अभिजात भाषा गौरव दिन
(मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वैचारिक लेख)
सालपेन आयलँड या द्विपावर जर तेथील लोकांना एखादे झाड नको असेल, तर झाड तोडण्याची प्रथा तिथे नाही. तिथे काही लोक एकत्र येतात झाडाला अपशब्द बोलतात आणि निघून जातात. असे केल्याने झाड हळूहळू कोमेजत जाते आणि एक दिवशी मरून जाते. इतक शब्दांच महत्व. यातून दुसरा अर्थ ध्वनीत होतो तो म्हणजे पशु पक्षांना आणि झाडांना माणसाची भाषा समजते व तिचा त्यांच्यावर परिणाम होतो.
2016 मध्ये जपानचे नोबल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ YOSHINORI OHSUMI यांनी आपल्या प्रयोगातून असे सिद्ध केले की मानवी पेशींवर ताणाचा परिणाम होतो जो नकारात्मकतेतून निर्माण होतो . कारण संपूर्ण निसर्गात नकारात्मकतेची भाषाच कुठे नाही. जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल अर्थात स्वतःशी नकारात्मक बोलत असाल त्याचा परिणाम तुमच्या पेशीरचनेवर होतो.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ||
शब्दचि आमच्या जीवाचे जीवन |
शब्द वाटू धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दची हा देव |
शब्दाची गौरव पूजा करू||
आपल्या पौराणिक कथा आपल्याला शब्दांचे महत्त्व वारंवार अधोरेखित करतात. यमराज आणि सावित्री मध्ये संवाद झाला आणि त्याचे प्रतिफल म्हणजे यमराजाने सत्यवानाला जिवंत केले. धर्मराज आणि यक्षाचा संवाद. मानवी जीवनातील सर्व शंका निरसन करणारा नचिकेत आणि यमातील संवाद सर्वांचे माध्यम शब्दच.
शब्द म्हणजे भाषा .भाषा म्हणजे संस्कृती. संस्कृती विकसित होते जगण्यातून. जगण्याच्या ठायी असतात भाव. व भाव व्यक्त करण्यासाठी शब्द.
एकुणात भाषा म्हणजे भावना .भावना जर व्यवस्थित पोहोचली नाही तर माणसाची तगमग होते.
अशा मानवी मनाची काहीली थांबवणारी माझी भाषा. माझी मराठी भाषा. माझी अभिजात भाषा.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य जाणतो मराठी.
मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीची संवाहक आहे. मराठीमध्ये शूरता आहे आणि विरता ही. सौंदर्य आणि संवेदनाही. समानता आणि समरसता ही. मराठी भाषेत आध्यात्मिक स्वरा सोबत आधुनिकतेची पोचही आहे. मराठी भाषा भक्ती, शक्ती आणि युक्तीची भाषा आहे. मराठी भाषेने महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची अध्यात्मिक गरज पूर्ण केली आहे. मराठी भाषा सर्वसमावेशक आहे. कारण मराठीचे दैवत विठ्ठल आहे. तो देवच सर्व समावेशक आहे.
7500 भाषा बोलल्या जाणाऱ्या या जगात मराठी भाषेचा जगात सतरावा क्रमांक आहे. 12 ते 13 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेचंअस्तित्व 2000 वर्ष प्राचीन आहे. इसवी सनापूर्वी पासून मराठी भाषेत लेखन केल्या गेले. मराठी भाषा अभिजात असल्याचं कारण म्हणजे प्राचीन आणि आधुनिक रूपाची यथायोग्य सांगड घालणारी भाषा आहे.
अशी ही मराठी भाषा आपल्या लिखाणाने आणखी समृद्ध करणारे कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर .ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे महाराष्ट्रीय. त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. “कुसुमाग्रजांना सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे संबोधले जाते.” आपल्या लिखाणातून चार दशकांपेक्षाही जास्त महाराष्ट्रावर प्रभाव निर्माण करणारे ते एक उत्कृष्ट नाटककार ,कादंबरीकार ,कथाकार, लघु निबंधकार आणि आस्वादक समीक्षक होते.शब्दांच्या कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.
शब्दकलेवर प्रभुत्व हे त्यांच्या नावावरूनही लक्षात येते. चार भावंड आणि एक लाडकी बहीण असणारे विष्णू वामन शिरवाडकर. त्यांच्या लाडक्या बहिणीचे नाव कुसुम होते. हे तिचे मोठे भाऊ म्हणून अग्रज .म्हणून त्यांनी कुसुमाग्रज या नावाने लेखन केले.
अशी ही मराठी भाषा नातीगोती आणि समाज सम्पृक्त करणारी. मराठी भाष ने आम्हाला काय दिले? असा विचार केला तर हे दोन शब्द त्याचे उत्तर. संस्कृती आणि समृद्धी.
