासावर राहतो. आणि भारतीय संस्कृतीमध्ये समतोल साधण्यालाच ज्ञान म्हटले जाते.
श्री गणेशांचा देह आणि त्यांचं वाहन मूषक. हाही भगवंताने साधलेला समतोलच आहे. गणेशाच्या पोटाला बांधलेला नाग आणि वाहन असलेला मूषक सोबत राहतात. जेव्हा की अन्नसाखळीमध्ये मूषक हा नागाचे भक्ष्य आहे. हा सुद्धा श्री गणेशाने साधलेला प्राकृतिक समतोलच आहे. नाग आणि उंदीराची मैत्री ही योगी परंपरा आहे. परंतु भोगी परंपरा सुद्धा आहे म्हणून मोदक.
आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक देवी देवतांची सहस्त्रनामावली असते असे का? सगुण हे खंडित तर निर्गुण हे अखंडित आहे. परमात्मा भगवंत जरी निर्गुण निराकार असला, तरी तो सामान्य दृष्टीला समजत नाही. मला जर अखंड ,अनंत ,निर्गुण अनुभव करायचे आहे. तर त्यासाठी मला नामरुपातूनच जावे लागेल. शब्दांमधूनच शब्दांच्या पलीकडे जाता येईल.
शब्द हेच माध्यम पलीकडे जाण्यासाठी निर्गुणाकडे जाण्यासाठी. शब्दार्थातून भावर्थाकडे. (Walking towards infinity.) देवतांच्या रूपाची , देवतांच्या आकृतीबंधाची पूजा होते. परंतु प्रत्यक्ष दैवत मात्र त्याच्या पलीकडे असते. तो भाव असतो. भावाला रूप नसते. शब्दाला रूप असते .परंतु खरी जादू भावात आहे .शब्दात नाही.
प्रत्येक मनुष्याचा प्रवास हा शब्दांच्या अर्थापासून भावाच्या अर्थापर्यंत पोहोचणे हा आहे. सगुनातून निर्गुणाकडे ,रूपातून अरुपाकडे , काळवेळापासून कालातीत होण्यापर्यंत . लौकिकापासून अलौकिकापर्यंत. आवाहनापासून विसर्जनापर्यंत.
कित्येक वेळा अशी यात्रा? अनंत वेळा जोपर्यंत मी या प्रकृतीत विसर्जित होत नाही. संपूर्ण प्रक्रियेतून एकच सिद्ध होते भाव महत्त्वाचा आहे क्रिया नाही.
सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. सगळं काही येत राहतं आणि जात राहतं. निसर्गामध्ये निर्माण आणि विलय ही सततची प्रक्रिया आहे. इथे काहीही चिरकाल टिकणारे नाही. स्थायी नाही. हा निसर्गाचा नाद आहे. म्हणून Be the part of the cycle ,don’t try to be permanent.
जिथे श्रद्धा आहे. तिथे संयम आहे.
इथे श्री गणेशाची मूर्ती ही पार्थिव आहे. आणि माझ्या कामना ,वासना ,इच्छा ,महत्त्वाकांक्षा सुद्धा. केवळ भाव मौल्यवान आहे. So be the part of nature.
llश्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे
खूपच सुंदर लेखन 👌👌💐
खूप छान माहिती सांगितली. गणपतीच्या शिरा मागे पौराणिक कथा तर ऐकल्या. परंतु शास्त्रशुद्ध माहिती वाचून खूप छान वाटले. 👌👌👍😊
श्री गणेशाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती ,सगुणांकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग प्रकृतीकडून घेणे आणि प्रकृतीलाच देणे ही सर्व माहिती लेखातून मिळाली.खूप सुंदर माहिती👌👌
Koop chan article
Mast khup Chan 👍👍🙏🙏 mazya mulana aaj vachun dakhvte
Great article! I really appreciate the clear and detailed insights you’ve provided on this topic. It’s always refreshing to read content that breaks things down so well, making it easy for readers to grasp even complex ideas. I also found the practical tips you’ve shared to be very helpful. Looking forward to more informative posts like this! Keep up the good work!