wondervoices

आत्मतेजा

तव तेजातील एक अंश दे।
तव धैर्याचा जरा स्पर्श दे ।
तव तेजातील एक किरण दे।
जीवनातला एकच क्षण दे।

असं ज्या व्यक्ती विषयी म्हणावसं वाटेल ते म्हणजे माँ जिजाऊ काय आत्मतेज आणि आत्मबल असेल त्यांचं की त्यांनी मराठी साम्राज्याची मूहूर्तमेळ रोवणारे आणि टिकवणारे असे दोन दोन जगत् विख्यात वंदनीय छत्रपती या भूमीला दिले.

कधी कधी तर असेही वाटते की हे भविष्य का नियतीने लखुजी जाधव आणि म्हाळसाबाईंना दाखविलं म्हणून तर त्यांनी मुलगी होण्याची वाट पाहिली आणि तिचे आगमनही पंचक्रोशीत दहा हजार किलो साखर वाटून केले.

देवगिरीच्या राजघराण्याचं वंशज असणार जिजाऊ चा घर परिवार, आई-वडिलांनी आणि भावांनी जिजाऊंना शिकवण आणि वागणूकही एखाद्या सम्राज्ञी सारखी दिली पुढे जिने मराठी स्वराज्यातील समस्त स्त्री वर्गाला सम्राज्ञी वाटायला लावणारी स्वातंत्र्य, मोकळीक आणि मानसन्मान मिळवून दिला.

जिजाऊ या पर्वाची सुरुवात खरंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नाव ठेवण्यातूनच व्यक्त केली, जि म्हणजे जिज्ञासा ,जा म्हणजे जागृती ,आणि उ म्हणजे उत्कर्ष ज्याच्याकडे जिज्ञासा आणि जागृती आहे, त्याचाच उत्कर्ष होतो, आणि तोच इतरांचा उत्कर्ष घडवून आणू शकतो.

आजपर्यंतच्या आधुनिक मानवी जीवनाच्या इतिहासात हेच माहित आहे की, जगाला दिशा देणारी कर्तुत्ववान माणसं ही मोठमोठ्या विद्यापीठातून घडतात.

Oxford ,Harvard, Cambridge,yale विद्यापीठ ही त्याची जीती जागती उदाहरणे आहेत. यापूर्वी भारतात तक्षशिला, नालंदा यांची नावे घेतल्या जात.

मग विचार आला की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तर अशा कुठल्याही विद्यापीठाचे(University) विद्यार्थी नव्हते .तरीही त्यांचे चरित्र वाचल्यावर ते उद्योजक,(Bussinusman) इंजिनियर,(Engineer) एमबीए(MBA), ह्युमन रिसोर्स मॅनेजर ,(HR) किल्ला डिझाईन करणारे आर्किटेक्चर,(Architecture) लोकनेता(Politician) यासोबतच सेवक,(Servent) एक कलाकार,(Artist) प्रसंगी वज्राहून कठोर आणि लोण्यापेक्षाही मऊ ,कधी मोरपिसासारखे हळुवार असे एकाच वेळी कसे दिसतात ? यांना कोणत्या विद्यापीठाने घडवले नाही, तर तेच स्वतः विद्यापीठ (University)आहेत असे कसे?

आणि मग समोर येतात ते राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे. शिवाजी महाराज यांना घडवण्यात या दोघांचेही योजनाबद्ध प्रयत्न असले, तरी प्रत्यक्ष कार्यवाही मात्र जिजाऊ माँ साहेबांची. कारण त्यांचा निकटचा सहवास. अर्थात खऱ्या अर्थाने माँ जिजाऊ स्वराज्य जननी होत्या.

शिवजन्मापूर्वीच शहाजीराजे आणि जिजाऊंनी ठरवलं होतं की आमचा मुलगा कोणाचीही गुलामगिरी करणार नाही.अर्थात मनसबदारी स्वीकारणार नाही. तर मग होईल काय ? तर तो अखिल विश्व ज्याला वंदन करेल अशा “लोककल्याणकारी राज्याचा छत्रपती ज्या राज्याची मालकी लोकांची असेल” असा होईल.