आज प्रत्येक मराठी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतः मराठी तयार केली नाही .ती आम्हा सर्वांच्या पूर्वजांची आहे. आपल्या संतांची, आपल्या लोकसाहित्य आणि लोकगीतांची, आपल्या पंडितांची शाहिरांची बखरीची.
कारण भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. ही माझी मायबोली त्या त्या काळातील आठव जागवते .संत त्यांच्या रचनांमधून परमेश्वराचे तत्त्वज्ञान समजावून सांगतात तेव्हा सात्विकतेचा भाव मनी अवतरतो. पांडित्याची भाषा बुद्धीचा भाव जागृत करते. तर बखरकार शिवाजी महाराजांच्या काळातील समृद्धता सजीव करतात. ” आकांक्षा पुढती गगन ठेंगणे” हा भाव मनी फेर धरतो. शाहिरांची भाषा स्फूर्ती जागवते तर लावणीची भाषा लोक साहित्य जागवते. लावणी ऐकताना फार बरे वाटते. ती मनी गोड संभ्रम निर्माण करते की, ती लोकांची भाषा आहे. की भाषेचे लावण्य .
एकूण काय बोलीभाषा कोणतीही असो प्रत्येक बोली भाषेने मराठी भाषा समृद्ध केली आणि सोबतच मानवाला आहे त्यापासून उंचीवर नेले. याला कारण कारण म्हणजे मराठी मराठी धर्मच सर्वसमावेशक आहे. भयमुक्तता या मराठी धर्माची पहिली पायरी .संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांपासून ते जनाबाई ,सोयराबाई ,चोखामेळा, सावता माळी ,बहिणाबाई ,कान्होपात्रा, संत तुकाराम आणि अशा अगणित लोकांनी आपल्या खांद्यावर मराठी धर्माचा भार उचलून महाराष्ट्रात एक सांस्कृतिक लोकशाही तयार केली. आपण बसायला सतरंजी अंथरतो तशी.
त्यावर मग शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहिले आणि त्याकाळी या सर्व भाषाच संवाद भाषा म्हणून कामास आल्या.
झाडांची मुळे जशी खोलवर जाऊन झाड जगवतात तशाच मराठीच्या सर्व बोलीभाषांनी मराठी भाषा जगवली. भाषा ही जैविक संस्था आहे . ती जितकी बोलली जाईल तितकी जिवंत राहते.
पण मग काळाच्या ओघात. कोण्या एकेकाळी एक समुदाय आकारास आला . आम्हाला इंग्रजी बोलता येते जी ज्ञानभाषा पण आहे. जागतिक भाषा पण आहे. मात्र तुम्हाला ती बोलता येत नाही. एकूणच मग माझी मराठी भाषा स्टॅंडर्ड नाही. असा न्यूनगंड त्यांनी मराठी भाषिकात निर्माण केला.
मग मराठी अभिजनांची ओढ इंग्रजी भाषा आत्मसात करण्याकडे लागली इथपासून तर या माझ्या अभिजात भाषेची मला लाज वाटायला लागली इथपर्यंत.
एखादे मुल 13 /14 वर्षाच्य होईपर्यंत तीन-चार भाषा सहज शिकू शकत होतं .त्याची प्रगती मग आम्ही केवळ इंग्रजी आत्मसात करण्यावरच रोखली. परिस्थिती इथपर्यंत पोहोचली की मराठी शाळेला विद्यार्थी मिळेनासे झाले .मराठी शाळा बंद पडायला लागल्या. मराठी पाट्यांचे राजकारण व्हायला लागले. मराठी अस्मिता केवळ निवडणुकी पूरती जागृत करून फड जिंकणे शक्य झाले. या गदारोळात मात्र आम्ही सर्वांनी मिळून आमच्या माय मराठी ला पराभूत केलं.
आता मराठी भाषा गौरव दिनाचा एक दिवसाचा जागर करून आपले कर्तव्य पूर्ण केल्याचा आव आणतो.” एक दिवस गवगवा आणि बाकी दिवस वाळीत.”
माझ्या मायबोलीला पराभूत करायचं नसेल. तर ती बोलल्या गेली पाहिजे त्यातून लेखन झालं पाहिजे. तिला आम्ही लेकरांनी ज्ञानभाषा ,व्यवहार भाषा ,अविष्कार भाषा ,न्याय व्यवहार आणि शिक्षणाची भाषा बनवलं पाहिजे .दिखाव्यापेक्षा कृतिशील धोरण आखले पाहिजे.
ज्या समाजाला आपल्या संस्कृती, माती आणि भाषेविषयी आत्मीयता वाटत नाही. त्या समाजाची पडझड कोणीही रोखू शकत नाही.
इसवी सणाच्या सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी स्वभाषेचे महत्त्व ओळखले होते. स्वभाषा जितकी फुलेल फळेल तितका स्वाभिमान जागृत राहील
इतके दृष्टे पण त्यांच्या ठाई होते. त्यांनी त्या काळात मराठी भाषेचा शब्दकोश तयार करून घेतला. आपण त्यांचेच पाईक.
