ईक ओंकार सतनाम
आज शीख धर्म संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती. खरंतर एखाद्या लेखांमध्ये शीख धर्माचा किंवा गुरुनानक देवजी यांच्या विषयी सांगून होणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे.
मग हा खटाटोप कशासाठी? गुरुनानक देवजी यांच्या अध्यात्मिक चिंतनाविषयी त्यांच्या शिखधर्मस्थापनाच्या संबंधाने जे काही चार शब्द लिहिल्या जातील त्यांने माझीच पवित्रता वाढेल आणि माझी शुद्धी होईल म्हणून.
आजचे आधुनिक युग. जे खूप ज्ञान विज्ञान संपन्न आहे. माहितीचे भांडार आहे. अशा युगात जगत असताना , जग तर प्रगत झाले. परंतु माणूस खूप संकुचित झाला आहे. अशा या समाज अवस्थेत आजही असं म्हटल्या जातं
जब जब पडी पीडा है l
सीखने उठाया बिडा हैl
असा शीख धर्मावर विश्वास असण्याची कारण मीमांसा काय असू शकते? एकदा बघण्याची गरज आहे.
आज या जगात शीख धर्मीयांची संख्या तीस कोटी असून पैकी 80% शीख भारतात राहतात. शीख या शब्दाचा खरा अर्थ शिष्य असा होतो. आजही शीख समाजाचा उल्लेख संपूर्ण जगात most trusted community म्हणून केला जातो.
सन १४६९ मध्ये गुरुनानक देवजी यांचा पंजाब मधील तलवंडी या ठिकाणी जन्म झाला .पुढे गुरुनानक यांच्या नाव कर्तुत्वाने त्या गावाचे नाव नानकाना साहेब ठेवण्यात आले. जे आज पाकिस्तानात आहे.
शीख धर्माच्या स्थापनेच्या ठिकाणाला सुद्धा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक महत्त्व आहे. ते यासाठी की याच ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन मानवी सभ्यता सिंधू सभ्यता वसली होती.
गुरुदेव नानकजींचा जेव्हा जन्म झाला त्या काळात भारतावर मुस्लिम आक्रमकांचा प्रभाव वाढत होता. हिंदू मुस्लिम, जैन, बौद्ध यासारखे अलौकिक शिकवण देणाऱ्या धर्मांमध्ये कुरिती आणि कुप्रथांच्या प्रवेशाने एक प्रकारची पठारावस्था आली होती. अतिशय लवचिक आणि सर्वसमावेशक अशा धर्मांमध्ये त्या त्या काळातील लोकांच्या असमजेमुळे ताठरपणा निर्माण झाला होता. अशातच पुन्हा मानवी जीवनाच्या अंतिम लक्ष्याकडे अंगुली निर्देशाचे काम होणं गरजेचं होतं.
म्हणतात ना “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ”
त्याप्रमाणेच बाल्यावस्थेपासूनच गुरुनानक देवजी अतिशय अद्भुत असे बालक होते. वयाच्या चौथ्या वर्षीच ध्यानधारणा करू शकत असत. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत सर्व धर्मांचे ग्रंथ वाचून झाले होते. त्या काळात वयाच्या सातव्या वर्षी त्यांना कितीतरी भाषा येत असत. वयाच्या आठव्या वर्षी ईक ओंकार सतनामचा संदेश त्यांनी जगाला दिला.
एकदा गुरु रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही आपले राष्ट्रगीत तर लिहिले .आता आंतरराष्ट्रीय गीत कधी घेणार आहात ? त्यावर रवींद्रनाथ टागोर म्हणाले” ते तर माझ्या कितीतरी आधी
गुरुनानकदेवजींनी लिहून ठेवले आहे.”
इक ओंकार सतनाम. “ईश्वर एकच आहे तोच सर्व शक्तिमान असून निराकार, निर्भय , निर्वैर आहे .तो जन्ममरणाच्या पार असून अनाकलनीय आहे. जो चिरस्थायी असून सर्व जगताचा निर्माता आहे .तोच कर्ता पुरुष आहे .तो अनंत असून परिपूर्ण आहे आणि हेच सत्य आहे. हे अनंत काळापासून सत्य होत.आजही आहे आणि अनंत काळापर्यंत सत्य राहील.” हेच आंतरराष्ट्रीय गीत आहे.
