wondervoices

राजर्षी
हिंदू धर्म आणि हिंदू पौराणिक परंपरेमध्ये राजर्षी या शब्दाचा अर्थ म्हणजे शाही संत.

“जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना
धमन्यातल्या हृदयास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दाचा आणि अर्थ या जगण्यास दे .

असे हृदय असणारा राजा. रंजल्या गांजल्या लोकांसाठी पणाला लावलेले पूर्ण जीवन म्हणजे राजर्षी .त्यांचे म्हणणेच हे होते की “माझा खजिना रिता झाला तरी चालेल, मला त्याची पर्वा नाही. परंतु माणसाला माणूस म्हणून न जगू देणारी प्रत्येक रुढी मला मोडायची आहे .”

आपण सर्वांनी या पुरोगामी महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले महदभाग्यच .छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने गुलामीचे पाश तोडून जातपात विरहित निर्माण केलेले स्वराज्य. पुढे चातुर्वरणा च्या विळख्यातून संपूर्ण समाज शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त करण्यासाठी प्राणपणाने झुंजलेले महात्मा फुले. हाती असलेल्या सत्तेचा उपयोग मानवी उत्थानासाठी करणारे शाहू महाराज. तरीही मागे राहिलेल्या बांधवांना शिक्षणाची दिव्यदृष्टी देणारे द्रश्टे महापुरुष डॉ. आंबेडकर या चौघांनी या महाराष्ट्राला पुरोगामी करण्याचे वर्तुळ पूर्ण केलं.

याचा अर्थ इतरांचे प्रयत्न दृष्टी आड न करता फक्त वर्तुळ पूर्णतेची गोष्ट करतोय आपण हे वाचकांनी लक्षात घ्यावं.

महात्मा फुलेंचे शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान . छत्रपती शाहू महाराजांचे महात्मा फुले हे प्रेरणास्थान . तर छत्रपती शाहू महाराज हे डॉ. आंबेडकरांचे प्रेरणास्थान .

छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती तर होतेच न पेक्षा ते समाजक्रांतीकारक होते. उणेपुरे  48 वर्षाच्या अल्पायुष्यात विसाव्या वर्षी राजगादीवर बसले आणि पुढील 28 वर्ष करवीर नगरीतलेच नव्हे ,तर संपूर्ण भारतातील बहुजन समाजाला माणूस म्हणून जगणं देण्यासाठी झंझावातासारखे कार्य करीत राहिले.

त्यांनी मानवी जगण्याच्या प्रत्येक आयामाला केवळ स्पर्शच केला नाही .तर प्रत्येक आयामासाठी भरघोस कार्य केलं. म्हणून तर आजही लोकनेता, आरक्षणाचे जनक, परिवर्तनकार ,रयतेचा राजा, मल्लांचा पोशिंदा कलाकारांचा आश्रयदाता, लोकराजा ,लोकशाहीचा आश्रयदाता, कल्याणकारी राजा अशा एक ना अनेक उपाधींनी ओळखले जातात.

28 वर्षाच्या जीवनात कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ,आर्थिक, राजकीय ,कृषी, सिंचन, कला, क्रीडा ,उद्योग ह्या व अशा एकूण 23 विषयांवर शाहू महाराजांनी काम केले. अनेक क्रांतिकारक कायदे केले.

1902 वर्षी आणलेला बहुजन समाजाला नोकरीत 50 टक्के आरक्षण देणारा कायदा असो की, त्याच वर्षी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा असो.

आधुनिक काळात समता आणि समानता या विषयावर सखोल चिंतन करून कायदे करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज.

समता ही असतेच जी निसर्ग दत्त असते.ज्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही.  परंतु समानता ही आणावी लागते .कारण असमानता ही मानवनिर्मित आहे. जी विभिन्न जाचक प्रथा परंपरा निर्माण करून निर्मिलेली आहे .जी करताना धर्माचा आधार घेतला जो पोकळ आहे हे शिक्षण नसल्यामुळे कळत नाही .आणि धर्म सर्वांसाठी सर्वोपरी असतो .अगदी राजासाठी सुद्धा .म्हणजे असमानता ही क्लुप्तीने आणली गेली म्हणा किंवा काळाच्या ओघात दृढ होत गेली म्हणा. त्याचा परिणाम असा झाला की अशा असमानते मुळे बहुजन समाज पिढ्यानपिढ्या पिचत राहिला. म्हणून ही असमानता मिटवण्यासाठी संधीची समानता निर्माण करणे गरजेचे होते.