हा धागा पकडून पुन्हा एकदा आपल्या भाषेची महती जागृत करणे गरजेचे आहे.
करिता मराठी भाषेची वैशिष्ट्ये पुन्हा एकदा उदृक्त करणे गरजेचे आहे. मराठी भाषेची वर्णमाला अतिशय शास्त्रशुद्ध आहे. क ख ग…… पहिली ओळ कंठ या वर्णाचे उगमस्थान. च छ ज झ…… कंठाच्या पुढे या वर्णांचे उगमस्थान. ट ठ ड ण…. जीभ आढ्याला आघात करते. त्यापुढील उगमस्थान. प फ ब भ म….ओश्ठ्य वर्ण. अशा रचना केवळ देवनागरी लिपीतच शक्य आहेत अर्थात मराठी हिंदी आणि संस्कृत.
पहिले प्राकृत भाषा तयार झाली प्राकृत भाषा म्हणजे प्रकृतीची भाषा तो 30-40 भाषेचा समूह होता. त्यातून मग संस्कृत आणि मग मराठी चे निर्माण झाले.
मराठी भाषेतील पहिले वाक्य
श्री श्रवण बेळगोळ येथील बाहुबलीच्या पुतळ्यावरील शिलालेख.
श्री चामुंडराय करविले
श्री गंगा राजे सुतासे करविले.
पैठण येथील साम्राज्याने सर्वप्रथम प्रशासनामध्ये मराठीचा उपयोग केला. देवगिरीचा राज्यात मराठी व मराठी संस्कृतीची भरभराट झाली. महानुभाव पंथांच्या चक्रधर स्वामींनी लिहिलेला लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला ग्रंथ.
बाराशे नव्वद मध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी निर्मिली. संत एकनाथांची भारुडे. इत्यादींना शिवाजी महाराजांच्या काळात राजाश्रय मिळाला. विविध व्याकरण कार व भाषाप्रभूंनी आधुनिक काळात मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली.
कवी मोरोपंत यांनी रामायण वेगवेगळ्या 108 पद्धतीने लिहिले. त्यातील एक रामायण निरोश्ठ रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात प फ ब या ओश्टय वर्णांचा उपयोग न करता.
याच कवी मोरोपंत यांनी एक कथा पण लिहिली आहे. एका ओळीत आठ शब्द अशा वीस ओळी म्हणजे एक कथा. परंतु उभ्या ओळी वाचताना प्रत्येक ओळीतील पहिल्यांदा पहिला पहिला शब्द वाचायचा त्यानंतर दुसरा दुसरा शब्द मग तिसरा तिसरा शब्द यातून एक नवीन वेगळी कथा तयार होते जी आडव्या ओळीतल्या कथेपेक्षा वेगळी आहे.
मराठी भाषेचे आणखी वैभव म्हणजे ळ हे अक्षर. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमध्ये आहे. ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमध्ये आहे. ळ आणि ल या शब्दांचे वेगळे अर्थ ध्वनीत करण्याचे सामर्थ्य केवळ मराठी भाषेतच आहे.
रशिया ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये 44 मराठी रेडिओ केंद्र आहेत. जी आजही ऐकली जातात.
महाराष्ट्र शिवाय देशात हरियाणा या राज्यात अकरा लाख मराठी बांधव राहतात.
आजही कराचीत नारायण जगन्नाथ विद्यालय असून तेथील विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
मराठी भाषेमध्ये 48 पेक्षा जास्त साहित्य प्रकार आहेत.
आज सारख्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसणाऱ्या बाराव्या शतकातील समाजातील अंत्यज म्हणविल्या जाणाऱ्या संत सोयराबाई
देहाचा विटाळ देहचि जन्मला
शुद्ध तो जाहला कवण प्राणी ||
उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान
कोणतेही निर्माण नाही जगी ||
अशी ओवी रचतात. एवढी समज असणाऱ्या पूर्वजांच्या पुढच्या आणखी कोणत्या समजेची गरज आहे.
आज पर्यंत मराठी वाचण्याचा बोलण्याचा विडा खेडेगावातील लोकांनीच उचलला आणि भाषा टिकवली. आता नागर समाजाची वेळ येऊन ठेपली आहे भाषा टिकवण्याची.
||श्री माऊली चरणी अर्पण ||
अश्विनी गावंडे
Nice 👍👍
सुंदर लेख
खूप छान मॅडम एवढी मराठी बद्दलची माहिती अजून वाचलेली नव्हती
Mast
मराठी भाषेबद्दल प्रत्येक मराठी मनात आदर व स्वाभिमान जागृत ठेवण्यास भाग पडणारे अत्यंत प्रभावशाली लेखन केल्याबद्दल धन्यवाद Mam 🙏🙏
http://www.vocal.com.ua/node/65966