बालपणापासूनच गुरुनानक देवांवर त्यांच्या मोठ्या बहिणीचा खूप प्रभाव होता. वयाच्या नवव्या वर्षी हिंदू संस्कृतीच्या चालीरीतीनुसार जेव्हा पुरोहितांकडून जाणव घालून घेण्यासाठी पुरोहितांना बोलवण्यात आले. तेव्हा गुरुनानक देवजी यांनी ततसंबंधी पुरोहितांना अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले हा सुती धागा आहे ना? तो कधी मळणार नाही का? तो कधी तुटणार नाही का?
मग हा धागा मला पवित्र कसा काय ठेवू शकेल? हा धागा मला अभंग कसा काय ठेवू शकेल? अशा तर्कशुद्ध प्रश्नांनी त्यांनी पुरोहितांना निरुत्तर केले.
मानवाच्या पवित्रतेच्या रक्षणासंबंधी अशा बाह्य गोष्टींवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याच्या आंतरिक गुणांचा विकास कसा होईल ? याकडे बघणे अतिशय आवश्यक आहे. असे त्यांनी पंधराव्या शतकातच आपले मत नोंदवले.
गुरुनानकांना बालसुलभ गोष्टी करण्यापेक्षा धर्मचर्चा धार्मिक ग्रंथांवरील चर्चा यामध्ये फार रुची होती. मोठमोठ्या वेगवेगळ्या धर्मातील धर्मगुरूंशी ते चर्चा करीत असत आणि आपल्या तर्कपूर्ण प्रश्नांनी ,तर कधी उत्तरांनी सर्वांना विचार करायला बाध्य करीत असत.
त्यांच्या परिवाराची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. त्यांच्या वडिलांना नेहमी वाटत असे आपल्याही मुलांनी अतिशय चांगले काम करावे व हीच आर्थिक स्थिती कायम ठेवावी किंबहुना वाढवावी. त्यासाठी त्यांनी गुरुनानक देवजींना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. परंतु गुरुनानक देवांचे मन कशातच रमेना. शेवटी त्यांच्या वडिलांनी विचार केला. आपण याला दुकान सुरू करायला लावूया. दुकान तर कोणालाही चालवता येतं. त्यात फायदा झाला की याचे मन आपोआप लागेल. आणि आपला मुलगा मार्गाला लागेल.
म्हणून त्याकाळी त्यांच्या वडिलांनी गुरुनानक देवजींना वीस रुपये दिले व सांगितले यातून तू तुला कुठलाही आवडेल असा व्यापार सुरू कर.
नानक त्यांच्या मित्राला घेऊन व्यापार करण्यासाठी निघाले. 10 मैल अंतर कापल्यानंतर त्यांना एक जंगल लागले त्यामध्ये अनेक साधु-संत ,तपस्वी तपस्या करताना त्यांना दिसू लागले. नानकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांनी अनेक जणांशी अध्यात्मिक चर्चा केली. सरते शेवटी त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची चौकशी केली. आणि त्यांच्या जवळील पैशाचा उपयोग त्यांनी त्या सर्व साधुसंत, तपसव्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी केला. त्यांचा मित्र त्यांना म्हणाला आता घरी जाऊन काय सांगशील? हे पैसे तर आपल्याला व्यापारासाठी दिले होते.
त्यावर गुरुनानक देवजी त्यांना म्हणाले ” अरे भाई यही तो सच्चा सौदा है l” व्यापार केला असता तर पैशांचा फायदा झाला असता परंतु अन्नदान केल्याने जन्मजन्मांतरी चा फायदा होणार आहे.
हीच आजच्या लंगर ची सुरुवात आहे.