शाहू महाराजांनी 1917  मध्ये  पुनर्विवाहाचा कायदा केला आणि त्याच वर्षी त्यांनी आंतर जातीय विवाहाचा कायदा  केला. एवढेच करून थांबले नाही तर स्वतःच्या बहिणीचे लग्न एका धनगर समाजातील युवकाशी करून दिले. कारण सामाजिक सुधारणांची सुरुवात घरापासून करणारे ते एक कर्मवेडे सुधारक होते. असे अनेक क्रांतिकारक कायदे रंजल्या गांजल्याचे शोषण थांबवण्यासाठी महाराजांनी निर्माण केले.

यामध्ये त्यांनी 1918 मध्ये हजेरी देण्याचा कायदा रद्द केला. समाजाने काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून ठरविले होते. रामोशी, मांग, महार, बेरड या जातीतील प्रत्येकाला दिवसातून चार वेळा पोलिसांना हजेरी द्यावी लागत असे. मानवतेला काळीमा फासणारे  हे कायदे रद्द केले. याच वर्षी महारकीचे वतने देणे बंद केले. 1920 मध्ये देवदासी प्रथा बंद केली.

संपूर्ण भारत वर्षाला वसतिगृहाची संकल्पना देणारे छत्रपती शाहू महाराज. 1901 ते 1920 या कालावधीत शाहू महाराजांनी 26 वस्तीगृहे काढली. या वसतीगृहांमधूनच अनेक कर्मयोगी समाजसुधारक देशाला मिळाले.

जातीच्या आधारावर त्यांनी वसतिगृहांचे निर्माण केले. असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महाराजांनी सुरुवातीला सर्व जाती धर्मासाठी एकच वस्तीगृह सुरू केले. त्याचे  निरीक्षण करताना त्यांच्या असं लक्षात आले की ब्राह्मण मुलं वसतिगृहात सर्वात चांगल्या बाजूला, त्यानंतर मराठा आणि सर्वात बाहेरच्या बाजूला महार, मांग असायचे. मग एकत्र वस्तीगृह काढून काय उपयोग?  कारण कोणी कोणाला सामावून घ्यायला राजी नाही. ज्या सामाजिक अभिसरणाचा त्यांनी विचार केला होता. ते या वसतिगृहात घडलेच नाही. तेव्हा त्यांनी जातीनुसार वेगवेगळी वसतिगृहे स्थापन करण्यास सुरुवात केली. निदान शिक्षण झाल्यानंतर विचारांमध्ये परिपक्वता येईल आणि सामाजिक अभिसरण घडेल. असा त्यांचा कयास होता.
आजही ही वसतिगृहे तशीच आहेत. त्याच काळी त्यांच्या वाट्याची उत्पन्नाची साधने महाराजांनी वसतिगृहांच्या नावाने करून देऊन, प्रत्येक वस्तीगृह स्वयंपूर्ण करून ठेवले होते.

करवीर नगरीमध्ये सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले. करवीर संस्थानातील प्रत्येक 500 ते 1000 वस्ती असणाऱ्या खेड्यात प्राथमिक शाळा देवळ,धर्मशाळा अशा ठिकाणी सुरू करण्यात आल्या. गरज असेल तिथे शाळेसाठी नवीन इमारती ही तयार करण्यात आल्या . त्यासाठी त्यांचे नियोजन जबरदस्त त्यांनी शाळांसाठी एक लाखाची तरतूद केलेली होती पैकी 80 हजार दरबारच्या खजिन्यातून तर वीस हजार देवस्थानांना जो फंड जातो त्यातून काढले होते.

जे पालक पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपयाचा दंड ही आकारला गेला .शिक्षण खातं सक्षम केलं आणि ज्या शाळेत मुली शिकत. तिथे प्रगती करणाऱ्या मुलींच्या प्रमाणात शिक्षकांना वाढीव वेतन दिलं जात असे. त्याआधी शिक्षकांच्या शाळाही काढल्या. कारण मानव प्रगत करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.

