कधी दिसे का ईश राउळी ?
सावित्रीबाई विलक्षण प्रखर बुद्धिमत्ता असलेली स्त्री. त्याकाळी सावित्रीलाही शिकण्याचा अधिकार नव्हता. परंतु एक खंबीर आणि उदयोन्मुख साथ मिळाल्यावर या माऊलीने स्वतःच्या जीवनातील क्रांतीने सर्व बहुजन वर्ग आणि एक जात सर्व स्त्रियांची जीवने प्रकाशाने उजळून टाकली.
सावित्रीबाईंनी स्त्रियांची सामाजिक बैठकच बदलली. जणू काही शिक्षणाच्या चाबकाने सर्व काही स्थिरस्थावर केले. आजचे जे पुरोगामी महाराष्ट्राचे स्वरूप आहे ते फुले दांपत्य नसते आणि त्यांनी जर सामाजिक, नैतिक, आर्थिक आणि धार्मिक सुधारणांचे भिमकार्य केले नसते, तर कदाचित आजही महाराष्ट्र तिथेच असता जिथून फुले दांपत्या ने सुरुवात केली.
हा लेख सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त असला तरीही, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले वेगळे करताच येत नाही. हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. न पेक्षा त्यांचे एकमेकांशिवाय अस्तित्वच नाही .त्यांच्यासाठी सह अस्तित्व ही संज्ञा योग्य ठरते.
“पूर्णता के अर्थ मे अनुबंध असा असलेला हा संबंध. समान कार्यक्रम और फल परिणाम की समान जिम्मेदारी.”
पूर्णता हा शब्द मानव ध्येयाच्या अर्थाने इथे वापरला आहे. या दोघांनी एकमेकांच्या साथीने एकमेकांना पूर्ण केलं. विश्वातील अतिशय विलक्षण अस जोडपं. ही जोडी विलक्षण का ? याचा तेव्हाच प्रत्यय येतो जेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अंतर्मनाने समजून घेतो.
जशा सावित्रीबाई फुले ज्योतिरावांच्या सोबत आल्या तसतसा त्यांनी आपल्या बुद्धीचा पैस वाढवला. ग्रहण क्षमता एवढी की ,ज्योतिराव फुले यांच्या सर्व विचार जणू काही शोषून घेतले. स्वतःची विचारशक्ती ही अफाट त्यात स्वतःचे विचार गुंफले. या मार्गाने त्या आत्मभानातून आत्मसन्मानापर्यंत पोहोचल्या. आणि त्याच मार्गाने त्यांनी महाराष्ट्रातील तळागाळातील बहुजन वर्ग आणि तमाम स्त्रियांना आत्मभानातून आत्मसन्मानापर्यंत पोहोचवले.
१८६३ साली जेव्हा काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या प्रसंगावरून फुले दांपत्य बालहत्या प्रतिबंध गृहाच्या स्थापनेपर्यंत पोहोचले. तेव्हा ज्योतिरावांनी त्या काळात आपल्या घरावर
“ज्या माझ्या माता भगिनी व्यवस्थेच्या वासनेच्या बळी होऊन आत्महत्या करायला जात असतील, त्या सर्वांनी माझ्या घराला माहेर समजून आणि माझ्या सावित्रीला आई समजून खुशाल माझ्याकडे यावे.”असे रंगाने लिहून ठेवले होते.
केवढे धाडस! व्यवस्थेच्या विरोधात.
आज २०२५ मध्ये सुद्धा की ज्याला आपण आधुनिक शतक संबोधतो. या काळातही कुणीही इतक्या स्पष्ट आणि सहज शब्दात आवाहन करू शकत नाही. जे त्यांनी अठराव्या शतकात केले. काळाच्या अतिशय पुढे चालणारे हे प्रगल्भ आणि दूरदृष्टी असलेले दांपत्य होते.
माझ्या अल्पमतीप्रमाणे या दोघांपैकी कोणी एकटा हे करू शकला नसता .कारण ज्योतीरावांच्या यतीत्वालां सावित्रीबाईंच्या सतीत्वाने साथ दिली. ज्योतिरावांनी सावित्रीला त्यांच्यातली समजोन्मुखता दिली तर सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना त्यांच्यातील परिवारोन्मुखता . ज्योतिराव यांनी त्यांच्यातील कर्तृत्व तर सावित्रीबाईंनी त्यांच्यातील मातृत्व पणाला लावले. सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातून बहुजन समाज व त्यातील सर्व स्त्रियांना समजोन्मुखता ,परिवारोन्मुखता, कर्तुत्व, मातृत्व दिले. माणूसपण दिलं. या अर्थाने सर्वांना सामाजिक न्याय दिला.