शिवाजी महाराजांचे शिक्षण 7 ते 12 या वयात बंगळूर येथे झाले. त्यात त्यांनी 32 विषयांचा अभ्यास केला.वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी पुणे येथे गाढवाचा नांगर फिरवलेल्या जागेवर शिवराय हे त्यांच्या अष्टप्रधान मंडळ आणि 600 कर्मचाऱ्यांसोबत हजर झाले.तोपर्यंत शिवरायांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सिंदखेडराजा ते पुणे ,पुणे ते बंगरूळ आणि बंगरूळ ते पुणे असा 2,400 किलोमीटरचा अभ्यासपूर्ण प्रवास पूर्ण झालेला होता.

हा असा सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम स्वतःच्या मुलासाठी तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्यामध्ये दूरदृष्टी आणि जागतिक दर्जाच्या मूल्यांचं अधिष्ठान असतं.

एखादी गोष्ट माहीत असणं आणि एखाद्या गोष्टींमध्ये पारंगत असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात .कारण माहिती म्हणजे ज्ञान होऊ शकत नाही. व्यक्तीला असलेली माहिती जर अनुभवाच्या रूपाने त्याच्या जीवनात ती अनुभवली तरच ती ज्ञान होते आणि जेव्हा ते ज्ञान होतं तेव्हाच ते त्या व्यक्तीचे ते स्वत्व होतं.या अर्थाने जिजामाता ज्ञानी होत्या.

जिजाऊ काय वागतात ? कश्या वागतात याचे प्रत्यक्ष साक्षीदार शिवबा होते. जिजाऊंचे जगणेच जिजाऊंचा संदेश होता.पुढच्या पराक्रमासाठी आणि स्वराज्यासाठी शिवबांसाठी हा वस्तू पाठच होता.

जिजाऊंनी सर्वप्रथम काम केले ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन . गाढवाचा नांगर फिरवलेल्या जमिनीवर जिजाऊंनी शेती करण्यास ची सुरुवात केली. त्याकाळी अशी मान्यता होती की जो गाढवाचा नांगर फिरवलेल्या जमिनीवर शेती करेल त्याचे संपूर्ण कुळ नष्ट होईल. ती मान्यता जिजाऊंनी पुसून टाकण्याचे काम केले. इथे जर राज्य निर्माण करायचे असेल ,तर ही भूमी सुजलाम सुफलाम झाली पाहिजे. त्याकरिता शेती करणारे लोक इथे आले पाहिजेत. त्यांनी शेती केली पाहिजे .त्यासाठी शेतकरी जगवणे आणि टिकवणे आवश्यक आहे ,म्हणून जिजाऊंनी शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत केली आणि संरक्षण दिले.

शिवाजी महाराजांच्या जन्मापासून १६३० ते १६५२ पर्यंत या संपूर्ण भागात दुष्काळ होता.जिजाऊंनी स्वतःच्या मुलाचं संगोपन करतं ,समाजाला आधार देत, प्रतिकूल निसर्गाला तोंड देत, निसत्व व अस्मिता हरवलेल्या आणि जमीनदारी व जहागिरीच्या पुढे दृष्टी न गेलेल्या समाजात आपलंही एक स्वतंत्र-राज्य(Swarajya) निर्माण होऊ शकतं ,ही भावना निर्माण करण्याचा शिवधनुष्य उचलला आणि पेललासुध्दा.

जी आंतरराष्ट्रीय विद्यापीठं या काळात मूल्य आणि शिकवणं प्रदान करतात ती मूल्य जिजामातांमध्ये होती. आपण खूपदा ऐकलं असेल की जिजामातांनी शिवबांना रामायण महा भारतातील कथा सांगितल्या या कथेतून त्यांनी कोणती मूल्य दिली त्याआधी त्यांनी कोणती मूल्य स्वतःत रुजवली ते बघणं जास्त उपयुक्त ठरेल.

जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याला मूल्य(Value) देते, याचा अर्थ ती मूल्य(Value) सर्वप्रथम देणाऱ्या व्यक्तीमध्ये असावी लागतात.

पहिलं मूल्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषेत सांगायचे झाले तर
१) स्वतःचे आत्मबल वाढवा (Maximize your mind) :-
व्यक्तीच्या अंतरात्म्याची ताकद असीम ,अमर्याद आहे. प्रत्येक व्यक्ती या जगात काहीही करू शकतो. प्रत्येक व्यक्ती मोठे ध्येय ठेवू शकतो आणि ते मिळवू शकतो.आजूबाजूला मोगल, कुतुबशाही ,निजामशाही, आदिलशाही ,फरीदशाही, इंग्रज, डच ,फ्रेंच अशा मोठ्या सत्तांमध्ये उभं राहायचं असेल, तर आत्मबल असणे गरजेचे होते. जे सुरुवातीला स्वराज्याचा पाया रोवतांना जिजाबाईंनी स्वतःचे आत्मबल वापरून करून केले.

२) स्थितप्रज्ञ असणे-(Self collected or steady intellect ) जगात काहीही नवीन भव्य दिव्य निर्माण करायचे असेल त्याचा पाया रोवायचा असेल तर पाया रोवणारी व्यक्ती ही स्थितप्रज्ञ असणे खूप गरजेचे आहे .ज्या खुद्द राजमाता होत्या आणि नंतर त्यांनी तोच गुण शिवबांमध्ये उतरवला मग स्थितप्रज्ञ म्हणजे काय?

जसे कितीही पाऊस कोसळला तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही आणि कितीही दुष्काळ पडला तरी मागे हटत नाही असे होणे म्हणजे स्थितप्रज्ञ. शहाजीराजे जेव्हा दक्षिणेत होते त्यावेळी पुण्यात राहून जिजाबाईंनी हेच तर केले. अर्थात एवढं सगळं करताना कधी यश मिळालं तर हूरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. हे तर आपणा सर्वांना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून दिसून येते. शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजलखानाचा वध केला त्याला चार महिन्यांचं नियोजन होतं . हे सर्व झाल्यावर रात्री महाराजांनी आपल्या सैन्याचा दरबार घेतला, जखमींवर औषध उपचार झाले चांगली कामगिरी करणाऱ्या मावळ्यांना बक्षीसे देण्यात आली आणि राजे पुढील कामगिरीसाठी कोल्हापूर कडे रवाना झाले.

 

३) वेळेचा सदुपयोग Maximize your time(time management):- या जगात प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तास मिळतात .ज्याची ध्येय मोठी असतात ते वेळ वाया घालवत नाहीत. सर्वप्रथम यामध्ये करावं लागतं ती म्हणजे कामाची विभागणी(planning)
आणि प्रत्येकाला जबाबदारी
(Responsibility) देण्याचं कसंब.त्याआधी कोण जबाबदारी चोखपणे पार पाडू शकेल अशी माणसं ओळखण्याचं कसंब. कामाची विभागणी चारच भागात केली जाते. (Do,delay,deny,dump)Do म्हणजे जी कामे तात्काळ आणि महत्त्वाची असतात. delay म्हणजे महत्त्वाचे परंतु तात्काळ करायची नसलेली.deny म्हणजे सद्यस्थितीत नकार.dump म्हणजे कधीच करायची नसणारी.
शहाजीराजांची पत्नी म्हणून त्यांची जहागिरी सांभाळण्याचं काम आणि छत्रपती शिवाजींची आई म्हणून त्यांच्या राज्याचा कामगार सांभाळण्याचं काम करत असताना जिजाऊंनी ही तत्व पाळलीत त्यातूनच पुढे शिवाजी महाराजांच्या राज्यात कुठल्याही कामांमध्ये waiting list नसायची आणि zero pendency चे तत्व निर्माण झाले आणि पाळल्या गले.
गडावर कोणत्याही कामासाठी आलेला कोणताही माणूस जेवल्याशिवाय खाली उतरणार नाही, अर्थात याला आजच्या प्रचलित भाषेत hospitality management असे म्हणतात. म्हणून शिवबा हे रयतेचे राजे होते. हा खास स्त्रीत्वाचा गुण आहे. जो शिवाजी महाराजांकडे जिजाऊ कडून आला. भारतीय संस्कृतीतील सेवा हे तत्व स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजवल्या गेलं
दुसऱ्या बाजूने जनतेच्या भरण पोषणाची काळजी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारल्याचा भाव. ही स्त्रीत्वाची तरलता शिवाजी महाराजांमध्ये जिजाऊ कडूनच आली होती.