कारण शिक्षणाने मानवातील कौशल्य विकसित होते. कौशल्याच्या उपयोगाने जीवनाला शिस्त लागते. आणि शिस्ती तूनच गुणांचा विकास होतो. गुणांच्या विकसनातूनच मानवाचे उत्थान होते. या सर्वाला कारणीभूत असलेला शिक्षक सुशिक्षित ,सुसंस्कृत असणे अतिशय गरजेचे होते.

संविधान निर्मितीच्या आधी संविधानाची अंमलबजावणी करणारे एकमेव राजे म्हणून शाहू महाराज ओळखले जातात. एकदा एका अस्पृश्याने सार्वजनिक पानवठा वापरला म्हणून इतरांनी त्याला शिक्षा केली. याच गंगाराम कांबळेला महाराजांनी चहाचे हॉटेल काढून दिले आणि राज्यात फतवा काढला की ज्यां कोणाला प्रशासकीय कामासाठी माझी सही पाहिजे असेल, त्यांनी या हॉटेलमध्ये यायचे. तिथे लोक आले की ,महाराज सर्वांना चहा देत असत आणि कागदपत्रांवर सह्याही देत असत.

शाहू महाराज स्वतःला सामान्यातील एक समजत असत. आणि हे त्यांनी कित्येक मोठमोठ्या मंचावरून लोकांना सांगितले की “मला तुम्ही तुमच्यातलाच एक समजा “तसे त्यांनी रीतसर दरबार मोजकेच भरवले.

परंतु त्याकाळी त्यांनी एक चार घोड्यांचा मोठा टांगा बनवला. त्याला खडखडा म्हणत असत. त्यामध्ये धू रकार्‍याच्या बाजूला महाराज बसत .आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी दोन लांब लाकडी बेंच बसवलेले असत, ज्यावर त्यांचे मंत्रिमंडळ बसत असे. खडखड्याला लोखंडाची चाक लावलेली असत कारण संपूर्ण राज्यात आणि मुरमाड रस्त्यावरून फिरावं लागे. गावागावात गावाच्या चौकात हा खडखडा थांबत असे. आणि तिथल्या तिथे संबंधित विविध मंत्र्यांच्या साह्याने लोकांच्या समस्यांचा निकाल लागत असे. महाराजांच्या मंत्र्यांचा या खडखड्याला मोठा विरोध. बाकीच्या संस्थानातील मंत्रिमंडळ आणि मंत्री यांचा काय थाट ?काय रुबाब? प्रत्येकाला विशेष बग्गी असे, विशेष कार्यालय असे. आणि शाहू महाराज आपल्याला या खडखड्यात घेऊन फिरतात. त्याचा त्या सर्वांना भयंकर त्रास होत असे. सर्व मंत्र्यांच्या सहमतीने एका धीट मंत्र्याने महाराजांना हे बोलून दाखवले. त्यावर महाराज “अस्स” म्हणाले आणि धुरकऱ्यला खडखडा जोराने हाकायला सांगितला. आणि म्हणाले जोवर “खालन दणके बसतात ना तोवरच राज्यकर्ता  जागरूक असतो”. किती समर्पक आणि त्रिकाला बाधित सत्य आहे हे!

त्यांच्या स्वतःच्या कार्यालयाचे जेव्हा त्यांनी अवलोकन केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं  की कार्यालयातील एकूण 90 माणसांपैकी फक्त एकच व्यक्ती बहुजन वर्गातील होता. हे त्यांचे निरीक्षण म्हणून पुढे आरक्षण.

कुराणाचं मराठीत पहिले भाषांतर करणारे शाहू महाराज. कारण त्यांना तेव्हापासून धर्मावर चालत आलेली हिंदू मुस्लिम तेढ मिटवायची होती. त्यासाठी त्यांनी दोन कमिट्यांचे निर्माण केलं. प्रत्येकाला 25- 25 हजाराचा निधीही प्रदान केला. त्यांनी मुस्लिम कमिटीला हिंदू धर्माचा गीता हा ग्रंथ देऊन तुम्ही त्याचं उर्दू, अरबी, फारसी यामध्ये भाषांतर करा. तर दुसऱ्या कमिटीला  तुम्ही कुराणाचं मराठीत भाषांतर करा असे सांगितले. कुराणाचे  मराठीत भाषांतर झाले. शाहू महाराजांनी कुराणाचा अभ्यासही केला. परंतु दुर्दैवाने गीतेचे भाषांतर होऊ शकले नाही.