लौकिक अर्थाने मूल नसलेल्या या दांपत्याने अनेक शिक्षण संस्था , आणि अशा अनेक चळवळी उभारल्या ( की ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.)अनेक पुस्तके अपत्य रूपाने प्रसवल्या आणि त्याच्या अगणित प्रसवपिडा भोगल्या. समाजातील प्रत्येक शेवटच्या माणसाचे उत्थान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जे सर्व पारलौकिक होते.
ते दैवी होते किंवा त्यांना देवत्व बहाल करून ,दैवी गुण संपन्न आहेत म्हणून .त्यांची किंवा कोणत्याही सामान्य माणसाची प्रयत्नांची पराकाष्ठा अर्थात कर्मपरायणता मी झुगारत नाही .तर स्व चा शोध घेण्याचा वस्तूपाठ या दोघांनी सर्वांना घालून दिला. असे माझे मत आहे .
“मी कोण ?”आणि “मी इथे का आलो आहे?”
हे शोधण्यासाठी चा प्रवास म्हणजे मानवी जीवन हे प्रत्यक्ष त्यांनी जगवून दाखवले.
ज्याप्रमाणे भगवान गौतम बुद्धांनी मानवी दुःखाचे मूळ कारण मानवाच्या तृष्णेत आहे. याचा शोध घेतला. त्याप्रमाणे फुले दांपत्याने बहुजन समाजाच्या दुःखाचे कारण शोधले.
विद्येविना मती गेली l
मती विना नीती गेली l
नीती विना गती गेली l
गती विना वित्त गेले l
वित्ता विना क्षुद्र खचले l
इतके अनर्थ एका अविद्येने केले ll
अविद्या म्हणजे अज्ञान. व्यक्ती अज्ञानी असेल तर त्याला कारण आणि परिणामांची शृंखला स्पष्ट नसते. मानवी जीवनाचा परिघ कितीही दैदिप्यमान असला तरी जगण्याची सुरुवात मात्र जमिनीपासून करावी लागते.
म्हणून अज्ञानावर घाव घालण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानासाठी शिक्षण. शिक्षणासाठी शाळा. फक्त शाळाच काढून हे दाम्पत्य थांबले नाही.तर त्यांनी शाळेसाठी अभ्यासक्रम तयार केला. फक्त अभ्यासक्रमच नाही तर शिकवायचं कसं? शिकवायच्या पद्धती कोणत्या वापरायच्या? शिकवायचं किती आणि कुठपर्यंत? याचं नियोजन केलं आणि राबवलं. म्हणून तर त्याही काळात इंग्रजी शाळांपेक्षा सावित्रीबाईंच्या शाळेचा निकाल जास्त असायचा. कारण हे शिक्षण जगण्याची थेट जाऊन भिडत असे.
ज्योतिराव सावित्रीने फक्त तत्त्वज्ञान मांडलं नाही .फक्त मानवी विकासाचा मार्ग दाखवला नाही .तर ते प्रत्यक्ष सर्व जमिनीवर उतरवून दाखवलं प्रत्येक गोष्टीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.
वयाच्या 66 व्या वर्षी पुण्याच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन प्लेग ग्रस्त मुले , लोकं सावित्रीबाईंनी स्वतःच्या खांद्यावर उचलून स्वतःच्या मुलाच्या शिबिरात आणून उपचार केले. स्वतःचा अंत होण्याची भीती बाळगली नाही. प्रत्येकाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला.
काशीबाई या विधवा स्त्रीचा मुलगा यशवंत. दत्तक म्हणून घेतला आणि स्वतःची संपूर्ण मिळकत त्याच्या नावे केली. घरातही सामाजिक न्याय केला.
सती प्रथा असण्याच्या काळात ज्योतिरावांच्या चितेला प्रत्यक्ष अग्नी देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. रूढी, प्रथा ,परंपरा (ज्या बुरसटलेल्या होत्या)मोडण्यासाठी त्यांनी प्रसंवपिडा भोगल्या. समाजातील माणूसपण नाकारलेल्या प्रत्येक स्त्रीला धाडस दिलं. संघर्ष करायला शिकवलं. संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही .हे प्रत्यक्ष दाखवलं. धर्म नाकारला नाही तर पर्याय दिला. सत्यशोधक समाज . बुरसट परंपरा मोडल्याशिवाय विकास साधता येत नाही .हे ही सिद्ध केलं.