आजपर्यंत समाजामध्ये हा स्त्रीत्वाचा गुण किंवा हा पुरुषत्त्वाचा गुण असे विभागल्या गेले खरे. परंतु जगामध्ये त्याच व्यक्ती महान कामे करू शकल्या ज्यांच्यामध्ये स्त्री आणि पौरुष गुणांचा समतोल साधला गेला.
ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये शिव आणि शक्ती असे नामाभिधान आहे.

४) संवाद कौशल्य Maximize communication skill :-

संपूर्ण जगाला आजही नैतिक दिशा देणारी गीता. अर्थात Song of God. *अर्जुनाला स्वधर्मात आणण्याची प्रक्रिया श्रीकृष्णाने आपल्या वाणीतून केवळ 45 मिनिटात पूर्ण केली.

अर्थात न कमी बोलणे ,न जास्त बोलणे. माफक आणि योग्य तेवढेच . शब्दांची निवड ही इतकी अचूक की जे काही सांगायचंय ते थेट.

हे कौशल्य खुद्द जिजाऊंच्या अंगी नसतं तर त्या हे शिवबाला देऊ शकल्या नसत्या. कारण स्थिती असेल तरच गती येऊ शकते.
( स्थिती म्हणजे स्वत्व आणि गती म्हणजे उपयोगात आणण्याची शक्ती.)

जेव्हा अफजलखान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचे काही ठरत नव्हते राजे प्रतापगडावर आणि अफजल खान पायथ्याशी.ही अघोषित युद्धबंदी उठवणे गरजेचे होते. या कामी प्रत्यक्ष जिजाऊंनी पुढाकार घेतला व खानाला जाऊन भेटल्या. जिजाऊ म्हणजे खानाच्या दृष्टीने दरबारातील बरोबरीच्या सरदाराची पत्नी, कारण शहाजीराजे विजापूरचे मातब्बर सरदार होते आणि अफजल खानही. त्यामुळे खान स्वतःच जिजाऊं चे स्वागत करायला आला – तेव्हा शिवाजी म्हणजे नादान मुलं. तो तुम्हाला घाबरतो पण तुम्ही तर त्याचे चाचा आहात. तुम्हीच भेटायला तयार व्हा. तुम्हीच त्याला अभय द्या. तो तुमच्या सर्व गोष्टींनी आणि ताकदींनी घाबरलायं त्याला माफ करा आणि आपल्या छत्रछायेत घ्या. मग प्रश्न उद्भवतो जिजाऊंनी अस केलं तर खान जिजाऊंना पकडू शकला असता, परंतु ते शक्य नव्हते कारण विजापूरची संपूर्ण फोज एक लाख त्यातील खानाच्या सोबत 65,000 ची फौज होती. उरलेली 35,000 फौज प्रत्यक्ष राज्यात होती .पैकी 25,000फौज मराठ्यांची अर्थात शहाजींची होती .म्हणून खान हा जिजाऊंना पकडू शकला नसता.हा राजकारण आणि समाजकारणाचा अभ्यास होता जिजाऊंचा. त्यांनी खानाची स्तुती करून त्याला शिवाजी महाराजांची भेट घेण्यास भाग पाडले. communication skill वापरलं त्याशिवाय तो शिवरायांना भेटायला तयारही झाला नसता पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.