अरबशहा नामक महाराजांचा एक अंगरक्षक होता. एके दिवशी त्याची बायको रडत महाराजांकडे आली. तिने सांगितले ,काल अरबशहा ने दुसरा निकाह केला. आणि तीनदा तलाक तलाक म्हणून मला घराबाहेर काढलं. महाराज आता मी कुठे जाऊ? काय करू ?तुमच्या अरबशहा  काही लाज आता तर आमची मुलगी सुद्धा लग्नाला आली आहे. या वयात त्याने असं करावं.? जेव्हा अरबशहा पुन्हा कामावर आला तेव्हा महाराजांनी त्याला विचारलं तु कशासाठी सुट्टीवर होता ?त्यालाही कळलं होतं की आपली बायको महाराजांकडे येऊन गेली. त्यानी सांगितलं “महाराज ,कल मेरी शादी थी l” “अच्छा ! महाराज म्हणाले तेरा वर्षाच्या मुलीशी.” तो म्हणाला त्यात काय ?मला ती आवडली. त्यावर महाराज म्हणाले तू 40 वर्षाचा ती तेरा वर्षाची. त्यावर अरबशहा महाराजांना म्हणाला “आप हमारे धर्म के मामले मे दखल ना दे l” हमे कुराण ने पाच शादी करने की इजाजत दी है l यावर महाराजांनी त्याला खडसावून  विचारले  क्या तुम पाकनमाजी हो ?पाच बार नमाज पढते हो ?कुरान की कोंनसी कलम  कोनसी आयत  याद है तुम्हे? यावर महाराजांनी कुराणची 57 आयत  त्याला म्हणून दाखवली.  त्याला त्याचा अर्थ विचारला कुरांण  च्या कोणत्याच नियमात तो बसत नव्हता. याचा अर्थ एवढाच की कोणत्याही धर्मग्रंथात काही चुकीचे लिहिलेले नसते. त्याचे अर्थ लावणारे लोक चुकीचे असतात. याच कुराणच्या आधारावर महाराजांनी त्याकाळी वडिलोपार्जित जमीन जुमल्याचे हिस्से कसे करावेत? यावर कायदे करण्याचा धारिष्ट केलं.

महाराज कलाश्रयी होते. एकदा महाराजांच्या दरबारी आठ नऊ वर्षाच्या कुमार गंधर्वांनी अप्रतिम गाणं गायलं. महाराजांनी आवाज देऊन कुमारांना जवळ बोलावलं. त्यावर ते आले नाहीत .तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं कुमारांना ऐकूच येत नाही. त्यावर महाराजांनी त्यांना इशाऱ्याने बोलवलं. ते चटकन आले . त्यांना बक्षीसी दिली आणि त्यांच्या मंत्र्याला कुमारांच्या पुढच्या वैद्यकीय खर्चाची तजवीज सरकारातून करण्याकडे लक्ष देण्याचा आदेश दिला.

गायकीमध्ये आजही प्रसिद्ध असलेल्या जयपूर अत्रोली घराण्याच्या अल्ला दिया खान यांना राजगायकाचा मान देऊन, त्यांच्या 53 लोकांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. आजही जयपूर अत्रोली घराण्याच्या 1400चीजा करवीर नगरीमध्ये सुरक्षित आहेत. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी अमोनकर, आणि आजच्या आरती अंकलीकर ह्या या घराण्याच्या वारसदार गायिका आहेत.

बाबुराव पेंटरही शाहू महाराजांच्या राज्यात नावारूपास आले.
प्रसिद्ध संगीतकार गोविंदराव टेंभे यांना संगीतात रुची आहे .हे महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी गोविंदरावांना बोलावून घेऊन त्यांना वकिलीची सनद दिली. आणि सांगितले ही सनद वकिली शिकून घरी पगार देण्यासाठी आहे .तुझं मुख्य काम संगीत देणे आहे. ते मात्र तु चांगलं कर. पुढे बालगंधर्वांच्या 21 संगीत नाटकांना संगीत देऊन गोविंदरावांनी स्वतःचे संगीत अजरामर केले.