सामान्य माणसाला फक्त जीवनातील तत्व सांगून भागत नाही. तर ते पटवून द्यावे लागतं आणि पटवून देण्यासाठी ते प्रत्यक्षात जगवून दाखवावं लागतं.सतत प्रबोधन करावं लागतं. प्रबोधन कुठपर्यंत ?तर समजेपर्यंत. अविरत.
समाजात समता आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्याआधीही असे प्रयत्न झाले होते .
महाभारत पूर्व काळातील एक घटना. निरुरती नावाची एक राणी होती. निरुरती कारण तिचे राज्य नैऋत्येला होते. पहिली लोकसत्ताक राणी . जिचे संपूर्ण सैन्य महिलांचे होते. तिच्या राज्यात पुरुष निष्ठेने घरकाम करायचे . कारण नाही केले तर तुरुंगात टाकले जायचे. तिचे समतेचे राज्य होते. पण ती नको होती लोकांना -पुरुषांना. कारण सर्वांना समानता मिळाली की पुरुष अडचणीत येतो .मग गुरुगुरायचे कुणावर? हा प्रश्न पडतो. कारण अंतर्गत सत्ता गाजवण्याची आकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही. याच निरुरती ने राज्य कारभार चालवण्यासाठी एक गुणोत्तर तयार केले होते. म्हणजे उत्पन्नाचा किती भाग राज्याला द्यायचा? किती स्वतः ठेवायचा? किती इतर विकासासाठी ठेवायचा? अशा प्रकारचा. याला पासा म्हणत असत. पण निरुरती चे राज्य शेवटी उलटवल्या गेलं. शेवटी महाभारतात तोच पासा द्युत खेळण्यासाठी वापरण्यात आला.
खरंतर अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेलाच समता नको असते. कारण ती आली तर व्यवस्थेचा डोलारा कोसळतो.
त्या समतेची एक झलक या दांपत्याने दिली. त्यायोगे सावित्रीबाईंनी स्त्रीच्या विचारशक्तीची रेषा बदलली. काचेची न दिसणारी भिंत त्या माध्यमातून टिचली. म्हणून तर स्त्रीची बसण्याची जागा बदलली. माझ्या मते स्त्री-पुरुष हा भेद शरीरगत नसून ,तो वृत्तीगत आहे.
आजही आपण सावित्रीबाईंची जयंती बालिका दिनाच्या रूपाने साजरी करतो. मुलींना सावित्रीबाईच्या वेशात सजवून, वेशभूषा स्पर्धा घेऊन, उत्कृष्ट वेशभूषेला पुरस्कृत करतो. परंतु यातून अनुकरण केवळ रूपाचं घडतं. रूपाचं अनुकरण केल्यापेक्षा गुणांचं अनुकरण करणे आवश्यक आहे.
कारण व्यक्तीतील गुणांमुळे व्यक्तीला रूप येतं. रूपामुळे गुण येत नाही.
18 व्या शतकात जातीच्या नावाखाली बहुजनांना शिक्षण नाकारणारी व्यवस्था आज आर्थिक कारणांनी शिक्षण नाकारत आहे. कारण बहुजन शहाणा झाला तर अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा डोलारा कोसळेल.
म्हणून अशा जयंतीदिनी वेशभूषा करून जागर केल्यापेक्षा. “फुले दांपत्याच्या बोधरूपी प्रकाशाच्या विचारांचा जागर केला पाहिजे.” तळागाळातील व्यक्तीचे उत्थान ज्या विचारांनी होईल अशा विचारांचा जागर होणे ही आजही आजच्या काळातही आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे.
फुले दांपत्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या हृदयाचा पट इतका मोठा होता . किंबहुना वैश्विक होता. विश्वातील प्रत्येक शोषित समाजाचे शोकनृत्य तिथे होत असे. म्हणून तर महात्माजींचे गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील निग्रो लोकांना समर्पित आहे.
मग आजच्या आधुनिक काळातील सावित्रीच्या लेकीची भूमिका काय असायला पाहिजे? तर तिने स्वतःला बघायला शिकलं पाहिजे. आरशात नव्हे तिथे तर आपण नसतो. आपले प्रतिबिंब असते. हे लक्षात न आल्याने.