५) उपलब्ध संसाधनांचा योग्य आणि काटकसरीने वापर Using natural resources carefully ज्याची नीव जिजाबाईंनी शिवरायांना घालून दिली होती. त्याकाळी ज्या राजाकडे एवढे जास्त गड तेवढी त्याची ताकद जास्त असे प्रचलन होते .शिवाजी महाराजांनी 374 गड जिंकले आणि 111 गड बांधले एकूण 485किल्ले राजांकडे होते. गड बांधायला राजांनी एकही दगड खालून वर नेला नाही.आजच्या काळातील save energy आणि zero budget या तत्त्वानुसार काम करण्यावर त्यांचा नेहमीच भर होता.शिवाजी महाराजांकडे जमिनीतील पाणी शोधून काढण्याचे 50 तंत्र होते. जिथे पाणी असेल तिथेच तळे खोदायचे तळ्यासाठीच्या ठिकाणाहून निघालेल्या दगडांचाच गड बांधण्यासाठी उपयोग करायचा या सर्व कामात आसपासच्या गावातील लोकांना रोजगार द्यायचा. अशी एका कामात अनेक काम.

गुणग्राहक असणे आणि गुणांचा उपयोग करता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

स्थिती आणि गती हे स्वत्व बनवणे म्हणजे स्वतःची अंतर्गत व्यवस्था तयार करणे हाच व्यक्तित्व विकास आहे.

६) मानवी मनाच्या इंजीनियरिंग Human Engineering :- जिजाऊ या मानवी मनाच्या निष्णात इंजिनियर होत्या म्हणून तर त्यांनी खडकाळ, ओसाड माळरानावर स्वराज्याची बाग फुलवण्याचे धारिष्ट केलं .जिजाऊंचं स्वराज्याचं स्वप्न प्रत्येक मराठी मुलखातील माणसाला स्वतःचे स्वप्न वाटलं आणि त्यासाठी ते स्वतःचे प्राणार्पण करण्यासही तयार झाले. पुढे स्वराज्य इतिहासाच्या पानोपानी अशा मानवी मनाच्या इंजिनिअरिंगची उदाहरणे दिसतात.

७) सकारात्मकता Positivity:- जिजाऊंनी या दोन्ही छत्रपतींचे चरित्र निर्माण केले. तुम्हाला आजूबाजूच्या जगातून काय माहिती मिळते यापेक्षा ती तुमच्या आत मध्ये घेऊन त्यावर तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देता की नकारात्मक यावरच त्या व्यक्तीचे चरित्र घडत असते तर सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय जिजाऊंनी या दोन्ही छत्रपतींना लावली त्यातूनच त्यांचे चरित्र निर्माण होत गेले.

जिजाऊंनी शिवबां आणि संभाजी मध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
कारण त्या काळात स्वत्व हरवलेला समाज स्वतःचे स्वराज्य निर्माण करू शकतो हा विचारच भयंकर क्रांतिकारी होता. जो जिजाऊंच्या मनात आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात आणला .हे स्वतःवर प्रचंड विश्वास असल्याचेच प्रतीक आहे.

अशा रीतीने जिजाऊंनी मुलं घडवण्याच्या पद्धतीचा वस्तूपाठ सर्व मातांसमोर ठेवलाय.

या माऊलीने एक नाही तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या रूपाने दोन दोन छत्रपती घडवलेत जे आजही विश्ववंदनीय आहेत.

असं आत्मतेज” असणाऱ्या मातेने काय नाही दिलं.

क्षमता-योग्यता-पात्रता विकसित केली, धीरता-वीरता-उदारता दिली, कुशलता-निपुणता-पांडित्य दिले, प्रज्ञा-शील-करूणा दिली , जी तिच्या या तेजस्वी अंशांनी घेतली म्हणूनच अशा आत्मतेज असणाऱ्या मातेच्या आयुष्यातील काही क्षण प्रत्येक माता आणि पुत्राच्या जीवनात येऊ दे.

अश्विनी गावंडे.