असाच एक कवी कारकूनी करीत असे. परंतु वही खात्यावर कवितेच्या ओळी लिहिल्याने ,पहिल्या ठिकाणाहून त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्याला स्वतःच्या कार्यालयात कारकून म्हणून मुकर्रर केले आणि त्याला सांगितले इथला कारकुनी चा पगार घरच्यांच्यासाठी आहे.

इथे कविता करणे हे तुझे मुख्य काम. त्याच काळात भारताच्या रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. तेव्हा महाराजांनी त्यांच्या गौरवार्थ एक हजार सुवर्णमुद्रा त्यांना भेट म्हणून घेऊन जाण्यास या कवीला सांगितले. त्यावर तो कारकून कवी म्हणाला महाराज “मी !”. मी जाऊ भेट घेऊन, तेही प्रत्यक्ष रवींद्रनाथांना. महाराज त्यावर म्हणाले “हे बघ आम्ही जाऊन काय उपेग?” “त्यांची थोडी जरी दृष्टी  तुझ्यावर पडली तर तुला चार ओळी तरी सुचतील आम्ही जाऊन काय करणार?”

आजही पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सर्वात सुजलाम सुफलाम गणल्या जाते. त्याचे सर्व श्रेय महाराजांच्या पाण्याच्या उत्कृष्ट नियोजनाला जाते. सन 1919 मध्ये कोल्हापूरमध्ये नळाला फिल्टर वॉटर देणारे महाराज.

कर्नाटकातील एका संस्थानात गेले असताना. महाराजांना तेथील एका संस्थानिकांनी कोल्हापूरकडील काही  लोकांना चोरी दरोडेखोरी च्या आरोपाखाली पकडून ठेवले होते असे कळले. या लोकांनी गुन्हे केले असल्यामुळे त्या संस्थानिकाला त्यांचा भयंकर राग आला होता. त्यामुळे ह्या लोकांना तो कठोर शिक्षा देण्याच्या विचारात होता. आपल्याकडील लोक आहेत . आपण त्यांची मदत केली पाहिजे.हे महाराजांच्या लक्षात आले यावर महाराज त्यां संस्थानिकास  म्हणाले “मी जर या लोकांना तुमच्यापेक्षा कठोर शिक्षा देत असेल, तर येऊ द्याल का या लोकांना माझ्यासोबत.? त्यावर तो संस्थानिक हो म्हणाला.

ह्याच लोकांना घेऊन 1907 पासून महाराजांनी राधानगरी धरण बांधायला घेतलं .आज 115 वर्ष होऊन गेली संपूर्ण दगडी बांधकाम. पण एक चिरा नाही की ,गळती नाही की, कोणी त्याच्या विरोधात उपोषणाला बसले नाही .कारण लोकांना उठवण्या आधीच महाराजांनी त्यांचं पुनर्वसन चे काम पूर्ण केले होते.या धरणाच्या एकमेवाद्वितीय नकाशाची माहिती आजही इंग्लंडच्या संग्रहालयात ठेवलेली आहे. की ज्या नकाशाचा अभ्यास मॉर्डन इंजीनियरिंग ला आव्हान आहे.