कही ऐसा न हो
जिंदगी भर एक ही गलती करता रहा ए गालिब
धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा l
तो एक ही करो
सिर्फ एक पत्थर तबीयत से उछालो l
ते कसं ?ते कबीरांनी सांगितलं. एकदा अणूस्फोट झालेल्या भूमीवर ,आंधळे कबीर एका हाती कंदील आणि दुसऱ्या हाती बोधिवृक्षाचे रोपट घेऊन चालत होते. चालताना त्यांना काही लोक भेटले. त्यांच्या हातातील कंदील पाहून लोक त्यांना हसत होते आणि म्हणत होते. तू तर आंधळा तुला काय गरज कंदीलाची? तेव्हा कबीर म्हणाले हा कंदील माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी आहे. जेणेकरून तुम्ही माझ्यावर आदळणार नाही.
कारण माझ्या दुसऱ्या हातात हे बोधी वृक्षाचे रोपट आहे. ज्याची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात आणि जमिनीच्या गर्भाशयात झालेला बिघाड नष्ट करून ती जमीन पुन्हा सुपीक करतात.
असा बोधिवृक्ष प्रत्येकाच्या हृदयात पेरण्याचे काम फुले दांपत्याने केलं. त्यांच्या मते जे सृजन करू शकते ते सबल असते. सक्षम असते. मग ती भूमी असो की स्त्री. स्त्री सृजन करणारी निर्माती, भूमी पण सृजन करणारी आणि निर्माती. आता भूमीच्या सुर्जनात्मकतेचा शोध लावणारी ही स्त्रीच. मग सात बारावर तिचं नाव नाही. असे का? पुन्हा एकदा प्रवृत्ती. (जी स्त्री-पुरुष शरीरगत नसून वृत्तीगत असते.)
ही जाणीवही त्यांनी दिलेल्या ज्ञानानेच झाली आहे.
अशा महामानवांच्या नावाचा वारा जरी कानावरून गेला तरी हृदय गहीवरून येते .असे गहिवरणे आज प्रत्येकाच्या आणि माझ्याही जीवनात ज्योतिराव आणि सावित्रीबाईच्या कर्तुत्वाच्या रूपाने आले आहे. त्यांनीच आयुष्याला उत्तर देणं शिकवलं.
करून गेले असेही काही दुनियेतून या जाताना ,
गहिवर यावा जगास साऱ्या त्यांचा आठव येताना ,
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर झाला कातर कातर
नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
llश्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे
खूपच छान अभ्यास पूर्व लेखन नवीन माहिती मिळाली
लेख वाचुन समाधान वाटले।
अतिशय सुंदर रीतीने सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला… त्यांचं कर्तृत्व मांडले… अतिशय छान लेख….
अभ्यास पूर्ण लेख!
प्रबोधन पर लेखन. व्यक्तीतील गुणामुळे व्यक्तीला रूप येतं. अप्रतिम! मूलगामी, गहनतम चिंतनियतेला नितळ, स्पष्ट वैचारिक आकाश दिलतं. देवळात न रमणाऱ्या देवत्वांच्या ,सोनपावलांनी निर्मिलेल्या पाऊलवाटेवरुन ,सजगतेसह ,अविरत प्रवास ,मुक्कामापर्यंत पोहोचवेल. वाट चुकलेल्या वाटसरुंना विवेकरुपी कंदील, ही युगांतरी प्रवाही पाऊलवाट शोधण्यासाठी सहाय्यक ठरेल.
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या समन्वयातून
सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रियां बाबतच्यादृष्टिकोनात अमुलाग्र बदल घडून आला .यांच्या जीवनाला नवा सूर्य मिळाला परंतु आजही अशा कितीतरी गोष्टी आणि घटना आहेत त्या अजूनही आपल्यापर्यंतच्या पोचल्या नाहीत किंबहुना त्या वाचण्याचा किंवा त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याकडून होत नाही परंतु आपला लेख वाचल्यानंतर अशा कितीतरी गोष्टी स्पष्ट झाल्या की त्या आजचागायत वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेल्या नव्हत्या अतिशय सखोल समर्पक अभ्यासपूर्ण असा लेख की जो मनाला स्पर्श करून जातो खूप छान लेख.
खुप सुंदर विचार मांडले आहेत