शीख धर्माच्या शिकवणुकीचे मुख्यत: तीन आधारस्तंभ मानल्या जातात. त्यातील पहिला म्हणजे वंड चखना :- कुठलाही मोबदला न घेता खाऊ पिऊ घालण्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करणे. आणि या यज्ञकार्यात पडेल ती कामे करणे. स्वयंपाक करण्यापासून ते पंगत वाढण्यापर्यंत ते साफसफाई करण्यापासून तर ताट धुण्यापर्यंत. कारण अशी कामे केल्याने व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो. खरं म्हणजे मानवी अहंकारच ईश्वर आणि मानव यांच्यामधील सर्वात मोठी भिंत आहे. शीख धर्मामध्ये काम, क्रोध, लोभ , लगाव आणि अहंकार यांना पाच चोर किंवा माया समजल्या जाते. किंबहुना माया ही अशी प्रत्येक गोष्ट जी माणसाला ईश्वरापासून दूर करते.
नानक देवांच्या मतानुसार मानवाचा पृथ्वीवरचा जन्मच नर्क आहे. मानवाचे पुनर्जन्म कर्माच्या आधारावर होत राहतात. आणि पुनर्जन्मापासून मुक्ती ही अहंकार मुक्ती नंतरच संभव आहे. म्हणून अहंकार मुक्तीचा राजमार्ग म्हणजे सेवा. त्यासाठी स्वतःचे धन देणे ही मोठी गोष्ट नसून त्यापुढे सेवेसाठी तन देणे अर्थात शारीरिक श्रम करणे आणि त्याही पुढे म्हणजे ही सेवेत मन अर्पण करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. Nothing can be profitable than helping a needy. हाच सच्चा सौदा. त्यापासूनच सच्चा सौदा नावाचा गुरुद्वारा तयार झाला. आजही फारुखाबाद पाकिस्तान मध्ये स्थित आहे. हे म्हणजे लंगर. लंगर ही अशी व्यवस्था आहे .जिथे आजही जात-पात उच्चनीच असे कोणताच भेदभाव केला जात नाही.
नानक देवांनी अशा काळात लंगर सुरू केले. ज्या काळात खालच्या जातीच्या माणसासोबत पंगतीला बसून जेवण ग्रहण केले तरी जात भ्रष्ट होत असे. गुरुनानक देवांच्या मते सर्व मानव समान आहेत. जे हे मानू शकत असतील अशांना त्या धर्मात प्रवेश असेल म्हणून सुरुवातीलाच नानक देवजी म्हणायचे “पहले पंगत फिर संगत.”
एक फार प्रसिद्ध घटना आहे.एकदा अमेरिकन कोर्टामध्ये एका व्यक्तीवर ब्रेड चोरीच्या आरोपाखाली खटला चालला. निर्णय देण्याची वेळ आली तेव्हा जज मॅडम आरोपीला म्हणाल्या यापुढे जर तुला भूक लागेल तेव्हा तू अशी चोरी करू नकोस. कोणत्याही गुरुद्वारामध्ये जा तुला फुकट जेवण मिळेल. कोणी विचारणार पण नाही किती वेळा जेवला काय जेवला?
आजही अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचा गुरुद्वारा largest free kitchen in the world आहे. एवढेच नाही तर कोविड महामारीच्या काळात दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचे सुद्धा लंगर ठेवले होते.
खरंतर लंगर सेवेच्या माध्यमातून नानक देवांनी मानवी जीवनाच्या सफलतेची सर्वकालिक ideal blueprint उपलब्ध करून दिली. Purpose before profit फायद्याच्या आधी जगण्याचा उद्देश महत्त्वाचा.
गुरुनानक देवजी हे दूरदृष्टी असणारे असाधारण व्यक्तिमत्व होते. त्यांनी मानवी कल्याणासाठी चिरकाल टिकणाऱ्या शिकवणींसोबतच कायम संस्था उभारल्या, मानवी मनामध्ये मानवी प्रगतीचे सर्वकालिक मूल्य रुजवली. आजही ज्याचे प्रत्यंतर शिख समुदायाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरून समोर येतात.
गुरुनानक देवांच्या शिकवणीचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे किरत करना :- इमानदारी आणि प्रामाणिकपणाने कमाई करून स्वतःचे जीवनयापन करणे. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख तर येणार आहेतच .ते प्रत्येकाच्या विकासासाठी गरजेचे आहेत. परंतु इमानदारी आणि प्रामाणिकपणाने जगण्यातून व्यक्तीचा आत्मविश्वास वाढून जगण्यात निर्भयता येते.
धैर्य, निर्भयता , अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे. ही मूल्य शिखधर्माच्या आचरणात आजही दिसतात. जी पंधराव्या शतकात शीख धर्माचे संस्थापना करतेवेळी गुरुनानक देवजींनी रुजवली होती. त्याचे प्रत्यंतर आपल्याला देशासाठी बलिदान करणाऱ्या भगतसिंगांमध्ये दिसतात. तर देशासाठी खेळताना मिल्खा सिंग यांच्यामध्येही दिसून येतात.
एकदा गुरुनानक देवांना त्या काळातील एक शासक मालिक भागो यांनी जेवणासाठी बोलावले. त्याच्याकडे जेवायला जात असताना नानक देवांचे मित्र भाई लालो यांच्याकडेच नानकानीं जेवण केले. हे कळल्या बरोबरच मालक भागो यांना खूप राग आला आणि त्यांनी लगेचच गुरुनानक देवजींना बोलावून आणायला सांगितले. त्यावर गुरुनानक देवजींनी दोघांच्याही घरच्या पोळ्या दोन हातात घेतल्या आणि त्यावर हाताने प्रचंड दाब दिला. तेव्हा मालिक भागो यांच्या घरच्या पोळीतून रक्त पडले तर भाई लालो यांच्या घरच्या पोळीतून दूध टपकले. अशी कथा सांगितली जाते .
या घटनेचा अर्थ सांगताना नानक देवजींनी दोघांनाही सांगितले. मालिक भागो मला जेवायला बोलवण्यामागे तुमचा मूळ उद्देश तुमची शान दाखवणे हा होता. तर भाई लालो चा उद्देश माझी भूक भागवणे हा होता. म्हणून जगत असताना खरा उद्देश महत्त्वाचा आहे.
शीख धर्माचा तिसरा महत्त्वाचा आधार म्हणजे नाम जप. गुरुनानक देव नेहमी म्हणायचे
कलियुगी केवल नाम अधारा
सुमिर सुमिर नर आरही पारा
या कलियुगामध्ये सर्वच धर्मांनी नामजपाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्याचे परिणाम आपल्याला अनेक पुराणकथा मधून दिसून येतात. जसे वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी होणे. द्रौपदीच्या चिरहरणाच्या वेळी नामजपाने भगवान कृष्ण धावून येणे. किंवा नामाजपाच्या साधनेने भक्त प्रल्हादाचे रक्षण होणे.
इत्यादी…
भगवद गीतेत सांगितल्याप्रमाणे मानवाच्या हाती केवळ कर्म करणे आहे. कर्मफल कधीही मानवाच्या हाती नव्हते. असे असले तरीही आदीअनादी काला पासून मानव कर्मापेक्षा कर्मफळाला अधिक चिकटलेला आहे. हाच लगाव आहे. कदाचित कर्मफलाच्या आकर्षणापायीच कर्म करण्यामध्ये तो समर्पित होऊ शकत नाही. अशावेळी सर्व कर्मफळाची जबाबदारी ईश्वरावर टाकत आपण जर नामजप करीत कर्म केले तर ,अकारण चिंता ही मिटेल. शिवाय चित्तशुद्धी ही होईल आणि समर्पण भावाने कर्म करता येईल. जे काम संपूर्ण समर्पण भावाने केले असेल त्याच्या परिणामाकडे बघण्याची गरजच उरणार नाही. Means journey itself is a destination.
म्हणतात ना…
आप उसके नाम मे
तो वो आपके काम मे
आप अपने काम मे
तो वो भी अपने धाम मे l
नामजप कशाचा? तर ईश्वराच्या नावाचा आणि ईश्वराने दिलेल्या सूचनांचा . कशासाठी? वारंवार बघण्यासाठी मी जगताना व्यवस्थित जगतो आहे की नाही? माझी वाट बरोबर आहे की नाही? हाच सत्संग ह्यातूनच मनुष्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत तयार होते. एक दिवस या ज्योतीचा प्रकाश होतो. जो भोवताल प्रकाशमय करून टाकतो. हेच श्रद्धेपासून पूज्य होण्यापर्यंतची यात्रा.
आजही शीख धर्मामध्ये उधृक्त केलेली. कारुण्य (compassion) समाजसेवा(community service) आणि सहाश्चर्य(companionship) मोठ मोठ्या व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाते.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये गुरुनानकांच्या शिकवणीवर आधारित फेलोशिपही दिल्या जाते.
माणसाचे भौतिक आणि अध्यात्मिक आयुष्य अर्थात लौकिक आणि पारलौकिक आयुष्य ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीतच. ते केवळ आपण आपल्या समजेनुसार केलेले जगण्याचे तुकडे आहेत. जे एकमेकांवर अवलंबून नाहीत तर एकच आहेत. तुमच्या पारलौकिक समजेवरच लौकिक आयुष्य अवलंबून असते.
म्हणूनच व्यक्तीचे व्यक्तित्व व्यवस्थितपणे घडण्यासाठी अशा लोकांच्या शिकवणींचा ,जीवनीचा अभ्यास शिक्षण पद्धतीमध्ये अंतर्भूत करणे अत्यावश्यक आहे. भारतामध्ये गुरुनानक देवजी प्रमाणेच इतर अनेक क्षेत्रात खूप महान विभूती होऊन गेल्या आहेत .ज्यांनी मानवी जीवनाचे अनेक आयाम खुले केले आहेत. त्या सर्वांच्या शिकवणीचा, जगण्याचा अभ्यास शिक्षण पद्धतीमध्ये अंतर्भूत असणे अतिशय गरजेचे आहे.
त्या काळात म्हणजे 15 व्या शतकात गुरुनानक देवजी यांनी तीस हजार किलोमीटर ची यात्रा केली. पूर्वआशिया,मध्यआशिया ,युरोप ,अफगाणिस्तान, श्रीलंका, चीन भूतान, रशिया, इराक ,सौदी अरब ,नेपाल आणि संपूर्ण भारत.
असे मानले जाते की वयाच्या तिसाव्या वर्षी नदीमध्ये स्नानासाठी गेले असता ते अचानक दिसेनासे झाले जे एकदम तीन दिवसानंतरच दिसले.
तिथूनच संपूर्ण मानव कल्याणासाठी आपले आयुष्य असल्याचे प्रत्यंतर त्यांना आले.
शीख धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे एक ग्रंथ या धर्मात गुरुस्थानी आहे. ज्यामध्ये मुसलमान पीर ,फकीर, सुफी संत यांच्यापासून तर संत नामदेव, संत कबीर अशा अनेकांच्या मानवाचे गंतव्य स्थान व मार्ग सांगणाऱ्या अनेक रचनांचा समावेश आहे. या अर्थाने सर्वांच्या शिकवणीचा हा सर्वसमावेशक धर्म आहे.
दुसरे म्हणजे शीख धर्म स्वीकाराच असा कोणालाही आग्रह नव्हता. आपापल्या धर्माचं प्रामाणिकपणे पालन करा . फक्त त्यातील कुरिती आणि कु प्रथांचा त्याग करा. कुठल्याही अंधश्रद्धा बाळगू नका.
फक्त तीस कोटी संख्या असेल हा शीख समुदाय पृथ्वीतरावरील प्रत्येक देशात कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. आणि आजही या आधुनिक शतकात तिथे तिथे राहून ही सर्वकालिक सार्वत्रिक मूल्यांची जपणूक करत आहे.
एकदा गुरुनानक जी आपल्या यात्रेदरम्यान एका गावात गेले. तेथील लोकांशी बोलताना त्यांच्या लक्षात आले की प्रत्येक जण एकमेकांविषयी रागाने ,द्वेषाने बोलतो आहे. प्रत्येकामध्ये एकमेकाविषयी राग द्वेष आहे. शेवटी निघताना जेव्हा गावकऱ्यांनी त्यांना आमच्यासाठी काय संदेश द्याल ? असे विचारले तेव्हा नानक देवजी म्हणाले सर्वजण एकमेकांसोबत मिळून मिसळून राहा एकत्र रहा कुठेही जाऊ नका.
जेव्हा समोरच्या गावात गुरू नानक देव जी केले तेव्हा तेथील लोक पहिल्या गावापेक्षा एकदम विपरीत होते. सर्वांना मदत करणे, एकमेकांच्या कामात पडणे, एकमेकांची सेवा करणे यासाठी ते सर्व तत्पर होते. शेवटी त्यांना संदेश देताना नानक देवजी म्हणाले तुम्ही सर्वजण विखरून जा वेगवेगळ्या गावात जा.
हे बघून त्यांचे सहकारी भाई मर्दाना त्यांना म्हणाले दोन गावांना असे दोन संदेश कसे काय? तेव्हा गुरुनानक देव म्हणाले दुसऱ्या गावातील मूल्यांनी जगणाऱ्या लोकांचा सहवास सर्वांना मिळाला पाहिजे ज्यामुळे त्यांच्यातही अशी मूल्य रुजली पाहिजेत.
हीच शिकवण घेऊन शीख समुदाय आजही जगतो आहे.
गुरुनानक देवजी यांचे पंधराव्या शतकात स्त्रियांविषयीचे मत बघितल्यास आजच्या आधुनिक काळात स्त्रियांशी केली जाणारी वागणूक आणि त्यांना अपेक्षित असलेली वागणूक यामध्ये असलेले महदअंतर दिसून येते.
From women, man is born. Within women man is conceived ; to women.; he is engaged and married. Women becomes his friend . To women the future generation come. When his woman dies; he seek another woman. To women he is bound. So why call her bad? From her the kings are born. From woman the woman is born. Without women there is no one at all.
O Nanak only the True Lord is without a women.
असे दूरदृष्टी असणाऱ्या शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देव जी यांच्या चरणी शतशः नमन.
ll श्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे
Informative article 👌👌🙏🙏
खूप अभ्यासपूर्ण लेख.
छान माहतीपूर्ण लेख
खूपच माहिती पूर्ण लेख
Khup chan tai
Nothing can be profitable than helping a Needy. खूप छान वैचारिक गुंफण! अतिशय सखोल माहिती. चिंतनातून चैतन्याकडे नेणारा राजमार्ग “ईक ओंकार सतनाम!!!”
श्री गुरुनानक देव यांना कोटी -कोटी नमन!!
आदरणीय अश्विनी ताई,
सप्रेम वंदे 🙏🙏🙏
ताई नेहमी प्रमाणे “ताई कसं गं हे सर्व जमतं तुला” हा
अज्ञानात(अंधारात) असल्यासारखा प्रश्न विचारणार नाही,कारण आजपर्यंत तुझ्या बोधपर विश्लेषणाचा घोर अपमान आहे.महान संत गुरूनानक देव यांच्याबद्दल चे थोडे फार ज्ञान शाळेत हि शिकलो परंतु ते मार्क मिळवून पास होण्यापूरतेच सिमित होते.गुरूनानक देवाबद्दल च्या आजच्या दैदिप्यमान विश्लेषणाळे , त्यांच्या बद्दलची भक्ती तर द्विगुणित झालीच तर शिख बांधवावरचं प्रेम हि वाढलं.परमार्थिक बुद्धी ची वृद्धि तर झालीच आध्यात्मिक ते कडे उचललेलं पहिलं पाऊल योग्य मार्गावर असून आता दुसरं पाऊल बिनधास्त उचलण्याचा विश्वास निर्माण झाला.शिख बांधवांच स्वःताच्या च काय प्रजाती धर्माविषयी चं प्रेम आजहि पाहायला मिळतं.देशासाठी स्वाभिमानी, देशभक्ती साठी आत्मबलीदान करणारी माणसं आपल्या गुरूने दिलेल्या मानवता धर्माचे आजहि पालन करीत आहेत.कोणी कुठे रहाव आणि कुठं स्तलांतर करावं हे उत्तम दृष्टांताने पटवून द्यावे हे तुलाच जमतं .खुप काही लिहावं वाटतं पण टाईप करायला जमत नाही.असो तुझ्या पवित्र कार्यासाठी आनंदकंद भगवान परमात्मा आपल्याला उत्तम निरोगी आरोग्य सुखसमृद्धी आणि भरभराटीचे आयुष्य प्रदान करो हिच प्रार्थना .
स्नेहांकित
बळीराम भाऊ वावंढळ खालापूर रायगड