औद्योगिक विभागासाठी तर एक आगळीच घटना घडली. एकदा किर्लोस्करांचा एक एजंट महाराजांकडे कारखान्यासाठी मदत मागण्या करिता आला .त्या काळात सर्व भारतीय उद्योजकांचे कारखाने इंग्रजांच्या व्यापार नीतीमुळे डबघाईला आले होते. सर्वात पहिले तर महाराजांनी एजंटला मदत मागण्यासाठी खडसावले व म्हटले की उद्योग का अशी भिका मागून चालतात? त्यासाठी नियोजन लागते .” तु जा आणि लक्ष्मणरावांना इथे पाठवून दे”. लक्ष्मणराव किर्लोस्कर महाराजांकडे आले. त्यांची आणि चर्चा झाली. महाराजांनी किर्लोस्करांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचे आवाहन केले. पहिले ड्रॉइंग काढून दाखवा म्हणाले. किर्लोस्कर आणि अट पूर्ण केल्यानंतर , ते किर्लोस्कर यांना म्हणाले मला नाही वाटत आता दुसरे महायुद्ध होईल. मग ह्या तोफा काय कामाच्या. त्याकरिता आपल्या राज्याच्या 128 तोफा त्यांनी वितळवून अवजारे बनविण्यासाठी  दिल्या आणि किर्लोस्कर यांना सांगितले यातून मला एक पैसाही परतावा नको. फक्त माझ्या शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत शेतीची अवजारे उपलब्ध करून द्या म्हणजे झाले. किर्लोस्करानी  आजही आपल्या कारखान्यात लिहून ठेवले आहे” शाहू महाराज नसते तर किर्लोस्कर उद्योग जगाला दिसला नसता”. त्यांना पुढे साडेतीन वर्ष कच्चामाल विकत घ्यावा लागला नाही.

त्यांच्या आयुष्यातील वेदोक्त प्रकरणाचा काळ अतिशय दुष्कर होता. टिळकांसारख्या परिपक्व माणसाने त्यांच्या विरोधात जाणे. सतत 18 वर्ष टीका करत राहणे कठीण होते. तरीही ते या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाले. याविषयी पुन्हा कधीतरी.
डॉ. आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयी आणि हुशारी विषयी शाहू महाराजांनी पेपरमध्ये वाचले ते तडक त्यांच्या घरी पोहोचले. तर डॉक्टर “अवाक!” म्हणाले निरोप पाठवला असता तर मी आलो असतो.” तुम्ही राजे आहात तुम्ही कशाला आलात?”. यावर महाराज म्हणाले “आम्ही वंशपरंपरेचे राजे तुम्ही खरे ज्ञानाचे राजे त्याचा यथोचित सन्मान झाला पाहिजे”.

त्यांनी आंबेडकरांना कोल्हापूरला आमंत्रण दिले. तिथे महाराजांनी आंबेडकरांना स्वतःच्या शेजारी बसवून हत्तीवरून संपूर्ण कोल्हापुरातून मिरवणूक काढली. स्वतःच्या बाजूला जेवायला बसवून घेतले आणि जेव्हा ते अस्पृश्य आहेत. म्हणून पत्रावळी उचलण्यास नोकराने नकार दिला. तेव्हा महाराजांनी स्वतः डॉ. आंबेडकरांची पत्रावळी उचलली व त्यांना हात धुवायला पाणी दिले.

आंबेडकरांच्या जीवनात शाहू महाराजांच्या योगदान विषयी पुन्हा कधीतरी. सोबतच प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराज यांच्या विषयी ही पुन्हा कधीतरी. अन्यथा लेख लांबणीचा प्रमाद घडेल.

असे का होते, कारण उण्या पुऱ्या 28 वर्षाच्या कारकिर्दीत शाहू महाराज सर्वस्पर्शी जगले. त्यांच्या जगण्याचा आवाका खूप प्रचंड होता.

तरीही एक जाता जाता. इंग्लंडच्या बँकिंगहम पॅलेस मध्ये राणीचा मुलगा किंग एडवर्ड याचा राज्यरोहण समारंभ होता. जगभरातील महत्त्वाच्या लोकांना या कार्यक्रमाला आमंत्रित केले  होते. भारतातूनही 567 संस्थानिक राजांना बोलावलेले होते. तेव्हाच इंग्रजी साम्राज्य म्हणजे कधीही सूर्य न मावळणार साम्राज्य.

प्रत्येक जण किंग एडवर्ड च्या जवळ जाई भेटवस्तू देई आणि वाकून कुर्निसात करीत असे. महाराजही किंग एडवर्ड च्या जवळ गेले भेट दिली व किंग एडवर्डला शेक हॅन्ड करायला लागले. तेव्हा तिथे उपस्थित स्कॉट नावाचा ऑफिसर म्हणाला “तुम्ही मांडलिक आहात आमचे. तुम्हाला कुर्निसात करावाच लागेल. “यावर महाराज म्हणाले “मान कापली तरी चालेल पण मान झुकविणार नाही.” ” यांचा तर आज राज्याभिषेक होतो आहे. आम्ही तर जन्मजात राजा आहोत.” यावर प्रमाद झाला म्हणून इंग्रजांनी महाराजांना नजर कैदेत ठेवले .त्यांच्याविरुद्ध चौकशी समिती नेमली गेली. तिने पंधरा दिवसात महाराजांच्या करवीर संस्थानी चौकशी केली. त्यात त्यांना “अतिशय सुजलाम सुफलाम राज्य, पुरोगामी सुधारणा असेले ले राज्य ,भौतिकदृष्ट्या सक्षम आणि इंग्रजांचा पूर्ण कर भरणारे राज्य” ह्या सर्व गोष्टी निदर्शनास आल्या. नंतर महाराजांची पंधरा दिवसाच्या नजर कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्यांना केंब्रिज विद्यापीठाने एलएलडी ही पदवी ही प्रदान केली.

कोल्हापूर संस्थान हे महाराष्ट्रातील असं पहिलं संस्थान होते की, जिथे इंग्रजांच्या काळात इंग्रजांचा युनियन जॅक न फडकता सदैव भगवा फडकत राहिला.

महाराज गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्यावर लेख लिहिला “आज हिंदुस्तान चा सर्च लाईट गेला.”  त्यांचं जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण भारत वर्षात कृतज्ञता वर्ष म्हणून साजरा करण्यात आलं.

छत्रपती शाहू महाराजांविषयी कृतज्ञते शिवाय दुसरी कुठलीच दुसरी भावना व्यक्त केल्या जाऊ शकत नाही.
त्रिवार प्रणाम!!!

            llश्री माऊली चरणी अर्पण ll
                        अश्विनी गावंडे

7 Responses

  1. अप्रतिम माहीती,खूप छान मॅडम

  2. खूपच छान माहीती अगदी बारीकसारीक मुद्दे मांडलेत जे माहीतही नव्हते

  3. 👌👌🙏🙏Mast
    Khup Chan Ashwini
    Chan ch lekhn krte tu vachnachi bhook purn hote 🙏🙏🎉😘

  4. आदरणीय अश्विनी ताई,
    सप्रेम जय हरि!!!
    कोटी कोटी वेळा मानाचा मुजरा केला तरी ज्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत अशा वंदनीय छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सादरीकरण केलेला लेख आवडीने,सवडीने, काळजीपूर्वक अंत: करण्यापासून, लेखातील एकही शब्द वगळला जाणार याची काळजी घेवून ग्रहण केला.प्रारंभापासून शेवट पर्यंत एकाग्रतेने आत्मसात करावे असं लिखाण मनाला खूपच भावलं .महान व्यक्ती मत्वाच्या विविध पैलूंच दर्शन मनाला नवीन उभारी देवून गेलं.वर्तमानात समाजात सध्याच्या परिस्थितीत घडत असलेल्या घटनांचा दृढ दृष्टीने विचार करूनच त्यावेळी केलेले उपाय अर्थात आरक्षण, हिंदू -मस्लिम धर्मातील तेढ महाराजांनी त्याच वेळी आपल्या अचाट बुद्धीमतेच्या जोरावर लिलया हाताळून भावी राज्य कर्त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे हे सहजपणे उदाहरणांसह सादर करून आपण आपल्या बुद्धीमतेची झलक दाखवण्यात कुठेही कमी पडला नाही.आपल्यावर मनापासून प्रेम करणा-या चाहत्यांकडून ज्ञानबोधाचे, मार्गदर्शनाचे झरे अखंडपणे प्रवाहीत राहू दे हीच अपेक्षा .सुसंगत, समर्पक, बोधप्रद प्रभावी लेखन
    आपल्या माध्यमातून व्हावे हीच प्रभूचरणी प्रार्थना.
    आपला स्नेहांकित,
    कदम काका, खालापूर-रायगड
    !!!!!!जय हरि!!!!!!!

  5. अतिशय अप्रतिम लेख, संपूर्ण मुद्देसूद मांडणी आणि माहिती.. आपल्या कडून असेच प्रभावी लिखाण होत राहो आणि आपणांस उत्तम उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *